राजा देसाई

खूप घालमेल! जनांत बोलावं तर ऐकावं ‘तत्वज्ञानाचे बुडबुडे पुरेत, व्यवहाराचं (राजकारण?) बोला!’ पण ‘चिखलानं चिखल कधीही धुतला जाणार नाही’ हे आपले शब्द आठवतात. दोन शब्द बोलावेत तर संवादाऐवजी राजकारणी काला! निष्पन्न काय? अगदी आपल्यालाही हायजॅक केलं जातंय असाही आक्षेप; असूं दे! एक धर्म-राष्ट्रवादी दृष्टीकोनही (जगभर) आहेच व तोही कोणाला आपल्याच विचारांत दिसला तरीही आमची अजिबात तक्रार नाही; पण राष्ट्रात द्वेषभावरहित संवाद तरी नको का?

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

काय काय बजावून गेलात स्वामिजी आपण आणि काय आहे आज भारताची परिस्थिती? ‘सत्य हाच माझा ईश्वर तसेच राजकारणही आणि विश्व हाच माझा देश… राजकारणानंच जर इथे धर्माची जागा घेतली तर विनाश अटळ!’ हेच होते गांधींचेही शब्द! पण ‘धर्मद्रोह’, ‘राष्ट्रद्रोह’ हे शब्द आज चक्क रामनामाच्या जागी. खरं तर आता धर्म कोणता आणि सत्ताकारण कोणतं, राज्यसंस्था कुठे संपते आणि धर्मसंस्था कुठे सुरू होते हेच कळेनासं झालं आहे. (पूजनीय बजरंगबलींच्या हातातही ‘व्होट-थाळी’!) राजकीय मतभेदांच्या जागी तद्दन शत्रुत्व. केंद्र व विरोधी-राज्य संबंधांत सतत संघर्ष. गंभीर धार्मिक दुरावा. अल्पसंख्य अस्वस्थ. आणि असं काही बोलावं तर कोणता तरी ‘द्रोह’ हमखास ! द्वेष-उन्मादानं वातावरण कुंद. फेडरालिझम आणि राष्ट्रैक्य भावना यांच्यावरचे परिणाम दिसायला दीर्घ काळ जाईल; सेक्युलारिझमही हळू हळू स्युडो बनतानाच त्याच्या दुष्परिणामांची बीजं अशी अजाणताच रोवली जात होती! स्वामीजी, केवळ आपण दिलेल्या दृष्टीमुळंच आमच्यासाठी हे सारं तिळमात्रही राजकीय नव्हे; प्रश्न आहे देशाच्या आत्मरक्षणाचा! वेगळ्या चष्म्यातून कोणाला हे चित्र पूर्णतः चुकीचं वाटेलच पण हेत्वारोप झाले (प्रतिवाद नसेल) नाहीत तर मोठीच ईश्वरकृपा!

‘व्यक्तीसारखाच समष्टीचाही एक धर्म असतो, जीवनोद्देश असतो (ज्याच्या आधारावरच त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो.) आत्म्याच्या एकत्वातूनच आपण सारे भाऊ-भाऊच नाही तर वस्तुतः एकच आहोत. भारतीय धर्माचा जीवनोद्देश जगाला अध्यात्म शक्तीनं भारून टाकणं हा आहे…’ ही दृष्टी भारताच्या विविधतेतील ऐक्याचा सहिष्णू आंतरिक आधार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा सत्तेचं अतिकेंद्रिकरण होईल, समाजजीवनाला अतिएकजिनसीपणातून आकार देण्याचा प्रयत्न होईल तेव्हा तेव्हा राष्ट्रीय ऐक्यभावनेवर ताण येईल.

असो, इतिहासात दास्य-पीडित राहिलेल्या कोणत्याही समूहाला सहिष्णुता व आत्मपरीक्षणाऐवजी धर्माच्या विजिगुषत्वाचं/ आक्रमकतेचं आकर्षण वाटणं हेही मानवी जीवनाचं वास्तवच. केवळ सहिष्णुतेमुळंच आपल्या नशिबी परदास्य आलं. देश-धर्माला धोका आहे या आमच्या मानसिकतेमागे अनेक घटक आहेत; ‘पण

मग सात-आठशे वर्षांच्या परदास्यानंतरही हिंदू जिवंत का आहे? इतिहासात ज्यांनी शक्तिपूजा केली त्या संस्कृति आज कुठं आहेत : ग्रीस, रोम…?’ या आपण पश्चिमेला विचारलेल्या प्रतिप्रश्नांतील उत्तराचा आम्ही कधी गंभीर विचार केला का?

