लोकमानस : अभ्यासाशिवाय मते, कमालीची असहनशीलता

आपण भिन्न विचारांचा सन्मान करू शकलो, तर हा गणराज्य दिन खऱ्या अर्थाने चिरायु होईल!

‘चुकीचा बरोबर अर्थ!’ (२५ जानेवारी) हे संपादकीय वाचून पुन्हा लक्षात आले की, आजचे राजकारणी स्वातंत्र्यसैनिकांनाही आपल्या राजकीय लाभासाठी वाटून घेतात. ज्याचे मार्केटिंग चांगले, संभाषण प्रभावी, प्रसिद्धी चांगली त्या नेत्याचे बरोबर अशी सोपी व्याख्या रूढ झाली आहे. अभ्यासाशिवाय मते बनवण्याची एक सोपी पद्धत अस्तित्वात आली आहे. अशी पूर्वाग्रही मते देशाच्या एकात्मतेला घातक आहेत.  लोकही हल्ली आपल्याहून वेगळा विचार, धर्म, भाषा असलेल्या व्यक्तीच्या भिन्नतेचा सन्मान करू शकत नाहीत. भिन्न व्यक्ती चुकीची व मी बरोबर असे सोपे वर्गीकरण करून मोकळे होतात. आजच्या या प्रजासत्ताकदिनी आपण कुठल्याही नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अभ्यासाअंती मत बनवू शकलो तर आपला समृद्ध इतिहास व स्वातंत्र्यसैनिकांचे समर्पण लक्षात येईल. आपण भिन्न विचारांचा सन्मान करू शकलो, तर हा गणराज्य दिन खऱ्या अर्थाने चिरायु होईल!

सौरभ जोशी, बुलढाणा

समांतर प्रवासाचा इतिहास..

नेहरू विरुद्ध बोस असे कथानक स्वातंत्र्यानंतर अतिशय काळजीपूर्वक उभे केले गेले आहे.  प्रा. रुद्रांशू मुखर्जी यांचे पुस्तक (मराठी अनुवाद : अवधूत डोंगरे) यातील अनेक बाबींवर झगझगीत प्रकाश टाकते. जवाहरलाल नेहरू सुभाषबाबूंना आपला लहान भाऊ मानत. १९३९ च्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून पट्टाभि सीतारामय्या यांचा त्यांनी केलेला पराभव गांधींनी स्वत:चा पराभव मानला आणि सर्व काँग्रेस कार्यकारिणीला राजीनामा द्यायला लावला. कार्यकारिणीशिवाय काम करणे अशक्य असल्याने सुभाषबाबूंनी नाइलाजाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अशा वेळी नेहरूंनी सुभाषबाबू आणि गांधीजी यांच्यात समेटाचे आटोकाट प्रयत्न केले. कमला नेहरू विदेशात आजारी असताना सुभाषबाबूंची आणि नेहरूंची भेट झाली होती. तेव्हाही त्यांचे संबंध जिव्हाळय़ाचेच होते असे लेखक नमूद करतात. नेहरू आणि बोस दोघांचाही समाजवादावरील गाढ विश्वास, स्वातंत्र्याचा ध्यास आणि त्यागाची तयारी यामुळे  १९२१ ते १९४१ या २० वर्षांत दोघांचाही प्रवास समांतरपणे झाला. भारतीय जनतेत स्वातंत्र्याची चेतना निर्माण करण्यात आपल्याइतकाच सुभाषबाबूंचा वाटा आहे हे नेहरूंना माहीत होते आणि सुभाषबाबूंचे श्रेय नेहरूंनी कधीही नाकारले नाही, असेही रुद्रांशू मुखर्जी यांनी या पुस्तकात संदर्भासहित नोंदवले आहे. आझाद हिंदू सेनेच्या सैनिकांवरील खटल्यात नेहरूंनीही बॅरिस्टरीचा गाऊन चढवून त्यांचा बचाव केल्याचा दाखलाही लेखक देतात.

अ‍ॅड्.  प्रमोद ढोकले, मुंबई

नेते खोटा इतिहास सांगत असले तरी..

