डॉ. अजित कानिटकर
भारतासारखा विकसनशील देश असो वा फ्रान्ससारखा विकसित देश… दर्जेदार, परवडणाऱ्या अन्नधान्याचा तुटवडा, शेतकऱ्यांच्या श्रमांना तुटपुंजा मोबदला आणि बेरोजगारी या समस्या दोन्हीकडे आढळतात….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे शीर्षक पाहून अनेक जण बुचकळ्यात पडू शकतील. हे चार वेगवेगळे शब्द एका लेखात काय सांगणार, असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडेल. पण गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटना पाहिल्यानंतर या चार शब्दांचे एकमेकांतले गुंतलेले अर्थ आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यापूर्वी एक आठवण म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनी, फ्रान्सचे पंतप्रधान इमान्युएल माक्राँ हे भारतात आले होते. ते दोन दिवस इथे राहिले. दिल्लीत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यापूर्वी एक दिवस ते जयपूरलाही जाऊन आले होते. जुलै २०२३ मध्ये आपले पंतप्रधान पॅरिसमध्ये ‘बॅस्टिल डे’ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा फ्रान्समधील एक महत्त्वाचा दिवस. हा दिवस तिथे फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी पॅरिसच्या रस्त्यावरील फ्रेंच सैन्याच्या संचलनात भारतातील सैन्यदलाची एक तुकडीही सहभागी झाली होती.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : अपघातानंतरचा ‘आ’!

या बातम्यांमागे दडलेले दोन महत्त्वाचे घटक म्हणजे गेली तीन वर्षे भारताने राफेल विमानांची क्रमाक्रमाने खरेदी करणे आणि त्याच बरोबरीने राष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी लागणारी शेकडो नवी विमाने खरेदी करण्यासाठी एअरबस या फ्रेंच कंपनीकडे मागण्या नोंदविणे. या मागण्या म्हणजे भारतातील खासगी उद्याोगांची फ्रान्सला बहुमूल्य भेट. अमेरिकेतील बोईंग कंपनी तिच्या विमानांच्या हवेत खिळखिळ्या होणाऱ्या दरवाजांमुळे व इंजिनाच्या तंत्रज्ञानावरून चर्चेत असताना फ्रेंच कंपनीचा भाव अधिकच चढा! त्याबरोबरीनेच भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या अनेक वर्षांत संरक्षण क्षेत्र व अन्य क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण झाली. तशी ती पूर्वीपासूनच सुरू आहे. जी २० परिषदेसाठी २०२३ मध्येही माक्राँसाहेब दिल्लीमध्ये येऊन गेले होते. अर्थात भारत-फ्रान्स जवळीक केवळ या तीन घटनांमधील नाही. त्याहीपूर्वी अनेक वर्षांपासूनची आहे, अशी उजळणी भाष्यकारांनी केली. त्यामध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर आपली पाठराखण फ्रान्सने केल्याचाही उल्लेख करण्यात आला! आता या लेखाच्या शीर्षकाचा संबंध आहे, तो भारतीय आणि फ्रेंच जनतेच्या अस्वस्थतेशी!

कला महत्त्वाची की अन्न व उत्पन्न?

पॅरिसमधील लूव्र संग्रहालय जगामध्ये उत्कृष्ट संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात. अनेक दिवस वेळ काढूनही प्रदर्शन बघून पूर्ण होणार नाही व मनाचे समाधान होणार नाही अशा जगभरातील अनेक कलाकृती येथे आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या संग्रहालयातील मोनालिसाचे चित्र पाहण्यासाठी अक्षरश: जगभरातील कलारसिक तासनतास रांगा लावतात. याच मोनालिसाच्या चित्रासमोर १५ दिवसांपूर्वी एक सनसनाटी घटना घडली. दोन महिला प्रेक्षकांनी त्यांच्या हातात असलेले टोमॅटो सूपचे ग्लास मोनालिसाच्या चित्रावर भिरकावून रिते केले. त्यानंतर त्या ज्या संघटनेमध्ये काम करतात त्या संघटनेचे नाव (FOOD RIPOSTE) लिहिलेले स्वत:चे कपडे छायाचित्रकारांसमोर दाखवले. कला महत्त्वाची का नागरिकांसाठी सुरक्षित अन्न व शेतकऱ्यांना रास्त उत्पन्न? असे प्रश्न त्यांनी विचारले. हा आक्रोश फ्रान्स सरकारच्या पर्यावरणाबद्दलच्या बोटचेप्या धोरणाविरोधीही होता. मोनालिसा बंद काचेच्या आत असल्याने तिला सूपचा प्रसाद मिळाला नाही मात्र सुरक्षित अन्न व दुर्लक्षित शेतकरी याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे हे उद्दिष्ट मात्र साध्य झाले.

