शत्रूंच्या कोंडाळ्यात शांततेत राहायचे, तर युद्धासाठी सिद्ध असले पाहिजे या तत्त्वाची प्रचीती यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणून दिली…
‘ऑपरेशन सिंदूर’ असे अर्थगर्भित नामकरण झालेली मर्यादित लष्करी मोहीम भारतीय सैन्यदलांनी ६ मेच्या मध्यरात्रीनंतर सुरू केली आणि अवघ्या २५ मिनिटांमध्ये सुफळ संपूर्ण केली. दुसऱ्या दिवशी देशभर उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये युद्धप्रतिकारात्मक सराव प्रात्यक्षिके नियोजित होती. ती झाल्यानंतर, पुरेशा तयारीनिशी भारत प्रतिहल्ला करेल अशी पाकिस्तानची अटकळ होती. पण या प्रात्यक्षिकांच्या आदल्याच मध्यरात्री हल्ले करून भारताने शत्रूला गाफील गाठले. तत्परता हा कोणत्याही युद्धकारवाईच्या यशस्वितेचा पहिला टप्पा असतो. त्यात भारत १०० टक्के यशस्वी झाला. यंदाच्या हल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, १९७१ नंतर प्रथमच भारताने पाकिस्तानातील पंजाब प्रांतात हल्ले केले. हे धाडस विशेषच. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने यापूर्वीही हल्ले केलेले आहेत. ‘सर्जिकल स्ट्राइक’ हे त्यांपैकी एक उदाहरण. याही वेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबाद, कोटली अशा ठिकाणांवर आपण प्रहार केले. पण नऊपैकी पाच ठिकाणे ही पंजाबमधील आहेत. बहावलपूर, सियालकोट, मुरीदके या ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ किंवा जैश, लष्कर- ए- तय्यबासारख्या संघटनांची मुख्यालये यांना लक्ष्य करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरला भारताचा सार्वभौम भूभाग आपण मानतो. पण पाकिस्तानमधील पंजाब हा त्या देशाचा वादातीत सार्वभौम भूभाग आहे. पाकिस्तानी लष्करात आणि राजकारणात त्या पंजाब प्रांताचे नि:संशय आणि अनिर्बंध प्रभुत्व आहे. तेथील भूमीवर हल्ला करून भारताने पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांना इशारा दिला हे महत्त्वाचे. पाकिस्तानचे विद्यामान पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि विद्यामान लष्करप्रमुख असिम मुनीर हे पंजाबचेच. याच पंजाबमध्ये लष्कर- ए- तय्यबा, जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनांची मुख्यालये आहेत. तेथे हाफीझ सईद, मसूद अझर हे दहशतवादी म्होरके आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. भारतीय क्षेपणास्त्रे पंजाबपर्यंत पोहोचू शकतात म्हणजे ती या मंडळींपर्यंतही पोहोचू शकतात हा संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने दिलेला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ही कारवाई नेमकी, मर्यादित आणि युद्धभडका टाळणारी होती. या कारवाईचे उद्दिष्ट केवळ दहशतवाद्यांचा नि:पात आणि पाकिस्तानास जरब बसवणे इतके मर्यादित होते. पण तिची व्याप्ती ही उरीनंतर झालेले सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामापश्चात बालाकोटमध्ये झालेले हवाई हल्ले यांच्यापेक्षा अधिक होती. भारताने या वेळी नऊ ठिकाणी हल्ले केले. ते करताना कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्करी आस्थापना किंवा नागरी वस्त्यांना झळ पोहोचणार नाही याची दक्षता घेतली. असे केल्यामुळे पाकिस्तानची पंचाईत झाली हे नक्की. भारतात दहशतवादी पाठवण्यासाठी डझनभर तळ सीमावर्ती भागांतच नव्हे, तर पाकिस्तानच्या अंतर्गत भागामध्येही उभारले गेले हे यातून उघड झालेच. आता भारताने हल्ले केले हे स्वीकारायचे, तरी नामुष्की आणि दहशतवाद्यांवर मालकी सांगून भारताचा निषेध करणे हीदेखील नामुष्कीच. ही चरफड त्या देशाच्या नेतृत्वाकडून प्रसृत झालेल्या प्रतिक्रियांमध्ये उमटलेली दिसते. अगदी सुरुवातीला पाकिस्तानकडून ‘भारताची काही लढाऊ विमाने पाडली’ या स्वरूपाची दिशाभूल करणारी वक्तव्ये पेरली गेली. त्यानंतर ‘भारताला क्षणैक आनंद साजरा करू दे. पण दीर्घकालीन दु:ख त्यांस भोगायला लावू’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.
पण या वल्गनावजा प्रतिक्रियांपेक्षा वेगळे आणि अधिक हा देश काय करू शकतो? दहशतवादास, धर्मांधवादास कवटाळल्यामुळे त्या देशाच्या वाटेला यापेक्षा वेगळे भोग येणार नव्हतेच. दहशतवादविरोधी जागतिक लढ्यामध्ये ९/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला सहकारी म्हणून बरोबर घेण्याचे हास्यास्पद धोरण तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश यांनी अंगीकारले, त्याच वेळी भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी इशारा दिला होता, ‘अफगाणिस्तान नव्हे, पाकिस्तान हाच जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे’! ही घटना २००१ मधील. त्यानंतर दहाच वर्षांनी दहशतवादनाट्यातील मुख्य खलनायक ओसामा बिन लादेन भर पाकिस्तानात, त्यांची राजधानी इस्लामाबादपासून जवळ असलेल्या अबोटाबाद येथे मारला गेला. तेथेच पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना घडवणारी लष्करी अकादमी आहे. पंजाबी वर्चस्ववादाला भारतविरोधाची, धर्मांधतेची जोड देऊन तेथील लष्करी नेतृत्वाने जनरल झिया उल हक यांच्या राजवटीत जिहादी मानसिकतेला कवटाळले. त्यांचाच अवतार आणि तितक्याच कडव्या जिहादी मानसिकतेचे जनरल असिम मुनीर आज पाकिस्तानचे लष्करप्रमुख आहेत हा योगायोग नाही. या लष्करप्रमुख मंडळींची काही वैशिष्ट्ये ठरलेली. ते जिहादी आहेत पण धर्माचरण करतात असेही नाही. यांतील कित्येकांना धार्मिक बंधने मान्य नाहीत, ते बेछूट जीवन जगायचे नि जगतात. त्यांतील बहुतेक जण पदावर असताना गडगंज माया जमवतात आणि निवृत्त झाल्यानंतर परदेशी निघून जातात. मागे राहिलेले लष्करशहा मग तितक्याच निगुतीने पाकिस्तानातील संसाधने ओरबाडत राहतात. यांना भारताविषयी तिटकारा असतो, कारण लोकशाही नकोशी असते! भारतीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा ‘नकोसा’ प्रभाव पाकिस्तानी जनतेवर पडला, तर आपली दुकाने बंद होतील ही त्यांची रास्त भीती. त्यासाठी युद्धज्वर चेतवत ठेवायचा, भारतविरोधी दहशतवाद पोसत राहायचा, काश्मीर ते क्रिकेट अशा वेगवेगळ्या परिघांमध्ये भारत हाच शत्रू जनमानसात राहील यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करायची हेच यांच्या जगण्याचे आणि प्रगतीचे ईप्सित. भारताने (बांगलादेशाची निर्मिती करून) आम्हाला तोडले, आता या देशाचा हजार जखमांनी रुधिरक्षय करून त्यांना तडफडवून मारू अशा वल्गना येथील लष्करी अकादम्यांतील तरुण अधिकारी पांढरकेसे जनरल होईपर्यंत करत राहतात. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना एखाद्या वेळेस लोकशाहीचे उमाळे आलेच, तर त्यांना चिरडणे किंवा सत्ताच्युत करणे हा पाकिस्तानी लष्करशहांचा जोडधंदा.
या धर्मकेंद्री आंधळ्या राष्ट्रवादाने आज पाकिस्तानची दैना झाली आहे. जगात पत नाही नि देशात दाणा नाही अशी स्थिती. या स्थितीकडून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी भारतात घुसखोरी करून हल्ले घडवून आणणे हाच एक मार्ग. कारण भारताशी दुश्मनी संपवली, तर करार करावे लागतील. व्यापारी संबंध वाढवावे लागतील. पाकिस्तानातील तरुण भारतीय विद्यापीठांमध्ये शिकू मागतील. भारतीय माल पाकिस्तानी बाजारपेठांमध्ये येऊ लागेल. ‘त्यांच्या’ काश्मीरप्रमाणेच ‘आमच्या’ काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्या लागतील. सगळ्या पातळ्यांवर, आघाड्यांवर बरोबरी आहेच कुठे? म्हणून मग जिहादींना पैसा, शस्त्रे, प्रशिक्षण पुरवणे किंवा अण्वस्त्रांच्या डरकाळ्या फोडणे याच मार्गांनी भारताला जरब बसवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत असतो. भारताची राजनैतिक संस्कृती प्रत्युत्तरातूनही संयम दाखवणारी आहे हेही पाकिस्तानी लष्करशहांना पक्के ठाऊक असते. यातूनच मग अनेकदा १९७१ मधील मानहानीचे विस्मरण होते नि फजिती होते. ही फजिती ढाक्यात दिसली, लोंगिवालामध्ये दिसली, कारगिलमध्ये दिसली नि हाजी पीरमध्येही दिसली. तरी बोध होत नाही, कारण तो करून घ्यायची संस्कृती नाही. पाकिस्तानी लष्करशहा हे त्या देशाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. जोपर्यंत त्या देशावर लष्करशहांची पकड मौजूद आहे, तोवर त्या देशातील जनतेला स्थैर्य, शांतता, समृद्धी या मूल्यांची फळे चाखायला मिळणार नाहीत.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने त्या देशाला नऊ वर्षांत तिसऱ्यांदा कुरापतखोरीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. शत्रूंच्या कोंडाळ्यात शांततेत राहायचे, तर युद्धासाठी सिद्ध असले पाहिजे या तत्त्वाची प्रचीती यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणून दिली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. दहशतवादाचे दमन करण्याची ही शेवटची वेळ नसली, तरी प्रतिहल्ल्याची अचूकता आणि व्याप्ती पाहता येथून पुढे स्वत:चे किती नुकसान करून घ्यायचे हे पाकिस्ताननेच ठरवायचे आहे!