परदास्यातील भारताच्या नष्टचर्याचं दुःख आपल्यालाही होतंच पण आपण उन्नतीचा कोणता मार्ग सांगितलात? ‘…आपल्यातील प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर परकीयांवर न फोडता वेदान्ती म्हणून आपण सर्वप्रथम आत्मपरीक्षण करा. (उदा.) दलित मुस्लीम का झाले? मुस्लीम राज्य येण्याआधी दोन शतके भारताची सर्व क्षेत्रांतील शक्ती लोप पावली होती. आपले अतिभयंकर धार्मिक पतन झाले होते. राष्ट्र कधी घृणेनं जिवंत रहात नाही. त्याने स्वतःचंच अधःपतन मात्र होतं.’ आम्हां सामान्यांना उच्च तत्वज्ञान पेलत नाही, मंदिर-मशिद वाद होतात (त्याला कारणं अनेक) पण आपल्या या वचनानं अभिनिवेश जरा कमी होतील : ‘हिंदू-धर्म तत्वाधारित, व्यक्ती आधारित नव्हे. आमच्या धार्मिक इतिहासातील असंख्य अवतार, महापुरुष खरोखर झालेच नाहीत असं सिध्द झालं तरीही आपल्या धर्माची अजिबात हानी होणार नाही…’ या मागील ज्ञानमय दृष्टीच्या खऱ्या शक्तिला आम्ही जाणूही इच्छित नाही, हे मोठंच दुर्दैव!

हेही वाचा… हजार रुपये पेन्शनमध्ये कसे भागणार?

अस्मिता-जखमांची खोली व त्याची कारणं संख्येनं व व्याप्तीनं मोजता येत नाहीत. पण ते समजूनही घेतलं नाही तर मात्र आपणही दृष्टीची सम्यकता गमावतो. मग ‘सीता ही जगातली पहिली परित्यक्ता!’ म्हणताना रामायणातील प्रभू रामचंद्रांच्या हृदयाची विव्हळता आम्हाला जाणवतही नाही! मान्यताप्राप्त अधिकारी निधर्मीं आयडिऑलाॅग्जना भग्वद्गीतेत कोणता संदेश दिसतो? ‘काका-मामांना निर्ममतेनं ठार करा!’ बस्स! ‘व्होटीझम’बरोबरच अशा दृष्टिकोनाची तळागाळातही पोहोचलेल्या असंख्य अभिव्यक्तींची फळं भोगण्यातून आमची सुटका कशी होणार? (हाच तर, स्वामीजी, आपण समजावलेला कर्मसिद्धांत : जातपात, दारिद्र्य वगैरे नव्हे!) हिंदू मौलिकतेवर विवेकवादी (?) विचार होण्याचं भाग्य लाभण्यासाठी, स्वामीजी, आपलं निदान एवढं एक वचन तरी भगव्या वस्त्रात ठेवलं जायला नको होतं : ‘…धर्माची विज्ञानाला सामोरं जाण्याची तयारी नसेल तर त्याचं मरण जेवढ्या लवकर ओढवेल तेवढं मानव जातीचं कल्याण लवकरच होईल!’ कोणत्या धर्माच्या कोणत्या पंडिताकडून, निदान सव्वाशे वर्षांपूर्वी तरी, एवढं धाडसी विधान कोणी ऐकलं आहे?

व्होटस्पर्धेत हीन भावनांनाही जरुर खतपाणी घातलं जातं पण लोकशाहीसमोरच्या या पेचाबरोबरच जगभरच दिसणारं एकंदरीतच अनुदारतेचं चित्र. असं का? आदर्शवादी लाटेनंतर (विसावं शतक) सर्वच जीवनांगांत व्यवहारवादी लाट अटळ का? अखेर ‘सामाजिक मालकी’, ‘राज्यविहिन समाज’ हे स्वप्न-शब्द आज उच्चारलेही न जायला ‘मी-माझे’ या जळवेच्या जाणिवेशिवाय कोण कारणीभूत आहे? ते काही असो, स्वामीजी, पण भारत उपरोल्लेखित धर्म-मानसिकतेतून तरी बाहेर पडून आपण दाखवलेल्या दिशेनं जाईल का?

धार्मिक असहिष्णुतेला जिहादी वृत्ती संबोधून ख्रिश्चन आणि इस्लामबाबत जगप्रसिद्ध इतिहास-तत्वज्ञ ॲरनाॅल्ड टायन्बी यांनी गंभीर निरिक्षणं नोंदवली आहेत ( खरा अभ्यासक ‘सेक्युलॅरिझम’च्या ‘पोथी’ची पर्वा करत नाही!) तर जगभराच्या इतिहासार्थातून आपण ( इथल्या दलितांसंबंधात) म्हणालात : ‘पश्चिमेनं आत्मा टाकला, आम्ही माणूस!’ पण व्यक्तीप्रमाणेच प्रत्येक समूहात काही तीव्र वाईट तर काही तीव्र चांगलं आढळतंच या वास्तवातून आपण आम्हांस कोणती दृष्टी दिलीत :

