उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सत्ताधारी आपल्या स्वार्थापलीकडे कसे पाहत नाहीत, हे पटवून दिले. मोदींचा स्तुतिपाठक असेल तर त्याचा उदोउदो केला जातो आणि मोदींविरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते, हे त्यांनी सोनम वांगचूक यांचे उदाहरण देऊन मांडले. पण भाजपच्या अंधभक्तांनी उद्धव ठाकरेंनाच नक्षलसमर्थक ठरवले. भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवले गेले. न्याय मागणे हा आता देशद्रोह ठरवला जाणार आहे का?’ त्यांनी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांवर, दडपशाहीवर प्रहार केला. भाजपला त्यांनी- शरीरात प्रवेश केल्यास पोटदुखी आणि अतिसारासारखे विकार निर्माण करणाऱ्या अमिबाची- उपमा दिली. ही उपमा भाजपची राजकीय धोरणे आणि समाजातील भूमिकेला संबोधून होती. समाजाचे विभाजन करण्याच्या आणि अशांतता निर्माण करण्याच्या वृत्तीविषयी होती. मात्र भाजपच्या अंधभक्तांना त्यांचे विचार कळलेच नाहीत. अर्थात तितकी वैचारिक पातळी त्यांच्याकडे आता उरलेलीच नाही. मुळात ज्या सोनम वांगचुक यांच्या लडाख येथील आंदोलनाचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला ते आंदोलन आणि सोनम वांगचुक नेमके कोण हेदेखील भाजपच्या अंधभक्तांना माहीत नसावे.

वांगचुक यांचे चुकले काय?

सोनम वांगचुक हे लडाखचे एक प्रख्यात पर्यावरण कार्यकर्ते, अभियंता आणि शिक्षण सुधारक आहेत. त्यांच्या जीवनकार्याने हिमालयातील स्थानिक समुदायांना स्थानिक संदर्भ असलेले शिक्षण घेण्याची, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा दिली. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून लडाखला केंद्रशासित प्रदेश केले गेले, तेव्हा त्यांनी सुरुवातीला समर्थन दिले आणि पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली. मात्र, नंतर केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी राज्याचा दर्जा, सहाव्या अनुसूचीत समावेश, पर्यावरण संरक्षण, स्थानिकांना नोकरी आरक्षण या स्वत:च दिलेल्या आश्वासनांचे पालन न केल्याने ते नाराज झाले. त्यांनी अनेकदा उपोषण केले आणि शांततापूर्ण आंदोलने केली. हिमनद्या वितळणे आणि औद्याोगिक लॉबीच्या दबावामुळे पर्यावरण धोक्यात येणे या शक्यता त्यांनी वर्तवल्या. प्रदीर्घ काळ शांततापूर्ण लढा देऊनही सरकार लक्ष देत नाही, हे पाहून लडाखवासी आक्रमक झाले आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २४ सप्टेंबरला चार जणांचा मृत्यू झाला.

त्यानंतर सरकारने वांगचुक यांच्यावर हिंसा भडकावल्याचा, नेपाळ आणि अरब क्रांतीचे उल्लेख करून प्रादेशिक शांततेला धोका निर्माण केल्याचा आरोप लावला आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) अटक केली. हा कायदा न्यायालयीन प्रक्रियेशिवाय १२ महिने तुरुंगात ठेवण्याची क्षमता यंत्रणांना देतो, मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. वांगचुक यांच्याबाबतीतही हेच झाले. २५ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना अटक झाली आणि थेट न्यायालयीन प्रक्रियेशिवाय जोधपूर जेलमध्ये नेण्यात आले. पूर्वी सरकार ज्यांची प्रशंसा करत होते, त्या वांगचुक यांना ‘चायनीज एजंट’ ठरवले गेले. वांगचुक यांनी भारतीय सैन्यासाठी बर्फाळ प्रदेशात सौर ऊर्जेच्या साहाय्याने आतील तापमान नियंत्रणात ठेवणाऱ्या तंबूंचा विकास केला. हे तंबू सियाचीन, गलवान व्हॅली आणि ब्लॅक टॉपसारख्या भागांतील सैनिकांसाठी विकसित केले गेले होते. प्रत्येक तंबू १० सैनिकांना सामावून घेऊ शकतो आणि दिवसभर सूर्यप्रकाश शोषून रात्री आतील तापमान उष्ण ठेवतो. सीमांवर तैनात जवानांसाठी त्यांचे हे तंबू आजही मोठा आधार आहेत. अशा व्यक्तीला चीनचे एजंट ठरवले गेले, कारण त्यांनी मोदी-शहांच्या स्वकेंद्रित राजकारणाला आव्हान दिले आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या वचनांना कसा हरताळ फासला हे दाखवून दिले.

वांगचुक यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा गैरवापर करून सामान्य माणसाचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे हा लोकशाहीला धोका आहे आणि असा धोका मोदी सरकार हे वारंवार निर्माण करत आले आहे. उद्धव ठाकरे यांनी हेच दसरा मेळाव्यात मांडले पण भाजपच्या अंधभक्तांना ते नक्षलसमर्थक वाटू लागले. म्हणजे भाजपने सोनम वांगचुक यांचे कौतुक केले तेव्हा ते अमर प्रेम होते मात्र वांगचुक यांनी जेव्हा आपल्या लडाखच्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलन- उपोषण केले तेव्हा त्यांना ते नक्षलवादी वाटू लागले.

