रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

गुलजार यांच्या साहित्यात टागोरांची प्रार्थनागीते, गालिबचे शेर, मीरेची पदे, पंचमच्या हास्याचे तुकडे विखुरलेले दिसतात. स्थितप्रज्ञ ‘साक्षीभाव’ जपणारा, परंपरा आणि नवता यांची सांगड स्वत:तून घालणारा आणि ऑस्कर पुरस्कारांच्या ‘ड्रेसकोड’वर टीका करणारा हा कवी भारताची संकल्पना काव्याप्रमाणेच जगण्यातूनही मांडतो…

गुलजारसाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यावर गेल्या दोन आठवड्यांत देशभरात उसळलेली आनंदाची लहर हे एक अपवादात्मक सांस्कृतिक घटित आहे. एरवी ज्ञानपीठ किंवा कोणत्याही साहित्यिक सन्मानाची बातमी देशाच्या पृष्ठभागावर क्षणिक तरंग उमटवून लुप्त होते, तसे यंदा घडले नाही. या पुरस्कारामुळे जणू आपल्या एखाद्या जिवलगाचा सन्मान झाल्याची भावना कोट्यवधी भारतीयांच्या मनात दाटून आली. त्यामागे फिल्मी जगताचे ग्लॅमर आहे, गुलजारांची सहा दशकांची साहित्यसाधना आहे, त्यांच्या आवाजाचे, व्यक्तिमत्त्वाचे गारुड आहे आणि कवी, गीतकार, कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, चित्रपट-टीव्ही दिग्दर्शक, ललित गद्याकार अशा बहुविध रूपांतून प्रकटणारी त्यांची सर्जनशीलताही आहे. त्याशिवाय या साऱ्याच्या पलीकडे जाणारेही ‘काही तरी’ आहे. ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने गुलजारांचे चतुरस्रा व्यक्तिमत्त्व व त्यांची समृद्ध साहित्यिक कामगिरी यांचा शोध घेण्याऐवजी या सांस्कृतिक घटिताचा, त्यामागील या ‘काही तरी’चा शोध घेणे महत्त्वाचे आणि आव्हानात्मक ठरेल.

हेही वाचा >>> घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे

गुलजार हा माणूस कोणत्याही साच्यात बसणारा नाही. मात्र त्याने स्वत:चे काही मानदंड स्थापित केले आहेत. त्याची प्रमुख ओळख फिल्मी गीतकार या अगदीच वळचणीला टाकल्या जाणाऱ्या कोटीतील साहित्यिकाची आहे. पण साहित्यविश्वातील त्याचे योगदान भरीव व वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो कलावादी/ जीवनवादी, पुरोगामी/ परंपरावादी अशा कोणत्याही निकषांत बसत नाही. त्याच्या चाहत्यांमध्ये किशोरवयीन ते जख्ख म्हातारे, राजकीयदृष्ट्या डावे-उजवे-मधले या सर्वांचा समावेश होतो. जन्माने पंजाबी, वृत्तीने बंगाली, लिहितो उर्दू व हिंदीतून. गीतलेखनात शैलेन्द्रला आदर्श मानणारा हा गीतकार स्वत: चमत्कृतिपूर्ण, व्यामिश्र प्रतिमांच्या भाषेत फिल्मी गाणी लिहितो (‘हम ने देखी है इन आंखो की महकती खुशबू’). अलौकिकाचा ध्यास घेतलेले रवींद्रनाथ व धार्मिक गदारोळातही ‘खुदी’ जपणारा, वेळप्रसंगी ‘खुदाई’ला प्रश्नांकित करणारा गालिब हे त्याचे आदर्श. सिनेमासारख्या क्षेत्रात पन्नास वर्षे वावरूनही तो स्वत:चे खासगीपण कटाक्षाने जपतो. सभा-समारंभ, व्याख्याने, परिसंवाद, कवी संमेलने यांत क्वचितच हजेरी लावतो. फिल्मी पार्ट्या, पुरस्कार समारंभ, टीव्ही वाहिन्यांवरील चर्चांचे धोबीघाट, एकूणच सारे ‘चमको’ प्रकार – यांपासून जाणीवपूर्वक अंतर राखणारा हा कलावंत, याच्यातील बहुविधतेत दडलेले सर्वंकष सूत्र काय आहे?

