‘तो आपल्यात होता कधी?’ हा अग्रलेख (१९ एप्रिल) वाचला. मराठी वाचकांना गार्सिया माक्र्वेझ हा लेखक फारसा माहीत नाही, याविषयीचे सगळे विवरण मान्यच आहे. अग्रलेखात दाखवून दिलेल्या या वस्तुस्थितीचे एक कारण असे संभवते की मराठीतले बहुसंख्य उच्चभ्रू वाचक हे सिलिकॉन व्हॅलीवर नजर ठेवून असतात. वैयक्तिक-आर्थिक-भौतिक भरभराट सोडली तर मूलभूत मानसिक-सामाजिक परिवर्तनाविषयी त्यांना अजिबात आस्था नसते. कारण त्यांनी परिवर्तन हे डाव्या विचारसरणीशी मनोमन जोडूनच टाकलेले असते, परिवर्तन झाले तर पिढय़ान्पिढय़ा आपल्याकडे असलेले सामाजिक नेतृत्व दूर जाईल, अशी त्यांना भीती वाटत असावी. भारतात नाइलाजाने राहणारे त्यांचे सगेसोयरे इथेच राहूनदेखील मराठी-हिंदी वाहिन्या तसेच इंग्रजी वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये गुरफटणे पसंत करतात, इथपर्यंत ठीकच आहे, पण या साऱ्यांना फडके-खांडेकर व नंतरचे श्री. ना. पेंडसे, पु. ल. देशपांडे हेच मराठीतले चालू काळातले दखलपात्र असे लेखक वाटतात. हिंदू या संकल्पनेचा भालचंद्र नेमाडे त्यांच्या कादंबरीतून वेगळा अन्वयार्थ ऐतिहासिक विश्लेषणाद्वारे लावून दाखवतात हे त्यांना समजूनदेखील घ्यायचे नसते. कारण त्यांच्या हिंदुत्वाच्या कल्पनेला नेमाडे धक्का देऊ शकतात. अशा वाचकांच्या आधीच्या पिढीतील बुद्धिजीवी मंडळींना आपल्याच उच्च जातीत जन्मलेल्या बुद्धिमान, विद्वान आणि श्रेष्ठ साहित्यिकांहून मोठे प्रतिभावान साहित्यिक (शेक्सपियरचा अपवाद सोडून, कारण तो आपलाच वाटावा, अशी किमया ब्रिटिशांनी करून ठेवली आहे.) दुसरा कुणीही आणि जगात कुठेही असूच शकणार नाही, असे अगदी मनापासून वाटत असायचे. परिणामी मागच्या आणि चालू पिढीतील या मंडळींना गार्सियाविषयी व त्याच्या ‘वन् हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिटय़ूड’ या नोबेल पुरस्कार विजेत्या कादंबरीविषयी काहीच माहीत नसते यात नवल नाही. माक्र्वेझ हा डाव्या विचारसरणीचा पत्रकार-लेखक असल्यामुळेदेखील त्याच्याकडे जरा दुर्लक्षच केलेले बरे, असाही अनेकांचा सोयीस्कर समज असावा. त्यामुळे गार्सिया कोण वा त्याने केवळ गोष्टी सांगता सांगता काय विलक्षण जादूई साहित्यनिर्मिती केली आहे, हे बहुसंख्य मराठी वाचकांना माहीत नसते. हे स्वाभाविक अशासाठी म्हणायचे की सामाजिक अभिरुचीचे नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थांमध्ये या मंडळींचे वेगवेगळ्या कारणांनी प्राबल्य आणि वर्चस्व असते.
आणि तरीही गार्सियाचे वास्तव आणि अवास्तव वा अद्भुताचे मिश्रण असलेले (ज्याला पाश्चात्त्य टीकाकार मॅजिकल रिअॅलिझम् असे म्हणतात.) कथन एकूणच भारतीय मनाला विलक्षण भावते (म्हणजे उपरोक्त काही समाजविशिष्ट व भाषाविशिष्ट अडथळ्यांना पार करून गार्सियाचे लेखन त्यांच्यापर्यंत पोहोचते म्हणून), कारण हा वाचकवर्ग मुळात शहरांपासून दूरच्या खेडय़ाशी जन्माने वा अन्य कारणांनी जोडलेला असतो. लहानपणापासून असे अनेक वाचक स्वत:च अशा संमिश्र वातावरणात वाढलेले असू शकतात की त्यांना त्या वास्तव-अवास्तव मिश्रणात खटकणारे, चुकीचे वा अविश्वसनीय असे काहीच दिसत नाही. किंबहुना आयुष्य असेच संमिश्र असते, असाच समज घेऊन ती मंडळी वाढत मोठी झालेली असतात.
जाता जाता, हे सांगावेसे वाटते की बाकीच्यांचे सोडा. पण ‘वन् हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिटय़ूड’ या ‘सिअॅन अॅन्यूस द सोलेदाद’च्या इंग्लिश भाषांतरावरून मराठी भाषांतर केलेल्या माझीही समजूत तशीच आहे की माझ्या वास्तवाच्या कल्पनेला त्या कादंबरीने कुठेही धक्का वगैरे बसलेला नाही. गोव्यातील माझ्या पस्तीस वर्षांच्या वास्तव्यामुळे मला इतर मराठी माणसांपेक्षा कॅथलिक कल्चरची थोडी अधिक माहिती असल्याने मी ते भाषांतर करण्याचे काम लेखकमित्र रंगनाथ पठारेंच्या सूचनेवरून अंगावर घेतले. मनापासून झटून चार वर्षांत ते काम पूर्णही केले. ते आता प्रकाशित होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
मुखवटा चांगलाच असावा.. चार्लीसारखा!
‘याचे उत्तर शोधावे का?’ या गिरीश कुबेर यांच्या मूळ प्रश्नाविषयी (अन्यथा, १९ एप्रिल) थोडेसे आश्चर्य वाटले. अशा वेळी आपण गांधीजींची तीन माकडे कशी काय विसरतो?
अशा प्रकारच्या माहितीतून काय साध्य होते? झालेच तर स्वार्थी सुखासाठी असे दुसऱ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांच्या नजरेत हे आले तर ते अधिक अन्याय करायला प्रवृत्त होतील. किंवा आपापल्या वाईट वर्तणुकीची तुलना या दिग्गजांबरोबर करून, आपण बरे असे स्वत:च ठरवतील. म्हणून आपण ती जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने कोणाला सांगूही नये.
एकंदरीत आपला समाज सुधारत आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना आता कायद्याची कडक बंधनेही आहेत आणि त्यातूनही गोष्टी घडल्या तर कठोर शिक्षाही होताना दिसतात. त्यामुळे लेखाच्या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे जग ही एक रंगभूमी असेल आणि जर प्रत्येक जण मुखवटा घेऊन असेल तर तो चांगलाच असावा.. चार्लीसारखा..
– आशुतोष मोर्वेकर
निवडणूक आयोग शरपंजरी का पडला?
‘हे पापच.’ हा अग्रलेख (२५ एप्रिल) वाचला. पत्ताबदल व दिवंगत झालेले असेच मतदार फक्त विद्यमान मतदार यादीतून बाहेर पडतात असे नियंत्रण असताना ‘मतदार’ यादीतून बाहेर पडतोच कसा? निवडणूक आयोगाने आपले काम चोख केले तर आपापली नावे यादीत आहेत किंवा काय, हे तपासण्याची जबाबदारी जुन्या यादीत समाविष्ट असलेल्या व आधी मतदान केलेल्या मतदारांवर का यावी?
माझ्या बाबतीत सांगायचे तर २००९ साली जुन्या पत्त्यावरील मतदार यादीतून बाहेर पडलेले नाव या वेळी पुन्हा निवडणूक यादीत समाविष्ट झाले. म्हणजे नवीन व जुना पत्ता असे दोन्ही ठिकाणी आमचे कुटुंब या संगणकयुगात मतदार यादीत समाविष्ट कसे होऊ शकते? अशा सर्व प्रश्नांवर ‘निवडणूक आयोगाकडे स्वत:ची अशी यंत्रणा नाही’ हे रामबाण उत्तर म्हणजे स्वत:ची जबाबदारी झटकणे नव्हे काय? खेडेगावात वीज नाही व संगणक नाहीच नाही. तरीसुद्धा ऑनलाइन अर्जाची सक्ती काही वेळा केली जातेच ना! तशीच स्वत:ची यंत्रणा ठेवण्याची सक्ती निवडणूक आयोगावर कोण करणार? १९९१ साली निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालेल्या सुमारे ३५० बळींची दखल घेत टी. एन. शेषन यांनी १९९३ साली निवडणूक प्रक्रियेवर एकहाती, लोकोपयोगी सुधारणांची पकड व आदरयुक्त भीती आणली होती. तोच शेषन यांचा निवडणूक आयोग आता असा शरपंजरी का पडला आहे, हे या भारतातील सुजाण मतदाराला पडलेले एक कोडेच आहे.
प्रवीण आंबेसकर, ठाणे</strong>