गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी... | Before accusing Mahatma Gandhi... | Loksatta

गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

महात्मा गांधीजींच्या ७५ व्या स्मृतिदिनी गांधी स्मारक निधी, नागपूर तर्फे जे.आर. कोकंडाकर यांचे ‘गांधीजींना समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकातील हे अंश, गांधीजींविषयीच्या अपप्रचारालाच सामान्यजन बळी पडताहेत हे ओळखून त्यावर उत्तर शोधणारे…

Mahatma Gandhi, Pakistan, partition, Muhammad Jinnah, Nathuram Godse
गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

जयंत आर. कोकंडाकर

‘महात्मा गांधी हे भारतात अटळ आहेत’ असे उद्गार मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांनी त्यांच्या 1959 मधील एकुलत्या एक भेटीत काढले होते.आणि हे खरेच आहे. गांधीजींना आम्ही कधी नाकारलेच नाही – कधी अतीव प्रेमापोटी तर कधी अतीव घृणेपोटी. एवढे मात्र खरे की, या दोन्ही अतिरेकांमुळे खर्या गांधीजींचेआकलन आम्हा सर्व-सामान्यांना झालेच नाही हे खेदाने नमूद करावे लागेल.

हे केवळ गांधीजींच्या बाबतीच घडले असे नव्हे. अनेक प्रादेशिक अथवा राष्ट्रिय विभूतींबाबत आपण हेच करत आलो आहोत. एक तर आपण त्यांना काही समाज वर्गापुरतेच मर्यादित करून ठेवले आहे किंवा एकदम विश्वमानव करून टाकले आहे. इतिहासाचे संदर्भरहित दाखले देऊन अथवा त्यांची तोडमोड करून आपल्यातील काही विद्वान अशा महान विभूतींबद्दल साधक-बाधक भडक विधाने करत असतात व संपूर्ण समाजात विद्वेषाचे बिज पेरत असतात. स्वतः मात्र सुखासिन जीवन जगत असताना त्यांच्या विभूतींनी व विशिष्ट जनसमूहाने किती अन्याय सहन केले, किती यातना भोगल्या याचे अतिरंजीत वर्णन करून, भावनावश आवाहनं करून, दुसर्यांवर आगपाखड करून समाजात कायम असंतोषाचे वातावरण निर्माण करत असतात. आपल्याकडे असे अनेक विद्वान निर्माण झाले आहेत जे एकिकडे भारतीय संविधानाचे, भारतीय एकात्मतेचे गोडवे तर गात असतात मात्र दुसरीकडे या एकात्मतेला जाणून-बुजून अथवा अनावधानाने खिंडार पाडण्याचे प्रयत्न करत असतात. केवळ राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही, कारण त्यांच्या हातात कोलीत देणारे हे विद्वानच असतात ना! दुर्दैवाने बरीच प्रसारमाध्यमेदेखील या विद्वानांच्या वक्तव्यांना विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली प्रसिद्धी देतात. अशा तथाकथित विद्वान, राजकारणी आणि प्रसारमाध्यमं यांच्यात जणू देशाची तोडफोड करण्यात अहमहमिका सुरू आहे का असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. या अशाच स्पर्धेचे बळी पडत आलेले गांधीजी हे केवळ एक उदाहरण आहे. गांधीजींचे विचार हे सर्वसमावेशक, सर्वांचे हित जपणारे आणि जाती-भेद, धर्म-भेद या पलीकडील असल्यामुळे खरेतर सर्वांना हवे-हवेसे वाटायला पाहिजेत. परंतु वरचेवर संकुचित वृत्ती वाढत आहे व अशी वृत्ती असणाऱ्यांना विशाल अंतःकरणाचे वावडे असते. म्हणून गांधीजी त्यांना नकोसे असतात.