कवी गुलजार व माणूस गुलजार वेगळे नाहीतच. तोच पीळ, तोच स्वत:च्या शर्तीवर, स्वत:च्या पद्धतीने साकार व्हायचा आग्रह. जनरीत, व्यवहार, नफातोट्याची गणिते यांचा विचार न करता स्वत:ला भावेल तेच करण्याचा स्वभाव… हे सारे जसे त्यांच्या कवितेत आहे, तसेच जगण्यातही. बरे यात प्रदर्शन अजिबात नाही. आपल्या कलाकार असण्याचे नाही, कलंदरपणाचे नाही, की वेगळी वाट चोखाळण्याचेही नाही. आहे ती केवळ सहजता, नितांत सहजता. म्हणूनच हा कवीमाणूस टीकेच्या वादळांची पर्वा न करता आपल्या जन्मगावाला भेट देण्यासाठी पाकिस्तानला जातो, भारत-पाकिस्तान मैत्रीसंघासाठी आपले योगदान देतो, पण पुरोगामी साहित्यिक, कलावंतांच्या वर्तुळात मात्र दिसत नाही. दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्याला फार पूर्वीच मिळायला हवा होता अशी हळहळ व्यक्त करत नाही. अगदी ऑस्कर पुरस्कार मिळाला तरी हरखून जात नाही. उलट त्या समारंभाला जाणे टाळतो. कोणी विचारले तर मिश्कीलपणे सांगतो, ‘‘काय करणार, माझ्याकडे त्या ड्रेसकोडमध्ये बसणारा सूट नाही ना. शिवाय आपला काळा कोट उसना देईल असा कोणी वकील मित्रही नाही मला.’’ पाश्चात्त्य ड्रेसकोडचा निषेध म्हणून मी ऑस्करला गेलो नाही, असा स्वत:चा ढोल बजावणेही मान्य नाही त्याला.

हेही वाचा >>> विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

वृत्तीने तसा बंडखोर असला, तरी संकेत झुगारण्याची ही बंडखोरी त्याच्या कृतीतून व्यक्त होते, घोषणांमधून नाही. उर्दू काव्यात शारीर प्रेमाचे वर्णन न करण्याचा संकेत आहे. पण तो मात्र शारीर मीलनातून स्व-लोप कसा होतो याचे प्रत्ययकारी वर्णन करण्यास धजावतो. पण त्यात अडकून न पडता शरीर या माध्यमाची मर्यादा जाणून तो दुसऱ्या एका कवितेत म्हणतो –

जिस्म सौ बार ज़ले, फिर भी वह मिट्टी का ढेला

रूह एक बार ज़लेगी तो कुंदन होगी…

आत्म्याचे हे बावनकशी सोनेपण त्याच्या कवितेत वारंवार येते. त्याच्या दृष्टीने मृत्यू ही शोक करण्याची बाब नाहीच. ते आहे केवळ एक स्थित्यंतर. तेही कशाचाच बाऊ न करता सहजतेने व्हावे. अस्तित्वाच्या साऱ्या खाणाखुणा अशा पुसून टाकायच्या की जीवनाची एक सुरकुतीही मृत्यूच्या स्वच्छ, पवित्र चेहऱ्यासोबत जायला नको-

खयाल रखना कहीं कोई ज़िंदगी की सिलवट

न मौत के पाक सा़फ चेहरे के साथ जाएं

हा ‘साक्षीभाव’ हिंदू तत्त्वज्ञानातील स्थितप्रज्ञतेशी व ‘वासांसि जीर्णानि’शी नाते सांगतो, तसेच बौद्ध व सूफी तत्त्वज्ञानाशीही. पण कोणत्याही संघटित धर्मविचाराशी किंवा पारंपरिक ईश्वर संकल्पनेशी त्याच्या मनाचा सांधा जुळत नाही. कधी तो ईश्वराशी गुफ्तगू करतो, कधी ईश्वर निरक्षर असल्याने त्याला कवीची भाषा कळत नसल्याची तक्रार करतो, तर कधी जातीय दंगलीच्या वेळी त्याच्या आश्रयाला आलेल्यांनाही ईश्वर वाचवू शकत नाही, हे वास्तव अधोरेखित करतो. अलीकडे तर गुलजारांनी ईश्वर ही संकल्पना मुदत संपलेल्या औषधाप्रमाणे केवळ कालबाह्यच नव्हे, तर (समाज)स्वास्थ्यास बाधक असल्याचेही मांडले आहे. पण त्यांचा ईश्वराशी असणारा संवाद संपत नाही. काव्यातील बहुविधतेच्या मुळाशी असणारी ही लवचीकता हे त्यांचे दुसरे वैशिष्ट्य.

परंपरा व नवता यांच्या द्वंद्वात न सापडता दोघांशी संवादी व डोळस नाते प्रस्थापित करणे त्यांना उत्तमरीत्या जमते. त्यांची प्रतिमा प्रेमकवीची असली तरी त्यांनी सांप्रदायिकता, युद्ध, जगभरात उफाळलेली हिंसा, पर्यावरणीय संहार या समसामयिक प्रश्नांवर अनेक कविता लिहिल्या आहेत. पॅलेस्टाईनवरील बॉम्बहल्ले आणि सरदार सरोवर धरणाने एका समृद्ध जीवनपद्धतीचा केलेला संपूर्ण नाश या विषयांवरील त्यांच्या कविता तर विलक्षण वेगळ्या व प्रत्ययकारी आहेत. माणसाच्या वखवखीतून होणारा निसर्गसंहार आणि अंतरिक्ष विज्ञानासारख्या आधुनिक विषयांवर वेगळी अंतर्दृष्टी देणाऱ्या कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. मात्र हे करताना पारंपरिक शहाणीव, सामान्य माणसाच्या जगण्यातील सौंदर्य यांविषयीचा त्यांचा आदर आणि जमिनीशी असणारे त्यांचे नाते कधीही उणावत नाही. परदेशातील महानगरांचे आखीव सौंदर्य व तेथील घरांतील ‘अँटिसेप्टिक’ स्वच्छता पाहताना त्यांना आपल्या बालपणीच्या घराच्या अंगणातले पिंपळाचे झाड व तिथे घाण करणारा कावळा आणि गावाकडील स्वयंपाकघरातील ओलाव्यामुळे लागणारी किडे-मुंग्यांची रांग आठवत राहते. पाणवठे व चावडी येथे जमणारे माणसांचे ‘जमघट’, छापील पुस्तके, त्यांतील एकेका युगाची साक्ष जपणारे शब्द, माणसे जोडणाऱ्या परंपरा-उत्सव… लुप्त होत असणाऱ्या या प्रत्येक गोष्टीसोबत आपलाही एक अंश पुसला जात असल्याची वेदना त्यांच्या लिखाणातून व्यक्त होते. त्यांच्या पेहरावापासून जीवनशैलीपर्यंत बहुसंख्य बाबी परंपरेशी असणारे त्यांचे नाते दर्शवितात. मात्र परंपरेतील कालबाह्य मूल्ये, रूढींचे अवडंबर, धार्मिकतेचे प्रदर्शन यापासून ते खूपच लांब राहतात.

‘अंडरस्टेटमेंट’ हे दिलीपकुमारच्या अभिनयाप्रमाणे गुलजारांच्या जगण्याच्या व लिहिण्याच्या शैलीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे ते कधीही कर्कश होत नाहीत. अतिशय संयमित शैलीत अंगारासारखा दाहक किंवा प्राजक्तासारखा कोमल आशय रसिकांपर्यंत पोहोचविणे ही त्यांची खासियत आहे. आपल्या निष्ठांशी प्रामाणिक राहून आपले म्हणणे आपल्या शैलीत खणखणीतपणे ते गेली सहा दशके ऐकवीत आले आहेत.

हा मुळात प्रेमकवी आहे. सर्व भेदांपलीकडे जाणारे प्रेम हे त्याच्या लेखनाचे केंद्रीभूत तत्त्व व प्रेरणा आहे. आपल्या दीर्घ प्रवासात त्याने आपली निरागसता जपली आहे. म्हणूनच ‘चड्डी पहन के फूल खिला है’पासून ‘किताब’ व ‘बोस्कीच्या पंचतंत्रा’पर्यंत मुलांशी नाते जोडणाऱ्या असंख्य रचना तो निर्माण करू शकला आहे.

आजचा काळ कर्कशता, दांभिकता, अवडंबर यांना महत्त्व देणारा आहे. उर्दू ही ‘परकीय’ व ‘परकीयांची’ भाषा आहे, अशा घोषणा करण्याचा हा काळ. असंख्य तोंडांनी एकाच वेळी वेगवेगळे बोलणाऱ्या नेत्यांची चलती असणारा हा स्किझोफ्रेनिक जमाना आणि त्यात अचानक एका अशा कलाकाराचा गौरव होतो जो शीख धर्मात जन्मलेला, हिंदू युवतीशी लग्न केलेला आणि मीनाकुमारी या मुस्लीम मैत्रिणीच्या आजारपणात तिच्या वतीने रोझे ठेवणारा (काहीसा मुसलमान?) माणूस आहे. तो अभिमानाने उर्दूत लिहितो. त्याच्या अंतर्मनाच्या दिवाणखान्यात टागोरांची प्रार्थनागीते, गालिबचे शेर, मीरेची विरहव्याकूळ पदे, यांच्यासोबत पंचमच्या हास्याचे काही तुकडे विखुरलेले दिसतात. त्याच्या जन्मगावातली गोड्या पाण्याची विहीर, परस्परांच्या गळ्यात गळा घालून पहुडलेले मंदिर आणि मशीद यांच्याशी त्याची लाडकी टेनिसची रॅकेट गप्पा मारते. बाहेर मोगली काही शहरी मुलांसोबत खेळताना दिसतो.

ज्ञानपीठ पुरस्काराने या साऱ्याचा सन्मान झाला आहे. येथील मातीचे मर्म जाणणाऱ्या असंख्य भारतीयांना या दुर्लभ योगाने अत्यंत हर्ष झाला, यात काय नवल?

ravindrarp@gmail.com