संगीताच्या संक्रमण काळात, म्हणजे ए. आर. रेहमानच्या उदयानंतर आणि कॅसेटयुगाचा अस्तच होत असताना आलेल्या तीन मराठी चित्रपटांतील महानोरांची गीते पुरेशी ऐकली गेली नाहीत. ती आज ऐकल्यास काय जाणवते?
नव्वदोत्तरीमधील मराठी चित्रसंगीतावर हिंदी आणि इंग्रजीचा पगडा पडत असताना आणि त्या गाण्यांतून विनोदी आणि कसनुशा यमकरामी गमजा सुरू असताना देखील मातीचा सहवास घडवून देणाऱ्या गीतांची बरसात ना.धों. महानोरांनी केली होती. ‘सर्जा’, ‘जैत रे जैत’ किंवा ऐंशीच्या दशकातील सगळ्याच गाजलेल्या गाण्यांची मनउजळणी ना.धोंच्या निधनानंतर झाली असली, तरी नव्वदोत्तरीत आणि त्या पुढल्या दशकातही या निसर्गकवीने अव्वल शब्दरचनांची मैफल गाण्यांतून रंगविली. यासाठी आनंद मोडकांनी संगीतबद्ध केलेल्या १९९४,१९९५ सालातील दोन चित्रपटगीतांची खास आठवण काढता येऊ शकेल. एकीकडे दक्षिणेकडच्या रेहमानी संगीताच्या आक्रमणामध्ये अबालवृद्ध कानशरण झालेले असताना आणि दुसरीकडे उत्तरेकडील पारंपरिक संगीत हरवण्याच्या वाटेवर असताना या दोन वर्षांत सलग महानोर यांची गाणी ‘मुक्ता’, ‘दोघी’मधून झंकारली. निशिकांत सदाफुले या संगीतकाराच्या ‘अबोली’ या चित्रपटांमधूनही ती वाजली.
मुंबई आणि उपनगरांत तेव्हा ’आरपीजी-एचएमव्ही’ने किंवा अलुरकर म्युझिक कंपनीने काढलेल्या मराठी चित्रपटांच्या ‘कॅसेट’ मिळणे दुरापास्त होऊ लागले होते. कारण मराठी चित्रपट येतात कधी, जातात कधी आणि त्यांची गाणी वाजतात कुठे आणि कधी, अशी परिस्थिती होती. त्यामुळे या गाण्यांचे ना रेडिओतून प्रमोशन होत होते, ना टीव्हीवर त्यांना हवी तितकी प्रसिद्धी मिळत होती. त्यामुळे या कॅसेट्सची खरेदी मुंबई आणि उपनगरांत शून्य स्वरूपाचीच होती. पुणे-कोल्हापुर आणि निमशहरी भागांतूनच या चित्रपटगीतांच्या कॅसेट्सना मागणी होती. आख्ख्या मुंबई शहरासाठी ‘रिदम हाऊस’ या फोर्टातल्या एकमेव दुकानातील मराठी दालनात या गाण्यांच्या तुरळक कॅसेट्स मिळत होत्या.
‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘अबोली’ या तिन्ही चित्रपटांतील गाण्यांची गंमत म्हणजे ‘जैत रे जैत’ आणि ‘सर्जा’ चित्रपटाइतकीच ती निसर्गश्रीमंत आहेत. पण त्यातील सारा बाज हा अत्याधुनिक बनलेल्या ‘वेस्टर्न’ संगीताचा आहे.
मुक्ता चित्रपटातील ‘त्या माझिया देशातले, पक्षी निळे जांभळे’ हे गाणे ऐकताना आपण त्या काळातील संगीत संक्रमणाच्या अवस्थेतील नव्याने येणाऱ्या संगीताशी एकरूप होणारे गाणे ऐकत असल्याचा अनुभव घेतो. रवींद्र साठे यांच्यासह गाताना जयश्री श्रीराम यांचा गाण्याला असलेला ‘वेस्टर्न मुलामा’ चटकन पकड घेणारा आहे. ‘वळणवाटांतल्या झाडीत हिर्वे छंद’ या गाण्याबाबतही तेच होते आणि ‘जाईजुईचा गंध मातीला’ या गाण्यातील बासरी शब्दांइतकीच मंत्रमुग्ध करीत राहते. पण,
‘आषाढाच्या पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा
दुःख भिरकावून येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला
मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला’ या शब्दांना गाण्याचा आरंभ करण्यापूर्वी जयश्री श्रीराम कानसेनांना तृप्त करतात.
याचे दुसरे सुंदर रूप ‘दोघी’ चित्रपटातील ‘नागपंचमीच्या सणान बाई’ या गीतात सापडते. या गाण्यातील ‘पोरी घालती धिंगाणा’ या शब्दांना, चालीला तसेच शिल्पा दातार, अंजली मराठे यांच्या गायकीला शंभरपैकी शंभर मार्क आहेत. पण मराठी चित्रसंगीत बाद होत असलेल्या काळात ना. धों. महानोर आणि आनंद मोडक यांनी त्याला तारण्याचा नुसता प्रयत्नच न करता, त्या काळच्या रेहमानशरण तरुणांवरही या गाण्यांची छाप पडेल इतके काम या गाण्यांतून करून ठेवले होते. ‘भुई भेघाळली खोल’ हे गाणेदेखील याच पठडीतले होते.
निशिकांत सदाफुुले यांचे संगीत पुढे कधी वाजले किंवा गाजले का, याची कल्पना नाही. मात्र त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अबोली’ चित्रपटातील ‘तुझ्या वाटेला ओले डोळे’ हे गाणे यूट्युबवर लोकप्रिय आहे. याच चित्रपटातील ‘डोंगरघाटातली दाटली हिरवी झाडी ’ हे गीतदेखील महानोरांच्या जुन्या रानगीतांची आठवण करून देणारी.
या तीन चित्रपटांतील गीते अधूनमधून आकाशवाणीवरून प्रसारित होतात. मात्र ही गाणी अर्थातच ‘जैत रे जैत’ किंवा महानोरांच्या ऐंशीच्या दशकातील गाण्यांप्रमाणे ऐकली गेली नाहीत किंवा ऐकली जाऊ शकत नाहीत. याचे मुख्य कारण मराठी गाण्यांना उचलून धरण्यासाठी आणि त्यांना अजरामर करण्यासाठी आदल्या पिढीकडे जी फुरसत होती ती नव्वदोत्तरीतल्या पिढी आणि काळाकडे उरली नाही. वैश्विक संगीतपिंप कानांत ओतले जात असताना आणि कॅसेटयुगाचीच पीछेहाट होत असतानाच्या संक्रमण काळातही महोनोरांची शब्दकळा मात्र किती ताजी आणि टवटवीत राहिली होती. त्याचा दाखला या गाण्यांतून मिळू शकतो.
ही गाणी ऐकण्यासाठी यूट्यूब दुवे :
https://www.youtube.com/watch?v=OwKU3f786w0
https://www.youtube.com/watch?v=DOrmDnEEk34
https://www.youtube.com/watch?v=A-G3FWXCCJ8
https://www.youtube.com/watch?v=QxouBumIgDE
https://www.youtube.com/watch?v=StIwUXECjV0
https://www.youtube.com/watch?v=qOVegMkIMI0
https://www.youtube.com/watch?v=R8QbnvcM-fw