गांधीजींना त्यांच्या ज्या अपयशांबद्दल दुषणे दिली जातात ते खरेच त्यांचे अपयश होते का याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. गांधीजींना काहीजण फाळणीचे जनक मानतात, काही वर्गाला गांधीजींचे मुस्लिमाविषयींचे एकतर्फी प्रेम खटकते.स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष भ्रष्ट राजवट चालवणारा निघाला म्हणून गांधीजींना दुषणे दिली जातात.

विश्लेषण : महात्मा गांधींना आजपर्यंत नोबेल पुरस्काराने सन्मानित का करण्यात आलं नाही? काय सांगतो इतिहास?

सत्य हे आहे की गांधीजींनी शेवटपर्यंत देशाच्या फाळणीला विरोध केला. ‘देहाचे दोन तुकडे झाले तरी चालतील पण विभाजनाला शेवटपर्यंत माझा विरोध राहिल’ असे गांधीजींचे म्हणणे होते. चर्चेची सर्व दरवाजे बंद झाल्यावर व त्यांच्याकडे दुसरी पर्यायी योजना नसल्यामुळे गांधीजींना फाळणी नाइलाजास्तव स्वीकारावी लागली. फाळणीनंतरही हे दोन्ही भाग जुळण्याची त्यांना आशा होती. हिंदू-मुस्लिम दंगली त्यांच्या बलिदानानेच शांत झाल्या हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचे विसर्जन करावे अशी लेखी सूचना त्यांनी त्यांच्या बलिदानाच्या आदल्या दिवशी केली होती. दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्यांचा अंत झाला. मुस्लिम लीगने केलेली पाकिस्तानची मागणी गैरइस्लामी म्हणजेच इस्लामविरोधी आहे असे गांधीजींचे म्हणणे होते. ही मागणी पापयुक्त आहे असे ते म्हणत. गांधीजींनी फाळणीचा ठपका मुस्लिम लीगवर ठेवला.

‘‘मानवी एकता व बंधुत्व यांचे इस्लाम समर्थन करतो ना की मानवी कुटुंबाची वाताहत,” अशा स्पष्ट शब्दात त्यांनी मुस्लिम लीगवाल्यांना सुनावले होते. “भारताचे दोन लढाऊ गटात तुकडे करणारे हे भारत व इस्लाम या दोन्हींचे शत्रू आहेत. ते माझ्या शरीराचे तुकडे करू शकतात मात्र जे मी अयोग्य समजतो त्यासाठी मला ग्राह्य धरू शकत नाहीत,”अस? गांधीजींचे म्हणणे होते. गांधीजींचा हा स्पष्ट नकार पुढे होकारात कसा बदलला की गांधीजींचा निरुपाय झाला होता म्हणून त्यांना ग्राह्य धरले गेले याची शहानिशा करण्याचे सोडून, गांधीजींना ‘बळीचा बकरा’ बनवून विभाजनाचे संपूर्ण अपयश त्यांच्या माथी मारण्याचे पाप काँग्रेसजन आणि काँग्रेसविरोधी गट या दोघांनीही केले आहे. सत्याला बाजूला सारून असत्य सुरांची आळवणी करण्यात माणूस कसा गुंतून राहतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. काँग्रेसवाल्यांनी रक्तपात टाळण्यासाठी गांधीजींना डावलून फाळणी स्वीकारली. पण काय झाले? मनुष्यहानी टळली का? रक्तपात टळला का? शेवटी गांधीजींच्या प्रयत्नामुळे व बलिदानामुळे हिंसा थांबली याची तरी आपण आठवण ठेवणार आहोत का की ते श्रेयही आपण त्यांच्यापासून हिरावून घेणार आहोत?

