डॉ. द. दि. पुंडे
मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी नुकतीच आपल्या आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण (१ ऑक्टोबर) केली. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मी त्यांचे तमाम मराठी वाचकांच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना भरघोस शुभेच्छाही देतो.

डॉ. उमा यांचे प्रचंड मोठे अनुवादकार्य आपणा सर्वांसमोर आहे. त्यांना रसिक मराठी वाचकांचा सानंद प्रतिसाद लाभलेला आहे. गेली दहाएक वर्षे त्यांचा मराठीच्या साहित्यक्षेत्रातील वावरही वाढलेला आहे. अनेक साहित्य संस्थांकडून त्यांना व्याख्यानांसाठी अध्यक्षपदांसाठी, प्रमुख पाहुणे पदासाठी, पारितोषिके वितरणासाठी वा अन्य सन्मान्य पदांसाठी निमंत्रित केले जाते आहे. तात्पर्य- त्यांच्या सौदर्यसंपन्न अनुवादकार्यामुळे मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातील त्यांचा शुभंकर पदरव वाढलेला आहे.

सर्वप्रथम मी येथे अनुवाद या साहित्य प्रक्रियेसंबंधाने काही वैचारिक मंथन करू इच्छितो. अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे १९७०-७१ पर्यंत अखिल जगतातील वाङ्मय क्षेत्रामध्ये अनुवादित कृतीला आणि अनुवादकालाही दुय्यम दर्जा दिला जात असे. स्वतंत्र लेखन करणाऱ्या लेखक महोदयांच्या प्रतिभायुक्त प्रांगणात अनुवादक जणू अंग चोरून उभा असायचा. परंतु १९७०-७५ च्या काळात युरोप-अमेरिकेच्या जिज्ञासू अभ्यासकांच्या अनुवाद प्रक्रियेचा सखोल व नीटस अभ्यास केला. त्या त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या हाती असे सत्य बाहेर आले, की अनुवाद प्रक्रिया हीदेखील एक नवनिर्मितीच आहे. अनुवादासाठी काहीएक विशिष्ट पूर्णत: स्वतंत्र अशी प्रज्ञा, प्रतिभा असावी लागते आणि तिच्याशिवाय सुललित व आनंददायक अनुवादकार्य निर्माण होऊ शकत नसते. या विचाराच्या परिणामी तिकडे ‘अनुवादविद्या’ हे वाङ्मयविद्योपेक्षा पूर्णत: वेगळे असे अभ्यासक्षेत्र निर्माण झाले. इटलीमधील विद्यापीठात अनुवादविद्योचा स्वतंत्र विभाग उभारला गेला. तेथे काम करणाऱ्या सुसान बॅसनेट-मॅक्ग्वायर या विदुषीने ‘ट्रान्सलेशन स्टडीज’ (१९८२) या नावाचा पूर्णत: सैद्धान्तिक असा इंग्रजी ग्रंथच जगाच्या विचारासाठी सादर केला. तदनंतर लगेचच म्हणजे १९८८ मध्ये अनुवादविद्या विचारासाठी अधिक चर्चाचिकित्सा करणारा ग्रंथ अभ्यासकांसमोर आला. या ग्रंथाच्या लेखिका आहेत मेरी स्नेल-हॉर्नबी आणि ग्रंथनाम आहे, ट्रान्सलेशन स्टडीज टोवर्ड्स अॅन इंडिग्रल अॅप्रोच!

सारांश, सुसान बॅसनेट-मॅक्ग्वायर यांच्या ग्रंथाने अनुवाद ही स्वतंत्र, स्वयंपूर्ण निर्मिती असल्याचा सिद्धान्त मांडला; तर मेरी स्नेल-हॉर्नबी यांनी अनुवाद ही दोन भाषांमध्ये घडणारी आदानप्रदानाची साधीसुधी, सोपी वाङ्मयीन घटना नसून ती दोन संस्कृतीमध्ये घडणारी एक शुद्ध वाङ्मयीन आंतरक्रिया असते हा विचार प्रसृत केला. साहजिकच अनुवादकाला वाङ्मय क्षेत्रामध्ये सन्मानाने स्वीकारले जाऊ लागले.

अनुवादविषयक या संक्षिप्त चर्चेच्या पार्श्वभूमीवर डॉ. उमा कुलकर्णी यांच्या अनुवादकार्याकडे एक स्वतंत्र प्रतिभेची सर्वांगसुंदर निर्मिती म्हणून अवश्य पाहता येते. एक सिद्धहस्त अनुवादक म्हणून आज त्यांचे नाव गौरवाने का घेतले जाते याचाही आपणास बोध होतो. डॉ. उमा यांची १९८२ मध्ये डॉ. शिवराम कारंत यांच्या ै‘तनमनाच्या भोवऱ्यात’ या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद केला. हा अनुवाद त्या वेळी अर्थातच नवखेपणाच्या खाणाखुणांनी भरलेला होता. (पण नंतर काही काळाने त्यांनी तो अनुवाद परत नव्याने करून प्रकाशित केला.)