‘चुकीचा बरोबर अर्थ!’ हे संपादकीय वाचले.  मागील काही वर्षांपासून फक्त समाजा- समाजातच मतभेद निर्माण करण्याचे कार्य चालू आहे असे नव्हे; तर स्वातंत्र्यलढय़ातील अग्रणींमध्ये मुळात नसलेली वैरभावना निर्माण करण्याचे काम सोयीस्करपणे सुरू आहे. अशा वातावरणात नागरिकांनी सजगता दाखवणे गरजेचे आहे. आपले नेते खोटा इतिहास सांगत असले तरी आपण तो पडताळायला हवा.  

विशाल रोकडे पाटील, अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती)

केवळ पुतळे उभारून काय होणार?

आपली जनमानसातील ढासळत चाललेली प्रतिमा सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतोच आहे; पण हे केवळ या महान विभूतींचे केवळ भव्य पुतळे उभारून साध्य होणार आहे का? स्वामी विवेकानंदांपासून सुभाषबाबूंपर्यंत सगळय़ांनी हिंदूुत्ववादी संघटना व त्यांचे नेते यांच्यावर कडक ताशेरे ओढले होत.े हे सत्य जगासमोर आणण्याचे काम मोदी सरकारने केले तर त्यांचा प्रामाणिकपणा दिसेल.. अन्यथा इतिहासातील चुका सुधारण्याच्या नावाखाली आपला छुपा अजेंडा पुढे नेण्यासाठी हा आणखी एक मार्ग, इतकेच!

डॉ. प्रकाश तोवर, नागपूर

संघ-भाजपने स्वत:च्या भूमिका तपासाव्यात

‘चुकीचा बरोबर अर्थ!’ हा अग्रलेख वाचला. ‘काही ऐतिहासिक चुका’ दुरुस्त करण्याच्या गोंडस नावाखाली इतिहासाची तोडफोड करताना संघ व भाजप  आपल्या वैचारिक भूमिकेशीही तडजोड करत आहेत. नेहरू, पटेल, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस या नेत्यांची हिंदूुत्वाविषयी, मुस्लिमांविषयीची विचारसरणी संघविचाराच्या विपरीत आहे. या नेत्यांच्या पुतळय़ांसोबत ते विचारदेखील संघ-भाजप स्वीकारणार आहे का, हे एकदा स्पष्ट व्हायला हवे. खरे तर हा विवाद फक्त काँग्रेसला, विशेषत: गांधी-नेहरू कुटुंबाला  बदनाम करण्यासाठी बोस आणि पटेलांच्या पुतळय़ाआडून वार करण्याइतपत मर्यादित नसून तो हिंदूुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारांच्या संघर्षांचादेखील आहे. विचारांच्या या संघर्षांत बुद्धिभेदाची ही असली अस्त्रे उपयोगाची नाहीत, कारण याने संघ-भाजपच्या वैचारिक भूमिकेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहाते. त्यामुळे असल्या कुचकामी अस्त्रांपेक्षा संघ-भाजपने आपल्या भूमिका पुन्हा एकदा तपासून पाहाव्यात.

हेमंत पाटील, नालासोपारा

हिंदूत्ववादी तेव्हा काय करत होते?

सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंदू सेना स्थापन करीत असताना ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा’ असे सशस्त्र लढय़ाचे आवाहन देशातील तरुणांना केले. मात्र १९४२च्या ऑगस्टमध्ये बर्लिनच्या रेडिओवरून आपण या वेळी भारतात नसल्याची खंत व्यक्त करून भारतीय जनतेस ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहनही केले होते. पण या वेळी संघ, हिंदू महासभा अथवा त्यांचे हिंदूत्ववादी साथीदार काय करत होते? नंतर आझाद हिंदू सेनेतील ज्या स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांनी पकडले त्यांच्याविरोधात खटले चालू असताना बॅरिस्टर सावरकर व त्यांचे हिंदूत्ववादी साथीदार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण नेहरूंनी देशवासीयांना दिवाळी साजरी न करण्याचे आवाहन केले. त्या वर्षी देशात काळी दिवाळी साजरी केली गेली.  नेहरूंच्या या आवाहनास मुस्लीम लीगनेही पाठिंबा दिला. पण हिंदूत्ववादी मात्र या वेळी अलिप्त राहिले. स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय संग्रामात हिंदूत्ववाद्यांनी जी भूमिका घेतली होती ती चुकीची होती हे मान्य करून इतिहासातील या चुकीची दुरुस्ती मोदी करतील काय?

गिरीश नार्वेकर, जोगेश्वरी पूर्व (मुंबई)

वैचारिक वारसा विसरण्याची किंमत.. 

‘चुकीचा बरोबर अर्थ!’ हा अग्रलेख  वाचला. कोणताही पक्ष किंवा विचारधारा देशाच्या महान व्यक्तिमत्त्वांना विसरते, तेव्हा त्यांचे अपहरण करून इतर लोक त्यांना आपल्या ताब्यात घेतात. सरदार वल्लभ पटेल कट्टर गांधीवादी, काँग्रेसवादी होते, नेहरूंना महान नेता मानत होते.  गांधीहत्येकरिता रा. स्व. संघाला जबाबदार धरून त्यांनी संघावर बंदीही आणली होती. आज भाजपने गांधी-नेहरूंच्या तुलनेत सरदारांना उभे करून एक अनावश्यक वाद निर्माण केला. याबाबतीत राजकीय विश्लेषकांचे असे मत आहे की, काँग्रेस इंदिरा-राजीव प्रेमात गुरफटली नसती आणि सरदारांना विसरली नसती, तर भाजपला सरदारप्रेमी बनण्याची संधी मिळाली नसती. लोकशाहीत पक्ष, चळवळ किंवा विचारधारेने आपले नेते वा चिन्हांना इतके उपेक्षित ठेवू नये की इतर कोणीही त्यांचा सामाजिक- राजकीय फायदा घेण्यासाठी अवलंब करेल.

आज उठसूट सावरकरांचे नाव घेणारा भाजप आणि हिंदूत्ववादी संघटना सावरकरांच्या गाईच्या संदर्भातील वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करतात. याउलट, जे विवेकानंद धार्मिक कट्टरतेच्या विरोधात अनेक गोष्टी सांगत होते, ज्यांचे शब्द आज नागरिकत्व दुरुस्तीविरोधी लढय़ात उपयोगी पडू शकतात, त्यांना फक्त धर्म आणि अध्यात्म किंवा त्यातही भगव्या रंगामुळे विलग करण्यात आले. वैचारिक वारसा विसरण्याची किंमत लोकशाहीत मोजावी लागते.

तुषार अशोक रहाटगावकर, डोंबिवली पूर्व

सुशिक्षित नेत्यांची संयमी सभ्यता..

‘चुकीचा बरोबर अर्थ!’ या संपादकीयात प्रा. नरहर कुरुंदकरांनी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी १९७२ साली केलेल्या भाषणाचा संदर्भ दिलेला आहे. ‘नेताजी विरुद्ध गांधी, नेहरू’ हा प्रचार खोटा आहे, हे संदर्भानिशी सांगणारेही असंख्य पुरावे आहेत. पण सत्य नेहमीच कासवाच्या गतीने धावत असते. कुरुंदकरांच्या त्या १९७२ च्या भाषणाआधीच, स्वातंत्र्य मिळवल्यापासून ही कूटनीती शाखाशाखांवर भिनवली जात आहे. गांधी, सुभाषचंद्र बोस आणि नेहरू यांच्यात काही विषयांबाबत मतभेद होतेच. पण संयम, दुसऱ्यांच्या विचाराला समजून घेण्याची सभ्यता त्यांच्यात होती. या नेत्यांपैकी अनेक जण कायदा, तत्त्वज्ञान, इतिहास यांचे शिक्षण घेऊन आलेले होते. गांधी, नेहरू यांच्याबद्दल द्वेष पसरवणारे नेते किती सुशिक्षित आहेत, याचे प्रतििबब त्यांच्या विचारांत आणि कृतींत पडत असते. तरीसुद्धा पुन्हा तोच द्वेष, खोटे विचार पसरवण्याची कूटनीती ते सोडत नाहीत.

जयप्रकाश नारकर, पाचल (ता. राजापूर, जि. रत्नागिरी)

(‘हे नेते एकमेकांचे वैचारिक मतभेद असूनही, एकमेकांचा आदर राखत असत,’ अशा आशयाचे पत्र प्रदीप करमरकर, ठाणे यांनीही पाठविले आहे.)

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta readers mail loksatta readers comments loksatta readers reaction zws 70

Next Story
लोकमानस : डॉ. लागू मांडत तीच कलाकाराची खरी भूमिका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी