किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे म्हणजे साक्षात स्वरयोगिनी.. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका, विदुषी.. अशा सगळ्या भूमिकांमध्ये लीलया वावरणाऱ्या प्रभाताईंच्या ‘स्वरमयी’ या पुस्तकातील हा संपादित सारांश म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबच!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आठवणींचे दिवस’ लिहायला बसले आहे खरी; पण कोणत्या दिवसांबद्दल लिहावं कळत नाही. माझ्या जीवनात मैफील केव्हा शिरली ते मलाच समजलं नाही. सारं आयुष्य तिच्याच भोवती फिरत राहिलं, एवढं मात्र खरं.

या प्रवाहात कुठल्या कुठल्या वळणांची म्हणून याद ठेवायची? कधी क्षणिक भोवऱ्यात मन अडकलं, कधी रोरावणाऱ्या पुरात सगळंच वाहून गेल्यासारखं वाटलं, कधी शेवाळय़ात पाय रुतले, कधी प्रवाह कोरडा झाला तेव्हा कंठ सुकून गेला. कधी नुसती वाळूच ओंजळीत आली; पण कधी माझे डोळे हिरवळीवरही विसावले आहेत. हाताच्या ओंजळीत मोतीही आले आहेत. लकाकणाऱ्या दीपस्तंभांनी मार्गही दाखवलाय. असंच कितीतरी मात्र यातलं बरंचसं या ना त्या कारणानं मी यापूर्वी लिहिलं आहे. आज का कुणास ठाऊक, मैफिलीबाहेर असलेली मी दिसते आहे. तुमच्यातली एक!

हेही वाचा >>>स्वरमयी प्रभा

एकांताचा वास

१९७० साली कार्यक्रमांच्या निमित्तानं मी दुसऱ्यांदा लंडनला गेले. माझी बहीण उषा तिथल्या बेथनल ग्रीन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. हॉस्पिटलच्या आवारातच तिला राहायला जागा होती. दुमजली घर. आजूबाजूला मोकळी जागा. सगळीकडे अगदी सामसूम. उषा कामाला गेली की, पुष्कळदा बाहेरच्या व्हरांडय़ातच मी काहीतरी करीत असायची; पण तिची इर्मजन्सी डय़ूटी आली की माझ्या पोटात गोळा यायचा. कारण रात्री अपरात्री केव्हाही कॉल यायचा. एवढय़ा मोठय़ा घरात एकटं झोपायचं. माझी तर छाती नव्हती आणि एकदा नेमका रात्री अडीच वाजता फोन वाजला. उषा तयार होते तो मीही साडी नेसून दारापाशी उभी राहिले. उषानं माझ्यापुढे हात टेकले, तिच्याबरोबर मीही हॉस्पिटलमध्ये गेले. ऑपरेशन संपेपर्यंत बाहेरच्या खोलीत पाश्चात्त्य संगीत ऐकत बसले होते. अमेरिकेतही अशा अनेक प्रसंगांना मला तोंड द्यावं लागलंय, बहुतेक घरं एकमेकांपासून दूर अंतरावर. सगळय़ांच्या खिडक्या, दारांवरचे पडदे ओढलेले. आत माणूस आहे की नाही ते कळायला मार्ग नाही. आठ ते पाच ऑफिसची वेळ असल्यामुळं दुपारच्या वेळेला रस्तेही अगदी सामसूम. चुकून औषधालाही माणूस सापडणं कठीण. घराच्या मुख्य दरवाजाला काय ती कुलूप लावायची सोय. बाकी कोणत्या खोलीला कडीसुद्धा नाही. अर्थात तिथे टकटक केल्याशिवाय कोणी दार उघडत नाही म्हणा! लाकडाची झटपट तयार होणारी घरं. त्यामुळे जमीनही बहुतेक लाकडाचीच. सर्वदूर गालीचे किंवा मॅट्रेसेस घातले असले तरी, चालताना एक विशिष्ट आवाज आल्याशिवाय राहत नाही. त्यात सेंट्रल हीटिंगच्या मशीनचा आवाज आणि फ्रीजचा आवाज. घराला एक मोठं बेसमेंट असायचंच. कुठे काही खट्ट आवाज झाला की नको ते मनात यायचं. घरातली सगळी माणसं काम करणारी. त्यामुळे सकाळी सातलाच बाहेर पडायची. कित्येकदा मनात यायचं, या लोकांना म्हणावं – मलाही तुमच्याबरोबर घेऊन चला; पण लाज वाटायची. इथं खूप माणसं पहायची सवय झाल्यामुळे बाहेर गेलं की अगदी निर्जन वस्तीत गेल्यासारखं वाटतं. परेदश दौरा म्हटला की मला याच गोष्टीची प्रथम धास्ती वाटते.

