पराभवांनी काँग्रेस संपणार नाही; पण..

‘काय ते एकदाचे करा!’ हे संपादकीय (२१ डिसेंबर) वाचले. एखाद्या राजघराण्याप्रमाणे वंशपरंपरागत नेतृत्व आपल्याकडेच राखून ठेवणे आणि वर लोकशाहीच्या नावाने ढोल बडवणे ही संकुचित वृत्ती आजच्या काँग्रेसच्या अध:पतनाला जबाबदार आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधील खडाजंगी पक्षात दुफळी निर्माण करीत आहे. वरिष्ठांना राहुल गांधी यांचे नेतृत्व तकलादू वाटत आहे; तर राहुल यांच्याकरिता पक्षातील वरिष्ठ मंडळी अडथळे ठरताहेत. काँग्रेसच्या उतरत्या काळात गांधी कुटुंबीयांवर स्वकीयांकडून होणारी टीका जिव्हारी लागणारी असली, तरीही ती रास्त आहे. कपिल सिबल यांच्याबरोबरीनेच काँग्रेसमधील शीर्षस्थ नेते पक्षाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका करताना दिसतात. लोकशाही राष्ट्रात घराणेशाही किती काळ तग धरणार याचे आत्मपरीक्षण गांधी कुटुंबीयांनी करायला हवे. महात्मा गांधींच्या स्वप्नातील ही काँग्रेस नक्कीच नाही. सर्वाना संधी मिळायला हवी यासाठी गांधीजी नेहमीच आग्रही होते. काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येण्यासाठी सक्षम, कणखर नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी यांचे कुचकामी नेतृत्व, पक्षश्रेष्ठींची चापलुसी करण्यात व्यग्र असलेला एक गट आणि ज्येष्ठांचा ढासळत चाललेला संयम यांमुळे काँग्रेस दिशाहीन ठरत आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची तसदी काँग्रेस नेतृत्वाने कधी घेतलीच नाही. त्याहीपलीकडे जाऊन पाहिल्यास, त्यांना तिथपर्यंत पोहोचू न देण्याचे गलिच्छ राजकारण स्थानिक पातळीवरील नेत्यांनी केल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम आज काँग्रेस भोगत आहे. आज ना उद्या काँग्रेसला गांधी परिवार सोडून नेतृत्वाचा विचार करावाच लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करणे जरुरी असले, तरी एका पराभवाने काँग्रेस संपणार नाही. परंतु आपल्या परिघाबाहेर जाऊन विचार न केल्यास काँग्रेसचे अध:पतन अटळ आहे.

– श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे

अशाने अस्तित्व तरी राहील का?

‘काय ते एकदाचे करा!’ हा अग्रलेख(२१ डिसेंबर) वाचला. गेल्या सहा वर्षांत देशभरात अनेक निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळूनही भाजपचे अमित शहा पायाला भिंगरी लावून फिरत आहेत, वातावरण ढवळून काढीत आहेत; काँग्रेसचे नेते मात्र दिशाहीन होऊन अजूनही गोल गोल फिरताहेत. आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या, त्यांत केंद्रीय नेतृत्वाचा फारसा सहभाग नसताना काँग्रेसचे इतके तरी उमेदवार निवडून कसे आले, हेच आश्चर्य! प्रादेशिक पक्षांना अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे हे असेच चालू राहिले, तर नजीकच्या भविष्यात लोकशाहीचा आवश्यक घटक असलेला सक्षम विरोधी पक्ष राष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात तरी असेल का, अशी रास्त भीती वाटते.

– अभय दातार, ऑपेरा हाउस (मुंबई)

काँग्रेसला काँग्रेसच हरवते!