भारतीय स्वातंत्र्याचे श्रेय गांधीजींना का द्यायचे, सुभाषबाबूंच्या सशस्त्र उठावाचे ते फलित नव्हे का असा सवाल वारंवार उठवणाऱ्यांना एकच विचारावेसे वाटते की भारतीय समाज गांधीजींच्याच मागे का गेला, सुभाषबाबूंच्या पाठीशी का उभा ठाकला नाही? ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी देणाऱ्या खुद्द सुभाषबाबूंनासुद्धा या श्रेयाचे महत्त्व वाटले नसेल कारण हे दोन्ही महान नेते श्रेयासाठी नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. क्षुद्र मनोवृत्तीच्या आम्हा पामरांना त्या दोघांमध्ये सौख्य होते की वितुष्ट, त्यांच्यात श्रेष्ठ कोण होते- नेताजी की गांधीजी-हेच चिवडण्यात आनंद मिळत असेल तर ज्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही बलिदान दिले ते हेच लोक का असा प्रश्न या दोघांच्याही आत्म्यांना पडत असेल. केवळ गांधीजी व सुभाषबाबू नव्हे तर इतर ही महान नेत्यांबाबत, विभूतींबाबत आपण हेच करत आलो आहोत. त्याकाळी विविध मनोवृत्तीच्या, विचारसरणीच्या, कार्यशैलीच्या पण स्वातंत्र्य हे एकच ध्येय असलेल्या नेत्यांमध्ये आपापसात जेवढे वितुष्ट नसेल त्यापेक्षा जास्त द्वेषभावना त्यांच्या तथाकथित अनुयायांमध्ये एकमेकाविषयी आहे हे पाहून आश्चर्य व खेद वाटतो. आणि मग कळू लागते की परस्परांविषयी प्रेमभावना बाळगण्याचे आवाहन, हिंसेला जीवनात थारा न देण्याची विनंती गांधी नावाच्या महात्म्याने आपल्याला वारंवार का केली आहे.

चतु:सूत्र : यंत्र हवे, पण ते ‘माणसा’साठी!

गांधीजींना मुस्लिमांचा अनुनय करणारे म्हणून अनेक हिंदू जेव्हा हिणवतात तेव्हा ते एक विसरत असतात की गांधीजींचे हिंदू धर्मावर जीवापेक्षा जास्त प्रेम होते. ते खर्या अर्थाने सनातनी हिंदू होते. अहिंसेचे समर्थक असणारे गांधीजी एके ठिकाणी म्हणतात,“आपल्या स्त्रिया व आपल्या धर्माची पूजा-स्थानं यांचे संरक्षण जर अहिंसेने करू शकला नाही तर खरा मर्द त्यांचे संरक्षण लढून करील” गांधीजींची अहिंसा ही भित्र्या माणसाची अहिंसा नव्हती. दोन जुलै १९४७ रोजी गांधीजींनी हिंदू महासभेच्या सभासदापुढे व्यक्त केलेले मनोगत याची साक्ष देते. ते म्हणतात,‘मी अजूनही फाळणीग्रस्त भारत हा एकच देश मानतो. मान्य की एक भाग त्याच्यापासून विलग झाला आहे आणि तो आता पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाईल. पण दोन्ही भागांचे रहिवासी भारतीयच असतील. म्हणून पाकिस्तानात राहणार्या हिंदूनी स्वत:ला भारतीय समजावे आणि या आत्मियतेच्या नात्याने भारत सरकारची जिम्मेदारी बनते की त्यांनी या हिंदूंना त्यांच्या संकटकाळात मदत करावी व संरक्षण द्यावे. पाकिस्तानामधील मुस्लिम जर स्वतःला वेगळ्या वंशाचे समजत असतील आणि भारतातील जे मुस्लिम पाकिस्तानातील मुस्लिमांशी संबंधित असतील व ते सुद्धा स्वत:ला वेगळ्या वंशाचे समजत असतील तर ते सगळे परकीय समाज समजल्या जातील व भारतीय नागरिक असल्याच्या विशेषाधिकारांना ते मुकतील. परदेशवासियांना जे नियम लागू होतात तेच नियम त्यांना पण लागू होतील. पण मला असे वाटते की भारतीय मुस्लिम असे वागणार नाहीत.’ पुढे गांधीजी म्हणतात,‘देशद्रोह्यांना मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही. त्यांना गोळ्या मारून ठार केले पाहिजे, जरी तो माझा मार्ग नाही.’ गांधीजींच्या अहिंसेचा व देशप्रेमाचा हा पैलू पुढे आणण्यास काँग्रेस समर्थक का कमी पडले हा संशोधनाचा विषय आहे. असे इतके स्पष्ट असताना अजूनही आपण फाळणीसाठी गांधीजींना ‘बळीचा बकरा’ बनवणार का ?

