आता लवकरच बारावीचे निकाल लागतील आणि विद्यार्थी व पालकांची, पुढे काय या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी धावपळ सुरू होईल. या दरम्यान अनेकांनी आयआयटी जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षादेखील दिल्या असतील. खरे तर प्रवेश मिळेल की नाही याची चिंता करण्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. राष्ट्रीय स्तरावरील सरकारी, खासगी अशा सर्व क्षेत्रांतील संस्थांची संख्या, तसेच विविध अभ्यासक्रमांची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. आयआयटी, एनआयटीचा अपवाद सोडला तर अनेक राज्यांतील इंजिनियरिंगच्या शेकडो जागा रिकाम्या राहताहेत. सायन्स, कॉमर्स, आर्ट्सला तर सहज प्रवेश मिळेल अशी स्थिती आहे. तरी टेन्शन असते, ते मला हवा असलेला विषय, मला हव्या त्याच संस्थेत मिळेल की नाही? हा दुराग्रह सोडला तर मग कशाचीच अडचण नाही.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

आजकाल राष्ट्रीय स्पर्धा प्रवेश परीक्षेस लाखोच्या संख्येने विद्यार्थी बसतात. ते दोन-चार वर्षे ट्युशनच्या चरकातून पिळून निघालेले असतात. प्रवेश परीक्षेचे निकाल पर्सेंटाइल स्वरूपात जाहीर होतात. त्यामुळे ९५ पर्सेंटाइल असले तरी हवा तो अभ्यासक्रम हवा त्या संस्थेत न मिळण्याची भीती असतेच. कारण तुमच्या वरचे ५ टक्के विद्यार्थीच संख्येने इतके होतात की त्या मोक्याच्या जागा संपून जातात. हे गणित समजून घेतले पाहिजे. म्हणजे नैराश्य पचविणे सोपे जाईल.

भविष्यातील गरजा, नोकरी करिअरचे स्वरूप लक्षात घेतले तर कोणताही अभ्यासक्रम घेतला, कुठेही शिक्षण घेतले तरी वाव आहे, संधी आहे. कारण तुमचे करिअर हे कुठून, कोणत्या विषयात कोणते ग्रेड्स मिळवून पदवी घेतली यावर मुळीच अवलंबून नसते. किंबहुना अनेक क्षेत्रांत तुम्ही पदवीसाठी जे काही शिकता त्याचा मुळीच उपयोग होत नाही. पदवीमुळे तुम्ही कोणकोणती इतर कौशल्ये आत्मसात केलीत, नवे काही शिकण्याचा तुमचा उत्साह कितपत दांडगा आहे, तुमची वैचारिक निर्णय क्षमता, तार्किक विवेकाने विश्लेषण करण्याची क्षमता किती जागरूक आहे, यावर तुमचे करिअर अवलंबून असते

आजकाल संगणक, आयटी, एआय, एमएल वगैरेचे नको तितके स्तोम माजले आहे. या गोष्टी कुठेही केव्हाही शिकता येतात. त्यासाठी त्या विषयात पदवीच घ्यायला हवी, असा आग्रह नको. अगदी सायन्स, कॉमर्सचे शिक्षण घेताना, घेतल्यानंतरही या संगणक संबंधी विषयांत कौशल्य आत्मसात करता येते. याचा अर्थ सर्वं प्रथम अमुकच कोर्स, अमुकच संस्था हा दुराग्रह सोडला पाहिजे. आधी आपली बौद्धिक क्षमता बघा. आपल्याला काय सोपे जाईल याचा विचार करा. त्याच बरोबर आपल्या पालकांची आर्थिक क्षमता बघा. आजकाल खासगी संस्था, विद्यापीठे अवाच्या सवा फी घेतात, पण त्या तुलनेत शिक्षणाचा दर्जा असेलच याची खात्री नसते. अनेक ठिकाणी तो नसतोच. संस्था आपल्या घरा पासून, शहरापासून किती दूर आहे, तिथला हॉस्टेलचा खर्च, एकटे राहण्याचा मानसिक ताण आपल्याला झेपणार आहे, का याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. एरवी अशा बाबतीत घाईने घेतलेले निर्णय पुढे पश्चातापास कारणीभूत ठरतात. कोणताही अभ्यासक्रम कमी दर्जाचा नाही. कोणतेही क्षेत्र कमी प्रतीचे नाही. नोकरीत मिळणारा पगार म्हणजे तुमचे एकूण उत्पन्न आणि तुमचे शिक्षण (पदवी) याचादेखील काडीमात्र संबंध नसतो. एक वकील दिवसाला आयआयटी इंजिनीअरच्या मासिक पगारापेक्षा जास्त कमाई करू शकतो हे सत्य, वास्तव आहे. (बिल्डर,राजकारणी नेते यांची उदाहरणे न दिलेली बरी!)

तेव्हा निराश न होता उत्साहाने, खुल्या दिलाने, काहीशा लवचिक धोरणाने या बारावी नंतरच्या निर्णय प्रक्रियेला सामोरे जा. खास करून पालकांनी मुलाची आवड, त्याची क्षमता, त्याची भावनिक जडण घडण याचा प्रामुख्याने विचार करावा. गर्दी जिकडे चालली आहे तिकडे धावणे हा शुद्ध वेडेपणा झाला. जिथे गर्दी नाही तिथे जास्त जास्त संधी असते ही आशावादी वृत्ती ठेवावी.

नव्या शैक्षणिक धोरणात बरीच लवचिकता आहे. वेगवेगळ्या विषयांची आवडीनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिकताना वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्याचीदेखील संधी आहे. कृती शिक्षणावर, प्रॅक्टिकल अनुभवावर भर आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे ऑनलाइन कोर्सेस करण्याचा आणि त्याद्वारे कमावलेले क्रेडिट पदवीसाठी ग्राह्य धरण्याची सोय आहे. याची सर्व माहिती मिळवून (जी संस्थांच्या, कॉलेजच्या, विद्यापीठाच्या वेबसाईट वर उपलब्ध असते) ती समजून घेऊन त्याचा लाभ घेतला तर कुणालाही निराश होण्याचे कारण उरणार नाही. उपलब्ध माहितीचा उपयोग आपल्या भल्यासाठी करून घेतला तर भविष्यातील अर्धे अधिक प्रश्न सहज सुटतील. पुढील उच्च शिक्षण हा आनंददायी अनुभव ठरेल.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things to consider while taking career decision after 12th result css