‘काय ते एकदाचे करा!’ या संपादकीयातून (२१ डिसेंबर) काँग्रेस आणि काँग्रेसमधील २३ पत्रवीरांना विचारलेला प्रश्न अतिशय योग्यच आहे. काँग्रेसच्या भवितव्यावर मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले; एकीकडे भाजपची वाटचाल ‘शतप्रतिशत’च्या दिशेने सुरू आहे, तर काँग्रेसची वाटचाल ‘भारत मुक्त’च्या दिशेने होत असल्याचे चित्र आहे. अर्थात काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला काँग्रेस शीर्षस्थ नेतृत्वापासून नेते-कार्यकर्ते सगळेच जबाबदार आहेत, हे नाकारून चालणार नाही. समोर भाजप आणि मोदी-शहा यांचे मोठे आव्हान असताना काँग्रेसमध्ये मात्र गटबाजी, इतर नेते आपापले नातेवाईक, सुभेदारी, गोतावळा सांभाळण्यात धन्यता मानताना दिसतात. सद्यस्थितीत जनमानसावर छाप पाडून पक्षात नवचैतन्य निर्माण करेल, पक्षसंघटना मजबूत करेल असे नेतृत्व काँग्रेसकडे नाही. अग्रलेखात काहींचा ‘तरंगते नेते’ असा केलेला उल्लेख अतिशय चपखल आहे. काँग्रेसला काँग्रेसच हरवते, हा आजवरचा इतिहास आहे. राहुल गांधी यांना पुरेसा वेळ दिला गेला आहे, त्यांनी एकदा काय तो निर्णय घेऊन काय ते एकदाचे ठरवावे. काँग्रेसने नवतरुणांमध्ये काम करण्याची गरज आहे. पक्षवाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, मात्र नेते आणि कार्यकर्त्यांची तशी मानसिकता असणे गरजेचे आहे. आज देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची नितांत गरज आहे; एकाधिकारशाही, छुपी आणीबाणी देशाला परवडणारी नाही. कोणी काहीही म्हटले तरी, देशव्यापी पक्ष म्हणून काँग्रेसकडेच आशेने पाहिले जाते हेही तितकेच खरे आहे!

– अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)

भरती प्रक्रिया ‘उरकून’ घ्यायची आहे का?

‘सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी काळ्या यादीतील कंपन्याही पात्र’ (लोकसत्ता, २१ डिसेंबर) हे वृत्त वाचले. काळ्या यादीत टाकलेल्या त्या दोन कंपन्यांना शिक्षा म्हणून काही वर्षे तरी शासकीय परीक्षा प्रक्रियेसाठी अपात्र ठरवणे अत्यावश्यक आहे. तसेच त्यांच्याकडून घसघशीत दंडही घेतला पाहिजे. शासकीय परीक्षा म्हणजे खेळ वाटला का? परीक्षार्थी त्यासाठी प्रतीक्षा करत असतात. एका राज्याने काळ्या यादीत टाकले म्हणून दुसऱ्या राज्याच्या शासकीय परीक्षा प्रक्रियेसाठी सदर कंपनीकडून अर्ज केला जातो आणि त्या कंपनीला पात्रही ठरवले जाते. हे अत्यंत गंभीर आहे. काळी यादी केवळ नाममात्र नसावी; तिचे गांभीर्य का लक्षात घेतले जात नाही? सदर कंपन्या काळ्या यादीत आहेत, म्हणजे त्या स्वत:च स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरल्या आहेत. असे असतानाही त्या परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी पात्र ठरतात, हे परीक्षार्थीचे नुकसान करणारे नाही का? परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी अर्ज दाखल करणाऱ्या कंपन्या काळ्या यादीत आहेत का, हे बारकाईने पडताळले होते का, यावरच आता संशय व्यक्त होणे साहजिकच आहे. योग्य परीक्षार्थीची निवड होण्यासाठी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक असते, तसेच परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या परीक्षार्थीनाही हेच अभिप्रेत असते आणि तेच न्याय्य आहे. त्यामुळेच होतकरू परीक्षार्थीची निवड झाल्यावर शासकीय कारभार त्याच्याकडून योग्य प्रकारे हाताळला जाईल, अशी आशा तरी करता येते.

काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीवर कोणतेच निर्बंध नाहीत, तसेच त्यांना कोणत्याही शासकीय कारवाईला तोंड द्यावे लागण्याची चिंताही नाही. यास्तव त्यांनी शासकीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी अर्ज करण्याचे धाडस केले असावे. ‘गिरे तो भी टांग उपर’ या पठडीतील हा प्रकार आहे. अशा कंपन्यांवर कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे का?

शासकीय परीक्षा देणाऱ्यांची संख्या मोठी असते. काही जागांसाठी ती काही लाखांच्या घरातही जाते. परीक्षार्थीची संख्या काही हजार असो अथवा लाख, परीक्षा घेणाऱ्या कंपनीने गलथानपणा केल्यास त्याचा मनस्ताप परीक्षार्थीना सोसावाच लागतो. तसेच परीक्षा प्रक्रियेला विलंब झाल्यावर पुढील नियोजनही कोलमडते. परिणामी भरती प्रक्रियेवरच त्याचा परिणाम होतो. परीक्षार्थी परीक्षा देण्यास सिद्ध असतात; त्यांना जसे सांगितले जाते त्याप्रमाणे सूचनांचेही ते काटेकोरपणे पालन करतात. मात्र परीक्षार्थीना परीक्षा प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीमुळे मनस्ताप होणार नाही याचे दायित्व त्या कंपन्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी भरती जाहीर केली जाते. आयोगाचा विस्तारही मोठा आहे, तरीही ‘महाआयटी’ विभागाने स्वत:स सक्षम का केले नाही? एमपीएससी आणि महाआयटी विभागांत व्यवस्थित ताळमेळ तरी आहे का? की रिक्त जागा भरायच्या म्हणून एकदाची भरती प्रक्रिया ‘उरकून’ घ्यायची आहे?

– जयेश राणे, भांडुप (मुंबई)

हा तर बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळ!

‘सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी काळ्या यादीतील कंपन्याही पात्र’ हे वृत्त (२१ डिसेंबर) वाचले. राज्य शासनातील गट ब आणि गट क या सरळसेवेच्या सुमारे हजारो पदांच्या भरतीसाठी राज्यातील लाखो तरुणांनी अर्ज केले आहेत. यापूर्वी महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेल्या भरतीत भ्रष्टाचार झाल्याने महाविकास आघाडी सरकारने यंदा मार्चमध्ये या पोर्टलला स्थगिती दिली. या भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकारने महाआयटी विभागाच्या यादीतील १८ कंपन्यांपैकी दोन कंपन्यांना पात्र ठरवले आहे, मात्र या कंपन्या यापूर्वीच काळ्या यादीत समाविष्ट आहेत.

यापूर्वीच्या राज्य सरकारच्या काळातील सरळसेवा भरतीत झालेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी नवीन पदभरती पारदर्शक करू, महापोर्टल बंद करून आम्ही तरुणांबरोबर आहोत अशा घोषणांतून सध्याच्या राज्य सरकारने परीक्षार्थीना आश्वासन दिले होते. आता पदभरतीसाठी पुन्हा काळ्या यादीतील खासगी कंपन्यांना पात्र ठरवून राज्य सरकार एक प्रकारे राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे. यापूर्वी एमपीएससीने ‘सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही तयार आहोत,’ असे म्हटले होते. तरीदेखील ही भरती खासगी कंपन्यांकडून का केली जात आहे? त्यातही अशा काळ्या यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांची निवड झाल्याने राज्य सरकार भ्रष्टाचाराला वाव देत आहे का, असा प्रश्न का उपस्थित होऊ नये? तरीही अशा खासगी कंपन्या परीक्षा घेऊन तरुणांचे भवितव्य ठरवणार असतील, तर यात तरुणांचे नुकसानच आहे, हे नक्की!

– अतुल बाळासाहेब अत्रे, नाशिक

त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी

‘पराभव छत्तिशी!’ हे वृत्त (लोकसत्ता, २० डिसेंबर) वाचले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारताचा ३६ धावांत धुव्वा उडवला. भारतीय फलंदाजांची जलदगती गोलंदाजांसमोर नेहमीच दाणादाण उडते ही वस्तुस्थिती आहे. पहिले दोन-तीन फलंदाज लवकर माघारी परतल्यावर, पाठी येणाऱ्या फलंदाजांवर कसले दडपण येते तेच समजत नाही. एखाद् दुसरा फलंदाज वगळता इतर कोणीही फलंदाज खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहू शकत नाही, हे दुर्दैव. गोलंदाजीबाबतसुद्धा जसप्रीत बुमराह परिणामकारक ठरतो असे नाही. त्यामुळे त्याच्या जोडीला आश्वासक असा जलदगती गोलंदाज हवा; उदा. इशांत शर्मा किंवा मोहम्मद शम्मी. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची अवस्था सात बाद १११ अशी असताना, त्यांना भारतीय संघाने ८० धावा वरून बहाल का केल्या? यावर चिंतन होणे गरजेचे आहे. उर्वरित दोन कसोटींत भारतीय संघाला आपल्या पराभवाचे उट्टे काढायचे असेल, तर भारतीय संघाने त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी.

– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)