किर्र झाडी.. मिट्ट अंधार

एकदा तर या सगळय़ावर कळस झाला. युरोपचा दौरा चालू होता. झूरिचच्या एका म्युझियममध्ये माझा कार्यक्रम होता. म्युझियममध्येच राहण्याची सोय करतो असं आयोजकांनी लिहिलं होतं. माझ्याबरोबर लंडनचे माझे एक स्नेही तबल्याच्या साथीसाठी बरोबर होते. आदल्या रात्री उशिरानं आम्ही झुरिचला पोहोचलो. म्युझियममध्ये आजूबाजूला किर्र झाडी. मिट्ट अंधार. एक चिटपाखरूदेखील नाही. आम्हाला तिसऱ्या मजल्यावरची ऑफिसची जागा दिली होती. किचन आणि बाथरूम खालच्या मजल्यावर. सतत प्रवासानं आम्ही खूप थकलो होतो. त्यात मला सर्दी झालेली. अंग मोडून आलं होतं; पण त्या भयाण एकांतात झोपच लागेना. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं. वर्क परमिटसाठी लागणारा व्हिसा माझ्याजवळ नव्हता. तो घ्यायला जवळच्या दुसऱ्या देशात जायला हवं होतं. आमचे तबलजी एकटे काय करणार, म्हणून त्यांनी मित्राकडे जायचं ठरवलं. जेवण करून लागलीच येतो असं सांगून ते सकाळीच गेले. सेक्रेटरीबाई येईपर्यंत म्युझियमच्या त्या मोठय़ा बिल्डिंगमध्ये मी कशीबशी जीव धरून होते. तब्येत बरी नव्हती तरी डोळा लागेना. तंबोराही हातात घ्यावासा वाटेना. बाहेर मोटारीचा आवाज आला तेव्हा मला धीर आला. आमचा प्रवास सुरू झाला. परदेशात बॉर्डर क्रॉस करताना कोणत्या अडचणी उभ्या राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. व्हिसासाठी सगळय़ा देशातूनच अलीकडे कडक नियम झाले आहेत. व्हिसा घेऊन आम्ही परत निघालो. सगळे रस्ते वन-वे, कुठेतरी आमची एन्ट्री चुकली आणि दुसऱ्याच देशाच्या बॉर्डरवर आम्ही जाऊन पोहोचलो. माझ्याकडे त्या देशाचा व्हिसा नव्हता. परत फिरावं तर तेही शक्य नव्हतं. मल्टीपल एन्ट्रीचा व्हिसा नसेल तर, एकदा त्या देशातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा प्रवेश अशक्यच. संध्याकाळी सातला कार्यक्रम. सर्दीनं माझा जीव हैराण झाला होता. त्यात हे नवीन टेन्शन. इथूनच भारताला परत जावं लागतंय काय? नाही नाही ते मनात यायला लागलं. अर्धा तास आमची सेक्रेटरी इमिग्रेशन ऑफिसरशी हुज्जत घालत होती. त्यात तिनं दोन ठिकाणी फोनही केले. युरोपमध्ये इंग्रजी भाषा येऊनही काही उपयोग नाही. मी एकटीनं काय केलं असतं? शेवटी नशिबानंच आमची सुटका झाली. नवीन देश होता. आजूबाजूला सुंदर वनश्री होती. माझं कुठंच लक्ष नव्हतं. चार वाजता आम्ही म्युझियमपाशी येऊन पोहोचलो. ‘‘मला कार्यक्रमाची तयारी करायची आहे. सहा वाजता न्यायला येईन.’’ असं सांगून सेक्रेटरी निघून गेली. एव्हाना अंधार व्हायला लागला होता. थंडीही सुरू झाली होती. आत कुठं लाइट दिसेना. आमचे तबलजी अजून परतले नव्हते. बाहेर उभं राहणं शक्य नव्हतं. आत जायचाही धीर होईना. शेवटी बाहेरच्या मोठय़ा दरवाजाला चावी लावली. आत जाऊन कसाबसा खालचा लाईट लावला. तीन जिने चढून मी वर कशी पोहोचले ते माझं मलाच माहीत नाही. आमच्या खोलीला कडी नव्हतीच. दारातून कोण येतंय इकडं माझं सारखं लक्ष होतं. खरं तर मला विश्रांतीची फार आवश्यकता होती. बरोबर एक तासानं आमचे स्नेही आले. त्यांच्या मित्रानं त्यांना सोडलं नाही म्हणे! माझे डोळे भरून येत होते. खूप रडावंसं वाटत होतं. त्यांना बिचाऱ्यांना काय माहीत मी इतकी घाबरट आहे! काही न बोलता कार्यक्रमाच्या तयारीला लागले. स्टेजवर बसल्यावर हायसं वाटलं. कार्यक्रमाला आलेल्या एका भारतीय श्रोत्यानं नंतर आग्रहानं आपल्या घरी नेलं. म्युझियम सोडण्याच्या कल्पनेनं मी आनंदून गेले. वर भात-पिठलं खायला मिळणार होतं.

हेही वाचा >>>विश्वधर्म की धर्म-राष्ट्र हे ठरवावे लागेल… 

राया मला सोडुनी जाऊ नका

आम्हा कलावंतांना प्रत्येक मैफील एक नवीन अनुभव असतो. पडद्याआड काय रामायण घडलेलं असतं, याची श्रोत्यांना कल्पना नसते. माझ्या मैफिलींना सुरुवात झाली, गणपती उत्सवातून! एकदा एका गावचे पाटील कार्यक्रम ठरवायला आले. ‘बाई, आपला कार्यक्रम ब्येस झाला पाहिजे. समदं पब्लिक आपल्याकडं आलं पाहिजे.’ प्रत्येक आयोजकाला आपला कार्यक्रम चांगला व्हावा असं वाटत असतं, त्यातलंच हे! म्हणून मी या गोष्टीकडं विशेष लक्ष दिलं नाही. कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही पाटीलबुवांच्या गावी जाऊन पोहोचलो. उत्तम व्यवस्था होती. पाटील जातीनं चौकशी करीत होते. रात्र झाली. आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यात आलं. दोन मंडप हाकेच्या अंतरावरच सुशोभित केले होते. दोन्ही ठिकाणी स्टेज होतं. दोन्ही ठिकाणचे माईकवाले होता नव्हता तेवढा मोठा आवाज करून आपापली गाणी वाजवीत होते. कुणाचं कुणाला ऐकायला जात नव्हतं. आता वाद्यं कशी लावायची हा माझ्यापुढं प्रश्न होता. आम्ही स्टेजवर जाऊन बसलो. एवढय़ात समोरच्या कर्त्यांतून ढोलकीचा आवाज सुरू झाला. चाळ वाजायला लागले आणि भसाडय़ा आवाजात कोणी गाऊ लागलं- ‘राया मला सोडुनी जाऊ नका.’ माझा तंबोराही मला ऐकायला येईना. एवढय़ात पाटीलबुवा स्टेजवर आले आणि म्हणाले, ‘बाई, हेच्यावर तुमचा आवाज गेला पाहिजे.’ मी अगदी हतबुद्ध झाले! गणेशाची मनोमन प्रार्थना केली- ‘या संकटातून मला सोडव’ आणि शंकरा रागातील जलद बंदिश सुरू केली. पहिल्यापासूनच तानांचा मारा सुरू केला. बसलेलं पब्लिक हलली नाही. मला जरा धीर आला. पाटीलबुवाही खुशीत दिसले. रागदारी गुंडाळून ठेवली आणि भावगीत, भजन म्हणायला सुरुवात केली. तेवढय़ात समोरच्या मंडपात एक गाय घुसली (ही गाय पाटीलबुवांची असावी). सगळं पब्लिक आमच्या मंडपाकडे धावलं. केव्हा एकदा कार्यक्रम संपतो असं मला झालं. नेहमी ख्याल, ठुमरी म्हणायची सवय; पण इथे तसलं गाऊन काही उपयोग नव्हता. भैरवी संपली तरी लोकांनी आग्रहानं आणखी एक गाणं म्हणायला लावलं. पाटीलबुवांनी फड जिंकला होता. ‘बाई, पुढच्या वर्षी आमच्याकडं कार्यक्रमाला यायचं बरं का! तुमची काय बिदागी असंल ती देऊ.’ पुन्हा या गावात यायचं नाही, हे त्यांना सांगण्याचा काही धीर झाला नाही. रात्रभर मोठय़ानं वरच्या सुरात गायल्यामुळं घशाला चांगलाच ताण पडला होता. दुसऱ्या दिवशी बोलताही येईना.

गणपती उत्सवातले नंतरचे तीनही कार्यक्रम रद्द करावे लागले. आठवणींची ही वाट न संपणारी आहे. कुठंतरी थांबायला हवं, नाही का?

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran singer prabha atre talented singer music composer vocal book amy