• आनंद पवार

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असावी काय, याविषयीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू करताना भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी (१८ एप्रिल) एक महत्त्वाचे विधान केले. “स्त्री अथवा पुरुष या परमकोटीच्या (ॲब्सोल्यूट) संकल्पना नसून, एखाद्या व्यक्तीचा लिंगभाव हा निव्वळ जननेंद्रियांवर ठरत नसतो” अशा अर्थाचे ते विधान दुसऱ्या दिवशीच्या अनेक वृत्तपत्रांचा मथळा ठरले. ही सुनावणी पुढे सुरू राहणार असल्याने न्यायमूर्तींच्या विधानाचे अर्थ न काढता येथे हे नमूद केले पाहिजे की, ते विधान गेल्या अर्धशतकाहून अधिक काळात प्रगत-विकसित होत गेलेल्या एका ज्ञानशाखेने प्रभावित झालेले असू शकते. ‘क्वीअर स्टडीज’ या त्या ज्ञानशाखेचा एक अभ्यासक, या नात्याने या ज्ञानशाखेच्या वैचारिक योगदानाबद्दल सांगण्यासाठी हा लेख. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्त्री आणि पुरुष या ॲब्सोल्यूट संकल्पना नाहीत’ हेच निराळ्या शब्दांत ‘क्वीअर स्टडीज’ सांगते, कारण ही ज्ञानशाखा लिंगभावाच्या कोणत्याही प्रकारच्या दुभागणीच्या किंवा द्वैतकल्पाच्या (‘बायनरी’च्या) पलीकडे पाहणारी आहे. स्त्री आणि पुरुष यांचे लिंगनिष्ठ वर्तन हे बहुतेकदा ‘सामाजिक नियमां’च्या परिणामातून तयार होत गेलेले असते. इथे ‘तयार होत गेलेले’ या शब्दप्रयोगालाही महत्त्व आहे, कारण आपल्याला कोणत्या प्रकारचे, कोणत्या ब्रॅण्डचे कपडे आवडावेत हे जसे आपापल्या वय/ व्यवसाय/आर्थिक स्थिती यांविषयीच्या अलिखित सामाजिक नियमांनुसार ठरत असते आणि ते ‘नैसर्गिक’ असतेच असे नाही, तसेच लिंगभावाबद्दल म्हणता येईल. आपल्या इच्छा, अंत:प्रेरणा या आपल्या जीवशास्त्रीय लिंगावर अवलंबून नसतात, हा या ज्ञानशाखेचा पाया ठरणारा सिद्धान्त आहे. त्याचा उगम मायकेल फुकोपासून शोधता येतो आणि त्याची सविस्तर मांडणी ज्युडिथ बटलर यांनी केलेली दिसून येते. गेल रुबिन यांनी १९८४ मधील ‘थिंकिंग सेक्स’ या ग्रंथात केलेल्या मांडणीशी सरन्यायाधीशांचे विधान मिळतेजुळते आहे, असे म्हणता येईल.

हेही वाचा – कतारमधील आठ ‘कुलभूषण’

मात्र ही अनेक अभ्यासकांची विधाने सहजासहजी मान्य का होत नाही, याला कारणे आहेत आणि त्यांचाही अभ्यास करणे हे ‘क्वीअर थिअरी‘ने कर्तव्य मानले आहे. त्यासाठी मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आदींमधील अभ्यासांचाही आधार क्वीअर थिअरी घेते. स्त्रीवादाचाही मोठा वैचारिक आधार याकामी मिळतो. त्यातून असा निष्कर्ष निघतो की, ‘सर्वसाधारण’ काय आहे, ‘चारचौघांसारखे’ काय आहे आणि तसे नसलेले म्हणून त्याज्य किंवा चुकीचे काय ठरते, याचे नियम प्रत्येक समाजाने ठरवलेले असतात. हीच ती ‘समाजमान्यता’!

समाजमान्यता ही मुळात वर्चस्ववादी संकल्पना आहे, त्यामुळे समाजमान्यतेला मुकण्याचे दडपण व्यक्तींवर असते. समाज आपल्यालाच अमान्य करील, ही भीती ‘समाजमान्य कल्पनां’ना शरण जाण्यामागे असते. मनाच्या आणि शरीराच्याही गरजांविरुद्ध ‘समाजमान्य’ स्त्री-पुरुषभेद मान्य करून त्याप्रमाणेच जीवनक्रम ठेवावा लागतो. याचे वर्णन स्त्रीवादी अभ्यासक ॲड्रिएन रिच यांनी १९८० मध्ये ‘कम्पल्सरी हेटरोसेक्शुॲलिटी’ असे केले होते. तर, समाजमान्य कल्पना ‘हेटरोनॉर्मेटिव्ह’ म्हणजे ‘विषमलिंगी हेच सर्वसाधारण’ मानणाऱ्या द्वैतनीतिमय असल्याचे प्रतिपादन मायकेल वॉर्नर यांनी १९९१ मध्ये केले. 

यात नुकसान काय, असा प्रश्न सातत्याने विचारला जाणे हेही ‘समाजमान्यते’चाच पगडा टिकल्याचे लक्षण. नुकसान समाजाचे होताना दिसत नाही. ते व्यक्तीचे होऊ शकते. मात्र समाजधारणा सातत्याने प्रजननकेंद्री राहण्यात फायदा कुणाचा, हा प्रतिप्रश्न क्वीअर स्टडीज आणि स्त्रीवादी अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरतो. ‘पुरुषसत्ताकता टिकणे‘ हाच प्रजननकेंद्री समाजमान्यतांमुळे होणारा थेट लाभ. खासगी संपत्तीचा संचय आणि संपत्तीचा मृत्युपश्चात विनिमय यांसाठी पुरुषसत्ताकतेला सोयीची पद्धत म्हणजे आजची प्रजननकेंद्री विवाहसंस्था… त्यावर आधारलेली कुटुंबसंस्था आणि या सर्वांच्या परिणामी उभरलेली पण कुटुंबसंस्था तसेच समाजधारणा यांना शाश्वतपणा देणारी धर्मसंस्था. ही ‘समाजमान्य’ समाजरचना किमान पाच ते सहा हजार वर्षांत घट्ट होत गेली, मात्र यातूनही कथा-आख्यायिका उरल्या. भारतीय संदर्भातही मोहिनी, हरिहर, बहुचरादेवी अशा कथा सापडतात. या कथा लिंगभावाचा एकारलेपणा नाकारणाऱ्या आहेत. काही पुराणांत तर समलिंगी संबंधाचे सूचनही आहे. त्याहीपेक्षा, खजुराहो अथवा काही प्रमाणात वेरुळमध्येही दिसणारी कामशिल्पे ही आनंद कसा – कुणाकडून – कोणत्या पद्धतीने मिळावा यावर बंधने नसल्याची अवस्था दाखवणारी आहेत.

ही अवस्था ‘नैसर्गिक’ आहे, हे आता प्राणीसृष्टीतील २५० हून अधिक प्रजातींच्या अभ्यासान्ती सिद्ध होते आहे. मात्र मानवाने केवळ पुरुष किंवा स्त्री यापैकीच एक म्हणून जगावे आणि याखेरीज काहीही असणे/ करणे जणू अनैसर्गिकच, हा आनंदावर राजकीय घाला आहे. हे व्यापक राजकारण पुरुषसत्ताकतेचे आणि प्रजननकेंद्रीच. वास्तविक प्रजनन हे मानवी शरीरसंबंधाच्या अनेक कार्यांपैकी एक कार्य असून, ते एकमेव कार्य नाही. तसे मानले, तर मग सध्याचे संसारी स्त्रीपुरुष केवळ मुले जन्माला घालण्यासाठीच शरीराने जवळ येतात काय, याचा विचार करून पाहावा. मात्र टोकाचा प्रजननकेंद्री आग्रह काही समाज धरतात, त्यातून गर्भनिरोधकांना नकार, गर्भपातबंदी अशीही वर्चस्ववादी बंधने घातली जातात. 

हेही वाचा – अदानींच्या हाती पायाभूत विकासप्रकल्प असणे धोक्याचे नाही का?

वर्चस्ववादी, प्रजननकेंद्री पितृसत्तेने स्त्रियांच्या आनंदाला नियंत्रित केले. स्त्री लिंगभाव असणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या आनंदाला नियंत्रित केले आणि असे नियंत्रण हेच ‘नैसर्गिक’ मानण्याची सक्ती समाजावर केली. ‘समाजमान्यता’ म्हणून ही सक्ती स्वीकारलीही गेली. त्यातून गुन्हेगारी कायद्याच्या ‘कलम ३७७’ सारखी कायदेशीर बंधनेही घातली गेली होती. ती न्यायालयीन प्रक्रियेतून नाकारण्याची पायरी आपण गाठली, यालाही ‘क्वीअर थिअरी’ या ज्ञानशाखेचा विस्तार कारणीभूत आहे. 

सध्या सुरू असलेली सुनावणी ही या ज्ञानशाखेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे, किंबहुना ही सुनावणी म्हणजे या ज्ञानशाखेची एक कसोटी म्हणून पाहिले जाऊ शकते, याची आठवण देऊन सध्या थांबतो.

आनंद पवार हे ‘सम्यक, पुणे’चे कार्यकारी संचालक व लिंगभाव, लैंगिकता आणि पुरुषत्व या विषयांचे अभ्यासक आहेत.

* (या लेखाचे शब्दांकन : अभिजीत ताम्हणे)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Procreative sex queer studies and same sex marriage case ssb