हेही वाचा >>> संविधानभान : भारतीय संस्कृतीचा चित्रमय कोलाज

या व्यक्तिगत आक्रोशपाठोपाठ पॅरिसमध्ये आणखी एक आंदोलन हळूहळू वेग घेत होते, ज्याचे आपल्याकडील काही वृत्तपत्रांत त्रोटक वृत्त आले होते. फ्रान्समधील छोट्या-मोठ्या अनेक शहरांतून पॅरिसला वेढा देण्यासाठी ट्रॅक्टरमधून शेकडो शेतकरी हमरस्त्यांवर उतरले होते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल व सरकारच्या युरोपीय महासंघाला शरण जाण्याच्या धोरणाबद्दल त्यांचा हा निषेध होता. आम्ही ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करून पॅरिसची नाकाबंदी करू अशी धमकीही त्यांनी आठवडाभर दिली. या आंदोलनाचे लोण शेजारच्या बेल्जियम, जर्मनीमध्ये पसरले. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, स्वस्त आयात बंद करा, आयातीमुळे शेती परवडत नाही, शेतकऱ्यांचे भले करणारी सोपी सुलभ धोरणे आखा, अशा त्यांच्या मागण्या होत्या. तेथील शेतकऱ्यांची राष्ट्रीय संघटना, ‘नॅशनल फेडरेशन ऑफ अॅग्रिकल्चरल होल्डर्स युनियन’ या आंदोलनाचे नेतृत्व करीत होती. ऑलिम्पिक स्पर्धांच्या वर्षात पॅरिसची अशी नाकेबंदी होणे त्या सरकारला परवडणारे नाही. सहा-सात दिवसांच्या या नाकेबंदीनंतर फ्रेंच सरकारने नमते घेतले. ताबडतोब वाटाघाटी करून पॅरिसला येणारे रस्ते खुले केले. २०२४ च्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांच्या आधीच जणू काही शेतकऱ्यांनी रंगीत तालीम केली होती.

हा लेख लिहिला जात असतानाच नोएडा व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. सरकारने विकत घेतलेल्या जमिनींचे पडेल भाव त्यांना मान्य नाहीत. त्यांना या भावात मोठी वाढ अपेक्षित आहे. आपल्या देशात शेतकऱ्यांची अशी आंदोलने गेली अनेक वर्षे होत आहेत. चार वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या तीन शेती सुधार कायद्यांच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांनी राजधानीला वेढा घातला होता. त्यांच्या जवळपास नऊ महिने झालेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारला हे तिन्ही कायदे मागे घ्यावे लागले होते. मोनालिसाला मिळणारा टोमॅटो सूपचा प्रसाद हे एक प्रतीक आहे. शहरातील अभिजन आणि मातीशी जवळीक असणारा बहुजन यातील वाढत्या दरीचे ते निदर्शक आहे. शेतकऱ्याच्या असाहाय्यतेचा आणि बेभरवशाच्या शेतीचा व ती कसणाऱ्या समाजाचा हा आक्रोश आहे. टोमॅटोला कधी ८० रुपये भाव मिळतो, तर कधी हेच भाव पाच-दहा पैशांपर्यंत गडगडतात. डाळ कधी १५० रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जाऊ लागते आणि तसे झाले की ताबडतोब आयातीची घोषणा होते. भाव लगोलग घसरतात. स्वत:च्या शेतावर ट्रॅक्टर चालवून पीक भुईसपाट करणाऱ्या शेतकऱ्यांची दृश्ये आपल्या देशाला नवीन राहिलेली नाहीत.

मध्यंतरी नव्या संसदेतील सुरक्षारक्षकांचे कडे भेदत काही युवकांनी सभागृहात रंगीत वायूच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेवरील वक्तव्यांमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षातील काही ज्येष्ठ नेते वादात सापडले होते. त्यांनी हा बेरोजगार युवकांचा आणि संतप्त पिढीचा आवाज आहे, अशा आशयाची वक्तव्ये केली होती. अन्यही राजकीय पक्षांनी हे योग्य की अयोग्य याविषयीच्या भूमिका आपापल्या परिप्रेक्षातून घेतल्या होत्या. आपण सध्या तरी विकसनशील गटात मोडणारा देश आहोत, पण आपल्यापेक्षा किती तरी संपन्न अशा फ्रान्समध्येही इथल्यासाखीच अस्वस्थता आहे. शेतकरी वर्गात असंतोष आहे. मोनालिसाच्या चित्रावर सूप फेकणे, ट्रॅक्टरने पॅरिसला वेढा घालणे आणि चक्काजाम या घटना जगाला पुन्हा एकदा जागे होण्यासाठी साद घालणाऱ्या आहेत. आपण त्यातून कधी धडा घेणार?

kanitkar.ajit@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India and france face unemployment problem of low compensation to farmers zws