असत्याचे प्रयोग

५५ कोटी रुपये पाकिस्तानला देण्याविषयी गांधीजींनी तथाकथित केलेल्या उपवासाविषयीसुध्दा असाच गैरसमज आहे. ५५ कोटी रुपये हे स्वतंत्र भारताचे पाकिस्तानला करारानुसार देणे होते. ते दिले नसते तर हा वाद राष्ट्रसंघात व आंतरराष्ट्रिय न्यायालयात गेला असता व भारतास ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेच लागले असते . नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतास गांधीजींनी या मानहानीपासून वाचवले. ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेत या प्रश्नाचा गांधीजींच्या उपवासाशी संबंध लावणे चूक आहे असे दिवंगत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणतात. गांधीजींचा उपवास १८ जानेवारी १९४८ पर्यंत चालला होता. ५५ कोटी रुपयांचे देणे १४ जानेवारीला देण्यात आल्यानंतरही गांधीजीचा उपवास सुरूच होता. तो मूलतः शांतता प्रस्थापित करण्यासाठी होता.

याच ठिकाणी काश्मिरात पाकिस्तानविरुद्ध फौजा पाठवण्याच्या भारत सरकारच्या कारवाईला गांधीजींचे समर्थन होते हे ही विसरता कामा नये. युध्दाची भाषा उघडपणे करणारे पहिले व्यक्ती गांधीजीच होते.

विश्लेषण : नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि का छापला? वाचा इतिहास…

कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करण्याचा सर्वांना अधिकार असावा हे जेवढे खरे आहे तेवढेच त्यासाठी योग्य विद्वत्ता, निरपेक्षभाव व कालसापेक्ष भान सर्वांठायी असणे आवश्यक आहे हे ही खरे. महान विभूती चुका करत नाहीत हे म्हणणे जेवढे चुकीचे ठरेल, तेवढेच त्यांच्या चुकांना अक्षम्य, न दुरुस्त करता येणाऱ्या असे ठरवून मोकळे होणे हे ही चुकीचे ठरते.असे ठरवून आपण आपल्यातील दोष, कमतरता, उणिवा यावर पांघरूण घालत असतो. इथपर्यंत तरी ठीक म्हणता येईल, पण यापुढे जाऊन महान विभूतींचा आपण द्वेष करू लागतो तेव्हा तो दोष त्या विभूतीत नसून आपल्यात आहे हे आपण सिद्ध करू लागतो. शतकानुशतके श्रद्धास्थान असलेल्या व्यक्ती, वस्तू वा वास्तू (आणि गांधी नावाचा महात्मा जन्मून आता दीडशेच्यावर वर्षे झाली आहेतच) यांच्याविषयी विनाकारण वादग्रस्त, असभ्य, अतार्किक व अश्रध्द, द्वेषाने प्रेरित विधाने करून आपण आपला नाकर्तेपणाच सिद्ध करत असतो. कोणाला तरी ‘बळीचा बकरा’ बनवण्याची सवय लागल्याने आपले वर्तमान व भविष्य हे दोन्ही आपण धोक्यात आणत असतो हे जेवढे लवकर लक्षात आले तेवढे ते आपल्यासाठी चांगले.

लेखक अर्वाचीन भारताचे अभ्यासक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 10:25 IST
Next Story
जनगणना होईल तेव्हा होईल, तोवर ‘बहुआयामी गरिबी’ तरी पाहा…