‘….माझ्या हृदयात भगवान श्रीकृष्ण, बुद्धच नव्हे तर ईशदूत येशू व हजरत मोहम्मद पैगंबर यांनाही स्थान आहे. तुम्ही (अमेरिकन) म्हणाल की मुस्लीम धर्मात चांगले ते काय असणार?’ (हाच प्रश्न होता पोप बेनेडिक्ट सोळावे यांचा आणि आजही आहे. तो आमच्याही मनांतला नाही का?) लक्षात ठेवा : जर काहीच चांगले नसते तर कालाच्या विनाशक शक्तीवर त्याने कशी मात केली असती? बल असते पवित्रतेत, सदाचरणात, पैगंबर समतेचे आचार्य होते. त्यांनी मुस्लिमांत रुजवलेला बंधुभाव ही एक असामान्य गोष्ट आहे. प्रत्येक धर्मात्मा ज्या एखाद्या विशिष्ट संदेशासाठी जगात अवतरतो त्याचे नीट आकलन झाले तरच त्याचे जीवनमहात्म्य कळेल. आपणच श्रेष्ठ वाटणं ही मोठीच चूक आहे, इतरांकडून नेहमीच खूप शिकण्यासारखे असते. भारताजवळ जे देण्यासारखे आहे ते प्रेम-शांतीनेच संक्रमित होऊ शकते. धर्म- तत्वज्ञान-अध्यात्मिकता हे आपल्या जीवनाचे रक्त आहे. मानवी मनाच्या विकासासाठी भरतभूमीएवढं भरीव कार्य कोणीही केलेलं नाही. इतर जातींनीही उच्च तत्वे जरूर दिली पण ती बेगुमान सैनिकांच्या रणधुमाळीतून. लाखो बांधवांचं रक्त सांडल्याशिवाय नाही…

हिंदूमध्ये अनेक दोष आहेत. पण हिंदू जाती नष्ट झाल्यास ती ज्या उच्चतत्वांचे प्रतिनिधित्व करते, ती तत्वेही लोप पावतील. तसे झाल्यास अद्वैत तत्वज्ञानही लुप्त होईल. ‘उठा, (कशासाठी? हिंदूराष्ट्रासाठी?) ‘जगातील अध्यात्मिकतेचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा… पण प्रथम (स्वतःत डोकवा)’ असो. आज सूडभाव-अज्ञानातून (‘जातीयवादी’ हा शब्द माझ्याजवळ नाही : कोणत्याही समूहासाठी!) आम्हा हिंदूंना आमच्या या वरील अमृतठेव्याचं ओझं झालंय हेही मी समजू शकतो; पण जगाला काय वाटतं?’ भारत आपल्या आध्यात्मिक परंपरेपासून दूर गेला तर मानव जातीची दृष्टीच झाकोळून गेल्याशिवाय रहाणार नाही. केवळ भारतातच आढळणाऱ्या व मानव जातीला आत्मनाशापासून वाचवू शकणाऱ्या या एकमेव व्यापक धार्मिक/ आध्यात्मिक ठेव्याचं समग्र मानव जातीची वडिलोपार्जित संपत्ती म्हणून रक्षण करण्याचा भार भारतावर आहे…’ ( ॲरनाॅल्ड टाॅयन्बी) पश्चिमेत रामकथेचा शेवट आपण असा केलात : ‘…पश्चिमे, तुझा आदर्श आहे :“कर्म करा, शक्ति दाखवा’; आमच्या सीतामाईनं (रामाकडून नव्हे, रूढीग्रस्त समाजाकडून) तिच्यावर झालेला सारा अन्याय शांतपणे सहन केला; तिची तितिक्षा हाच भारताचा आदर्श…’

अर्थात राष्ट्राला मान्य झालं तर पश्चिमेच्या ‘नीती/ सहिष्णुता विसरा, केवळ शक्ती कमवा/ दाखवा’ या आदर्शामागेही जायला इथेही कोणाला कोण अडवणार? स्वामीजी, आपणही ना सर्वज्ञतेचा दावा केलात ना आपल्या विचारांचा हट्टाग्रह :

‘कुणास ठाऊक (राष्ट्रबांधणीसाठी) कोणता आदर्श श्रेष्ठ (शक्ति की सहिष्णुतेची शक्ति)? कोणत्यानं पशुता हतबल होऊन मानवास शांती लाभेल? आपण किमान एकमेकांचे आदर्श नष्ट करणं तरी सोडून दिलं पाहिजे. आपण सारेच जीवनचक्रव्यूहातील काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग आक्रमित आहोत. एकमेकांस निदान सुयश तरी चिंतुया..!’

आणि कुणास ठाऊक, स्वामीजी, ‘शेकडों वर्षांच्या परदास्यानंतर नव-स्वातंत्र्य योध्यांकडून अत्ता अत्ताच मानसिक गुलामगिरीतून प्रथमच मुक्त केल्या जात असलेल्या नव्या युरुत्सु भारताकडून कणभर तरी तटस्थ चिंतन केलं जाण्याचं भाग्य या आपल्या विचारांना लाभेल का ?
स्वामीजी, प्रणाम आपल्या मानव-प्रेमाला, मुक्त मनाला, सहिष्णुतेला (आणि कशाकशाला बरं म्हणू?)
क्षमस्व! क्षमस्व!
आपला,

एक हिंदू विद्यार्थी

rajadesai13@yahoo.com