भाजपची वैचारिक पातळी स्वयंकेंद्रित

भाजपच्या विचारांमध्ये नेहमी ठळक अक्षरांत ‘राष्ट्र प्रथम, नंतर राज्य आणि शेवटी स्वत:’ असा उल्लेख केला जातो, मात्र सध्या त्यांच्या विचारांत ‘प्रथम स्वत:’ हेच ठळकपणे जाणवते. केवळ मोदीकेंद्रित आणि सत्ताकेंद्रित राजकारण करण्याकडे त्यांचा कल आहे हे अनेक उदाहरणांतून दिसून येते. अगदी आपल्या मूळ मातृसंस्थेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ते जुमानत नसल्याचे दिसते. संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनाही बरेचदा भाजपला याची आठवण करून द्यावीशी वाटते यातूनच स्पष्ट होते की, भाजपची वैचारिक पातळी स्वकेंद्रित होत चालली आहे. मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, ‘हिंदू विचारसरणी म्हणत नाही की इस्लाम राहणार नाही; आरएसएस कोणावरही हल्ला करण्यावर विश्वास ठेवत नाही. धार्मिक आधारावरही नाही.’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात एका प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले, ‘धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे आणि त्यात कोणतेही आकर्षण किंवा बळजबरी असू नये. हिंदूंमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याने ते असुरक्षित आहेत. कोणताही हिंदू असा विचार करत नाही की इस्लाम राहणार नाही. आपण प्रथम एक राष्ट्र आहोत. संघ कोणावरही हल्ला करण्यावर विश्वास ठेवत नाही, धार्मिक आधारावरही नाही. मी असे म्हणत नाही की रस्ते आणि ठिकाणांची नावे मुस्लिमांच्या नावावर ठेवू नयेत. आक्रमकांची नावे देऊ नयेत एवढेच माझे म्हणणे आहे.’

भागवत असेही म्हणाले की, संघ घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य आरक्षण धोरणांना पूर्णपणे पाठिंबा देतो आणि आवश्यक असेपर्यंत देत राहील. जातीव्यवस्थेबद्दल ते म्हणतात, ‘जुने आहे ते जाणारच. जातीव्यवस्था एकेकाळी होती, पण आज तिची काहीच प्रासंगिकता नाही. जात आता व्यवस्था राहिलेली नाही; ती जुनी झाली आहे आणि ती गेली पाहिजे. शोषणमुक्त आणि समतावादी व्यवस्थेचे मूल्यांकन करण्याची गरज आहे. जुनी व्यवस्था जात असताना, तिचा समाजावर विनाशकारी परिणाम होणार नाही हे पाहिले पाहिजे.’ भाजप आणि मोदी कशा पद्धतीने स्वकेंद्रित राजकारण करत आहेत आणि देशातील जनतेला जाती-जमातींत विभाजित करत आहेत, हे ठळकपणे जाणवल्यामुळेच त्यांना त्यांच्या मूळ विचारांची आठवण करून द्यावीशी वाटली असावी.

भाजपच्या कार्यपद्धतीकडे पाहिलं तर त्यांना आता अंधभक्तांची सतत गरज भासत असल्याची जाणीव होते. फुटकळ मानधनावर त्यांना पोसले जाते. मात्र सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाताना आपण समाजस्वास्थ्य बिघडवत आहोत याची जाणीवही त्यांना राहात नाही. आज महाराष्ट्र जाती जमातींमध्ये विभागला आहे त्याला कारण भाजप आहे. ज्या मराठवाड्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले तिथेही मदत करण्यास सत्ताधारी अपुरे पडत आहेत. बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतेही कारण वा प्रस्ताव नसताना सर्व भगिनींच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवून त्यांच्या मतांची बेगमी करू पाहणारे भाजपचे नेते महाराष्ट्रात मात्र ओला दुष्काळ नावाची संज्ञाच नाही असा शोध लावून पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत आहेत. आज अतिवृष्टीमुळे माताभगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि केंद्र सरकारचे प्रमुख मोदी-शहा राज्याकडे प्रस्ताव मागत आहेत! कसला प्रस्ताव हवा यांना? बिहारमध्ये यांना कोणी प्रस्ताव दिला होता? महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना त्याची माहिती मिळावी म्हणून यांना प्रस्ताव हवा आहे.

भाजपचा हा दुटप्पीपणा राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. भाजपचे अंधभक्त या गंभीर स्थितीतही उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यात धन्यता मानतात. यातून त्यांची क्रूर मानसिकता दिसते. या अंधभक्तांचे करायचे काय असा प्रश्न सामान्य माणसांना पडल्याशिवाय राहात नाही. पण एक गोष्ट मान्य करायला हवी, जसे मुघलांच्या काळात सैनिकांच्या घोड्यांना पाणी प्यायला नेल्यावर त्यांना पाण्यातही संताजी धनाजी दिसत, तसे भाजपच्या या मुघलशाहीत वावरणाऱ्या अंधभक्तांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी केवळ उद्धव ठाकरेच दिसतात. ही भीती उत्तम आहे.

अॅड. हर्षल प्रधान

प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख,

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष