उत्तम जोगदंड
संभाजी ब्रिगेडच्या नावात असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा फक्त ‘संभाजी’ असा उल्लेख खटकल्याच्या कारणावरून अक्कलकोट येथे ‘संभाजी’ ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर ‘शिवधर्म प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. विशेष म्हणजे आपल्या संघटनेच्या नावातच ‘शिव’ असा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना ‘संभाजी’ हे नाव मात्र एकेरी वाटते, यासारखा विनोद नाही. या निमित्त या एकेरी प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे.

देवादिकांचा, महामानवांचा किवा आदर्शांचा एकेरी उल्लेख आपल्याकडे नवा नाही. असा एकेरी उल्लेख भक्त किंवा अनुयायी आत्यंतिक प्रेमापोटी, श्रद्धेपोटी आणि आदरापोटी करतात, अवमान करण्यासाठी नव्हे हा गेल्या दशकापर्यंत अगदी कॉमन सेन्स होता. या उल्लेखामागील भावना सर्वांना कळत होती आणि त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जात नसत किंवा कोणाला संतापही येत नसे. याची उदाहरणे काही गीतांमध्ये आणि वाक्प्रचारांमध्ये दिसतात जी आजही प्रचलित आहेत:

  • शिवाजी आमचा राणा, मराठी आमचा बाणा
  • होता जिवा म्हणून वाचला शिवा
  • जय भवानी जय शिवाजी
  • देव माझा विठू सावळा…
  • विठ्ठाला तू वेडा कुंभार
  • देवा तुझे किती, सुंदर आकाश…
  • दे रे कान्हा चोळी लुगडी
  • उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे
  • गणपती आला रे नाचून गेला…
  • आमचा गणपती पाच दिवसांचा असतो
  • शंकरा मला दिसलास तू, बेलाच्या पानात….

अशी कितीतरी उदाहरणे आहेत. परंतु असा एकेरी उल्लेख करणाऱ्यांच्या तोंडाला ना कोणी काळे फासले ना मारहाण केली. परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांत मराठी भाषेचा नवीन सोयीस्कर अर्थ गवसलेले विद्वान निर्माण झाले आहेत, ज्यांना काही निवडक महामानवांचा/देवादिकांचा काही निवडक लोकांनी केलेला एकेरी उल्लेख हा अचानक अवमान वाटू लागला आहे.

असे काहीतरी एकेरी कुठे सापडते का याचा ते अगदी बारकाईने शोध घेतात. नाही सापडला तरी ते स्वतः तो लादतात. असे झाले रे झाले की या विद्वानांच्या मनात महामानवांविषयीच आदर अचानक उचंबळून येतो, त्यांचा संताप होतो, त्यांच्यात वीरश्री संचारते आणि असा ‘प्रमाद’ करण्याऱ्यांवर ते कधी काळी शाई ओततात, कधी मारहाण करतात किंवा प्रसंगी थेट मुडदा पडतात आणि त्या महामानवांचा सन्मान आणि आदर्श जपल्याच्या भावनेने धन्य होतात. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे लाडके राजे कसे होते, जात-धर्मभेद मानत नव्हते अशी अभ्यासपूर्ण आणि अनेकांना अज्ञात असलेली मांडणी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाद्वारे करणारे विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा याच प्रवृत्तीच्या लोकांनी याच कारणासाठी केलेला खून हे अलीकडचे उदाहरण आहे.

बरे, त्यांची ही विद्वत्ता व्यक्तिसापेक्ष, संघटनासापेक्ष, कालसापेक्ष आणि महामानव सापेक्ष सुद्धा असते. तसेच अवमानाचे त्यांनी केलेले नियम त्यांना लागू नसतात. म्हणजे, बघा ज्याने अवमान केला तो कोण आहे, कोणाच्या बाजूचा आहे तसेच महामानव कोण आहे यावर अवमान आहे की नाही ते ठरते. ‘शिव’धर्म प्रतिष्ठान, शिवसेना, शिवशाही बस, शिववडा यात अवमान होण्यासारखे काही आहे असे त्यांना वाटत नाही. १९९०च्या दशकात स्थापन झालेल्या आणि २००४ साली भांडारकर आंदोलनामुळे प्रकाशात आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या नावात ‘संभाजी’ असा एकेरी उल्लेख आहे याचा यांना साक्षात्कार व्हायला दोन दशकांचा काळ लागतो आणि हो, काही महामानवांचा अवमान करायचा अशा प्रवृत्तींना जन्मसिद्ध अधिकारदेखील असतो, उदा. फुले, शाहू, आंबेडकर. त्यांनी तो केला तर त्यांच्या अधिकाराचा सन्मान करून कोणी ब्र सुद्धा काढायचा नसतो.

संभाजी ब्रिगेड हे नाव संघटनेस देण्यास कोणताही कायदा प्रतिबंध करत नाही. प्रतिबंध असल्यास कायदेशीर मार्गाने हे नाव बदलायला भाग पाडले जाऊ शकते. परंतु या वर्षी अचानक जागे होऊन ‘संभाजी’ हे नाव वापरणे एकेरी आहे असा अचाट शोध या विद्वानांनी लावला आणि आपला कार्यभाग साधला. अशा प्रकारे कोणाला तरी कोणाच्या नावाच्या उल्लेखामुळे अवमान झाल्याचे वाटत असेल, संताप होत असेल आणि हे लाड जर चालवून घेतले जाणार असतील तर पुढील काळात अनागोंदी माजण्याची दाट शक्यता आहे. आता महामानव/देवादिकांवरून लोक संतप्त होत आहेत. उद्या मंत्री, आमदार, खासदार, साधू, पुजारी यांच्या नावावरून संतप्त होतील. आपल्याकडे अनेक जाती, धर्म, भाषा आहेत, प्रदेश आहेत. त्या त्या क्षेत्रातील कोणी ना कोणी मान्यवर असतातच. त्यांचे नाव असेच का वापरले म्हणून पुढे मारहाणीचे प्रकार होऊ शकतात. यास वेळीच आवर घालणे हे सरकारचे कर्तव्य आहेच. परंतु अशा प्रकारांकडे ‘मला काय त्याचे?’ असा दृष्टिकोन ठेवून मौन बाळगणाऱ्यांनी आता तरी तोंड उघडून आपला विरोध नोंदवून आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.

uttamjogdand@gmail.com