‘वुई ऑर अवर नेशनहूड’, ‘बंच ऑफ थॉट्स’ या आपल्या पुस्तकांमधून गोळवलकर गुरुजींनी संस्कृत, इंग्रजी, हिंदी या भाषांबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. ते पाहता आज घडीला भाषांबद्दल सुरू असलेले वादंग कोणत्या दिशेने चालले आहे, ते सहज लक्षात येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच दिल्ली येथील एका पुस्तक प्रकाशन समारंभात ‘आज ज्यांना इंग्रजी बोलण्याचा अभिमान वाटतो, त्यांना उद्या त्याच गोष्टीची लाज वाटेल’ असे उद्गार काढले. त्यांच्या या उद्गारामुळे नेहमीप्रमाणे राजकीय गहजब सुरू झाला. परंतु त्यांच्या विधानात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. इंग्रजीचे संपूर्ण उच्चाटन करून संस्कृत किंवा हिंदी राष्ट्रभाषा करणे हा रा.स्व. संघाच्या आणि भाजपच्या ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याची अंमलबजावणी पद्धतशीरपणे होत आहे.
गोळवलकर गुरुजींनी आपल्या पुस्तकांतून या मुद्द्याची सविस्तर चर्चा केली आहे. ‘राष्ट्र’ या संकल्पनेचे ते पाच प्रमुख घटक सांगतात. Country (भौगोलिक सीमा), Race (वंश), Religion (धर्म), Culture (संस्कृती) आणि Language (भाषा) हे ते पाच घटक होत. ( We or Our Nationhead defined, पृ. ६०). पुढे त्यांनी या मुद्द्याचे अधिक विश्लेषण केले आहे. भाषेचा मुद्दा अधिक विस्ताराने त्यांनी आपल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ ऊर्फ विचारधन या ग्रंथात चर्चिला आहे. (पृ. १०३ ते १०७).
इंग्रजी भाषेबद्दल ते लिहितात, ‘‘काही जणांना असे वाटते की, इंग्रजी हीच नेहमीसाठी जोडभाषा म्हणून राहावी. भाषा ही माणसामाणसांमधील परस्परव्यवहाराचे जिवंत माध्यम असल्यामुळे इंग्रजी भाषा स्वत:बरोबर इंग्रजी संस्कृती व इंग्रजी जीवनपद्धतीही आणणारच. परकी जीवनपद्धती येथे रुजू देणे म्हणजे आपल्या संस्कृतीला व धर्माला सुरुंग लावण्यासारखे आहे. इंग्रजीचा स्वीकार करणे म्हणजे आपल्या सामर्थ्यांच्या मूलस्राोतांचेच शोषण करण्यासारखे आहे. इंग्रजांनी त्यांच्या सत्तेबरोबरच त्यांची स्वत:ची भाषाही आपल्यावर जबरदस्तीने लादली. आता आपण स्वतंत्र झालो असल्याने इंग्रजांप्रमाणेच इंग्रजीचेही प्रभुत्व झुगारून दिले पाहिजे. परक्यांच्या राजवटीत तिचे जे मानाचे स्थान होते ते आजही तसेच चालू ठेवणे हे मानसिक गुलामीचेच लक्षण आहे. जगाच्या दृष्टीने आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेवरचा तो कलंक आहे. आपल्या देशातून इंग्रजीचे उच्चाटन होणार याविषयी यत्किंचितही संदेह नाही.’’
भारतीयांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार आपली सहभाषा म्हणून केला याबद्दल कमालीची चीड त्यांच्या पुढील वाक्यातून दिसून येते. ते लिहितात, ‘‘…भारतीय भाषांचा एकमेव शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे इंग्रजी भाषा…’ (पृ. १०५).
इंग्रजीचे या देशातून संपूर्ण उच्चाटन करून संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी असे ते म्हणतात. ते लिहितात, ‘‘…भाषांची राणी- देववाणी संस्कृत हीच या सर्व भाषांचे स्फूर्तिस्थान आहे. ही भाषा अतिशय समृद्ध आहे आणि तिच्या पावित्र्यामुळे राष्ट्रीय व्यवहाराचे माध्यम केवळ हीच भाषा होऊ शकेल.’’ (पृ. १०४). गृहमंत्री ज्या वेळी असे म्हणतात की, ‘आपल्या देशाचा राज्यकारभार पुन्हा एकदा आपल्याच भाषेतून चालवू’, त्या वेळी त्यांना कोणती भाषा अपेक्षित आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही.
संस्कृत ही या देशाची राष्ट्रभाषा व्हावी हे धोरण किती अव्यवहार्य आहे, हे मुद्दाम सांगण्याची आवश्यकता नाही. भारतीयांचा आदिस्राोत संस्कृतातूनच आहे व त्याकरिता संस्कृतचे अध्ययन आवश्यक आहे, यात वाद नाही. परंतु नियमांनी जखडून टाकलेली व निदान व्यवहारातून तरी पूर्णपणे नाहीशी झालेली भाषा ही ‘देववाणी’ म्हणजे आभाळात बसलेली असेल तर ती पृथ्वीवरील असंख्य भारतीय बहुजनांची भाषा कशी काय होऊ शकणार? हा देश मूठभर संस्कृततज्ज्ञांचा आहे की कोट्यवधी जनतेचा? जेथे संस्कृत ही ‘मृत’ भाषा झाली आहे किंवा नाही असा वाद सुरू आहे ती भाषा राष्ट्रभाषा झाल्यास काय काय मौजा होतील याचे विनोदी वर्णन करण्यास आचार्य अत्रे किंवा पु.ल. देशपांडे यांचीच प्रतिभा हवी.
कदाचित संस्कृतबद्दलची ती वस्तुस्थिती गुरुजींच्याही लक्षात आली असावी. म्हणून ते लिहितात, ‘‘…दुर्दैवाने आज संस्कृत भाषा दैनंदिन व्यवहारात राहिली नाही. संस्कृत भाषेला ते स्थान प्राप्त होईपर्यंत, त्यातल्या त्यात सोयीचे म्हणून हिंदीलाच अग्रस्थान द्यावे लागेल. साहजिक आपण हिंदीचे जे स्वरूप निवडायचे ते इतर सर्व भारतीय भाषांप्रमाणेच संस्कृतोत्पन्न असले पाहिजे… आपल्यापैकी फार मोठ्या जनसमुदायाची बोली भाषा हिंदी आहे आणि सर्व भाषांच्या मानाने शिकावयास व बोलावयास ती सोपीही आहे… म्हणून आपण राष्ट्रीय एकता व स्वाभिमान यांच्या जपणुकीसाठी हिंदीचाच स्वीकार केला पाहिजे… इतर भाषांवर हिंदीची कुरघोडी किंवा आक्रमण चालू आहे ही आरोळी म्हणजे तर मतलबी राजकारण्यांनी रचलेली कपोलकल्पित कथा आहे.’’
आता येथे हे लक्षात येईल की, महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीचा समावेश अभ्यासक्रमात करणे यावर जोर का देण्यात येत आहे. हिंदू राष्ट्राची एकच, हिंदी ही राष्ट्रभाषा राहील, हा संघाचा आणि भाजपचा ‘हिंदी राष्ट्र’ निर्मितीतील एक महत्त्वाचा अजेंडा त्यामागे आहे.
इंग्रजीचे या देशातून उच्चाटन करणे यामागे संघ-भाजपच्या अजेंड्याप्रमाणे आणखीही राजकीय कारण असू शकते. आपले ‘विश्वगुरू’ ज्या वेळी परदेशात जातात त्या वेळी त्यांच्यावर अनेक कारणांवरून टिप्पण्या होत असतात. विशेषत: वागण्यावरून आणि इंग्रजी बोलण्यावरून. गृहमंत्र्यांच्या विधानावरून ज्या वेळी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या त्या वेळी भाजपच्या प्रचारतंत्राकडून ‘विरोधकांकडून पंतप्रधानांच्या इंग्रजी बोलण्याची जी थट्टा उडवली जाते, त्याला उत्तर म्हणून गृहमंत्री तसे बोलले’ असे उत्तर देण्यात आले. आपल्या पंतप्रधानांच्या इंग्रजीबद्दल एकीकडे ही वस्तुस्थिती दिसते, त्याच्या उलट स्थिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत दिसते. राहुल गांधींचे इंग्रजी अतिशय सुंदर आणि सफाईदार आहे. ते लोकसभेत कधी हिंदी तर कधी इंग्रजीतून भाषण करतात. पण ज्या वेळी ते इंग्रजीतून भाषण करतात त्या वेळी ते अधिक सहज (Comfortable) असतात. त्यांच्या इंग्रजी भाषणाच्या वेळी संसदेत कमी कोलाहल असतो, हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांच्या विरोधकांना त्यांचे इंग्रजीतील भाषण समजण्यास फार त्रास होतो. कुणी काही म्हणो, पण आपल्या समाजात अस्खलित आणि शुद्ध इंग्रजी बोलणारे लोक समाजात उठून दिसतात. राहुल गांधींच्या बाबतीत नेमके हेच होत असते. त्यांच्या या गुणामुळे समाजमाध्यमावर त्यांचे फार कौतुक होत असते. कदाचित राहुल गांधींची ही स्तुती न आवडण्याचे कारणही गृहमंत्र्यांच्या या उद्गारामागे असावे. अर्थात हा एक संशय आहे. तो चुकीचाही राहू शकेल. पण तो येतो एवढे मात्र खरे!
खरी गोष्ट अशी आहे की, उत्तम इंग्रजी येणे याचा बुद्धिमत्तेशी आणि कर्तृत्वाशी अजिबात संबंध नसतो. स्वत: पंतप्रधान हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. इंग्रजी भाषेसंबंधातील सर्व अडथळे ओलांडत त्यांनी पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे. पण कितीही नाही म्हटले तरी उत्तम इंग्रजी येणे हा आपल्या देशात कौतुकाचा विषय होऊन राहिला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर हेही नाकारून चालणार नाही की आपल्याकडील ज्ञानक्षेत्र वृद्धिंगत होण्यास इंग्रजांचा व इंग्रजीचा फार मोठा हातभार लागलेला आहे. एवढेच नव्हे तर मानवी जीवनाची काही दालनेच इंग्रजी भाषेमार्फत भारतीयांना खुली झाली आहे. त्याचबरोबर स्वत:च्या ज्ञानाचा प्रसार होण्याकरिता इंग्रजीवाचून पर्याय नाही हेही भारतीयांनी ओळखले होते. ‘आय अॅम द शिवाजी ऑफ द मराठी लँग्वेज’हे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजीमधून सांगितले. न्यायमूर्ती रानडे हे इंग्रजीतून व्याख्याने देत. लो. टिळकांनी ‘दि ओरियन’ आणि ‘आर्क्टिक होम इन द वेदाज’ हे जाडे ग्रंथ इंग्रजीमधून लिहिले. म.म. पां. वा. काणे यांनी ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ हा सर्वत्र गाजलेला पंचखंडात्मक ग्रंथ इंग्रजीमधूनच लिहिला. विद्वान भाषाशास्त्रज्ञ सुनीतीकुमार चॅटर्जी यांना ‘द ओरिजिन डेव्हलपमेंट ऑफ द बेंगाली लँग्वेज’ या इंग्रजीतून लिहिलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण प्रबंधाला डि. लिट्. मिळाली. अशी आणखीही बरीच उदाहरणे देता येतील. इंग्रजी भाषेप्रमाणेच इंग्रजी वाङ्मयकारांचाही आपल्याकडील लेखकांवर जबरदस्त प्रभाव आहे. आधुनिक कवितेचे जनक केशवसुत यांची कविताच मुळी इंग्रजी काव्याच्या प्रभावाने अवतरली आहे. हीच बाब कथा, कादंबरी, नाटके यांनाही लागू पडते. आम्हा मराठी लेखकांना इंग्रजीचे एवढे जबरदस्त आकर्षण असते की आमच्या लिखाणात इंग्रजी विचारवंतांचे चार-दोन उतारे अथवा सुभाषिते आल्याशिवाय आमची विद्वत्ताच सिद्ध होऊ शकत नाही, असा आम्ही आमचा समज करून घेतला आहे. एकंदरीत भारतीय भाषांचे व विशेषत: मराठीचे भरपूर पोषण इंग्रजी भाषेने आणि वाङ्मयाने केले आहे. आणि असे असूनदेखील मर्ढेकर म्हणत की, ‘आपण इतके परपुष्ट आहोत की अजून पुरेसे परपुष्ट नाही.’ याचा अर्थ ते मराठी लेखकांकडून अजून पाश्चात्त्य वाङ्मयाच्या अभ्यासाची अपेक्षा आणि आवश्यकता व्यक्त करीत होते.
सारांश, इंग्रजीचे सांस्कृतिक ऋण आपण मान्य केलेच पाहिजे. आज इंग्रजी आपल्या हाडीमांसी इतकी खिळली आहे की इंग्रजीशिवाय व्यवहार याची कल्पनाच आपण करू शकत नाही. काही काही मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्दांनीच आपल्याला चट्कन अर्थबोध होतो. म्हणून लिहिताना आपण अनेक वेळा मराठी शब्द लिहून त्याचा इंग्रजी प्रतिशब्द कंसातून देतो. आज बहुतेक मंत्र्यांची मुले परदेशात शिक्षणासाठी जातात, त्यांचे पी.ए., सेक्रेटरी परदेशात जातात, ते स्वत:ही जातात. अशा वेळी जर त्यांना इंग्रजी बोलायची लाज वाटली तर एकमेकांशी भाषिक दळणवळण होणारच कसे? इंग्रजीमुळे जगाशी उत्तम रीतीने जोडले जाते, अनेक मार्ग आणि विकल्प निर्माण होतात. एक निरीक्षण असेही सांगते की, ज्यांना उत्तम इंग्रजी येते त्यांना नोकरीसाठी अधिक मागणी असते आणि त्यांचे आर्थिक उत्पन्नही इंग्रजी न येणाऱ्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे आपल्याला इंग्रजी लवकरात लवकर कसे उत्तम बोलता येईल, याकडे तरुणाईचा जास्त ओढा असतो. हे सर्व लक्षात घेऊन इंग्रजीविषयी भलता आदर अथवा भलता तिटकारा या दोन्ही भूमिका त्यागून ‘इंग्रजीशिवाय’ याऐवजी ‘इंग्रजीसह’ हीच भूमिका घेणे योग्य आहे. यातच आपल्या देशाचे कल्याण, विकास आणि प्रगती आहे, यात संशय नाही.
rajendradolke@gmail.com