याच काळात उमा कुलकर्णी यांना सुंदर शैलीत मराठी बोलू-लिहू शकणारी एक जिवाभावाची मैत्रीण लाभली. उमाताईंच्या ‘वंशवृक्ष’ या डॉ. एस. एस. भैरप्पा लिखित कादंबरीच्या अनुवादाचे हस्तलिखित वाचताना त्या मैत्रिणीने उमाताईंना स्वत.च्या शेजारी बसवून घेतले आणि आवश्यक तेथे सुधारणा करताना तिने त्यांना सुललित शैलीतील मराठीच्या लेखनामधील वाटावळणांची व्यवस्थित ओळख करून दिली. उमाताईंना एवढी शिकवणी पुरली आणि काही दिवसांतच त्यांचा ‘वंशवृक्ष’चा मराठी अनुवाद ‘प्रतिमा प्रकाशना’सारख्या सुप्रसिद्ध संस्थेतर्फे मराठी वाचकांपर्यंत पोहोचला. मराठी वाचकांचा या अनुवादित कादंबरीला जोरदार प्रतिसाद मिळाला. आता डॉ. उमाताईंच्या हाती अनुवादाची गुरुकिल्ली आली होती. त्यांनी एकापाठोपाठ एक याप्रमाणे डॉ. भैरप्पा यांच्या ‘पर्व’, ‘चंद्र’, ‘जा ओलांडूनी’, ‘काठ’, ‘तंतू’ अशा अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद केले. मराठी रसिकाला हे सर्व अनुवाद चांगलेच भावले. एवढेच नव्हे तर ‘पर्व’ आणि ‘मंद्र’चे अनुवाद केवळ वाचक वर्गातच नव्हे तर मराठी समीक्षेतही उलटसुलट चर्चाविषय ठरले. डॉ. उमा यांनी डॉ. भैरप्पांच्या बहुतांश कादंबऱ्यांचे मराठीत अनुवाद केले खरे, पण त्या त्याच वेळी त्यांनी शिवराम कारंथ, यू. आर. अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदही, चंद्रशेखर अंबार इत्यादी आणखीही काही कथात्म साहित्याच्या लेखकांची ओळख, आपल्या अनुवादित कृतीद्वारे मराठी वाचकांना करुन दिली. उमाताईंनी कर्नाटकातील कन्नड साहित्याच्या सर्व प्रवाहांची अगदी नवसाहित्यापर्यंतच्या प्रवाहांचे जणू समग्र वार्तांकनच आपल्या अनुवादांद्वारे मराठी रसिकांसाठी केलेले आहे. तात्पर्य डॉ. उमा कुलकर्णी यांचे एकूण लेखन म्हणजे विसाव्या-एकविसाव्या शतकांच्या प्रवाहातील एक ‘वाङ्मयीन घटना’च (लिटररी इव्हेन्टच) होय.

डॉ. उमा यांच्या लेखनामागे त्यांचे चारेक वर्षापूर्वी दिवंगत झालेले पतिराज विरुपाक्ष कुलकर्णी यांची प्रेरणा होती. त्या उभयांच्या सांसारिक जीवनाप्रमाणेच त्यांचे वाङ्मयीन जीवनही हातात हात घालून सुखासमाधानाने चाललेले होते. कारण स्वत: विरुपाक्ष यांच्याकडेही वाङ्मयीन प्रतिभा होती; मुख्य म्हणजे वाङ्मयाचा रसिकतेने आस्वाद घेण्याची सकारात्मक वृत्ती होती. त्यामुळे विरुपाक्षांनी उमाताईंना सातत्याने ‘सक्रिय’ पाठिंबा दिलेला होता. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून मी डॉ. उमाताईंच्या या अभिनंदनदिनी त्यांच्या आत्मतत्त्वास आदरांजली वाहतो.

डॉ. उमा कुलकर्णी यांच्याठायी स्वतंत्र ललित लेखन करण्याची प्रज्ञाप्रतिभा अवश्य आहे. ही गोष्ट त्यांनी लिहिलेल्या ‘केतकरवाहिनी’ या एकमेव पण कमालीच्या लोकप्रिय झालेल्या कादंबरीवरून कळते. ‘केतकरवाहिनी’च्या पाचही आवृत्या हातोहात संपलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर या कादंबरीचे कन्नड, गुजराती आणि हिंदी भाषेत अनुवाद झालेले आहेत. या कादंबरीवर सिनेमा निघण्याचेही वाटत होते.

याच्या परिणामी उमाताईंकडे अशाच धीरोदात्त तीन स्त्रियांवर कादंबरी लिहिण्याचे प्रस्ताव आलेले होते. पण उमाताईंनी तो मोह निश्चयाने टाळला. का टाळला? आपली साहित्यनिर्मिती अनुवादाशीच एकनिष्ठ ठेवण्याचे एक जणू व्रत डॉ. उमा कुलकर्णी यांनी आपल्या हृदयी बाळगलेले आहे. त्या एकच ब्रीद मनी बाळगून आहेत आणि ते आहे ‘अनुवादे प्रकट व्हावे’…
लेखक प्राध्यापक तसेच ज्येष्ठ साहित्यिक आहेत.