ऋषिकेश खिलारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरकू ज्ञानकोश निर्मितीनंतर पत्नी हर्षदामुळे पश्चिम मेळघाटमधील निहाल व पावरा या बोलीभाषा व अपरिचित संस्कृतीची ओळख झाली. विविध सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, स्थानिक महत्त्वपूर्ण व अभ्यासू व्यक्ती, आदिवासी समाजाचे मुखिया यांच्याशी सातपुड्याच्या पर्यावरणाबद्दल व आदिवासी संस्कृतीबद्दल चर्चा करताना त्यांनी पश्चिम मेळघाटमधील निहाल व पावरा या स्थानिक बोलीभाषा व अपरिचित संस्कृतीवरतीही संशोधन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. खरे तर या भाषा आमच्या नियोजित संशोधन यादीत होत्या, पण निधीअभावी त्यावर तत्काळ संशोधन करण्याचा विचार नक्कीच नव्हता.

हातात एकही पैसा नसताना अतिदुर्गम भागात एखादे मूलभूत संशोधन सुरू करणे किती दिव्य असते याची कल्पना होती; परंतु एखादी भाषा काळाच्या पडद्याआड जाते तेव्हा ती भाषा बोलणाऱ्यांचा शेकडो वर्षांचा इतिहास, त्यांची संस्कृतीही लोप पावते. असे होऊ नये या जिद्दीने निहाली बोलीभाषेचे सर्वेक्षण करण्याचा विडा आम्ही उचलला. परिसरात बोलली जाणारी पावरी ही बोलीही काही दिवसांनी आमच्या संशोधनाचा एक भाग झाली. अशा संशोधनांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही निकष ठरलेले आहेत. त्यांचा आधार घेत आम्ही संशोधनासाठी काही टप्पे निश्चित केले.

पूर्व मेळघाटवरून येऊन गावांमध्ये राहायचे अन् आदिवासी बांधवाच्या घरी असेल ते जेवण जेवायचे, असे नियोजन करत कार्यारंभ झाला. सुरुवातीला सर्वेक्षण झाले. अभ्यास गटाच्या निवड प्रक्रिया पूर्ण होत असताना करोनाने जोर धरल्याने काही काळासाठी विराम द्यावा लागला. करोनाच्या पहिल्या लाटेत आदिवासी बांधवांसह फ्रंटलाइनवर समर्थपणे उभे राहणारे आम्ही सर्व दुसऱ्या लाटेत त्यांना वाचवताना मात्र हतबल झालो. प्रचंड वेगात पसरणाऱ्या अफवा, औषधांचा अभाव, अतिदुर्गम भागातील सुविधांचा अभाव, मोजकी व अनियमित संपर्क माध्यमे, शिक्षण व योग्य माहितीचा अभाव, भाषेचा अडसर यांमुळे हा काळ अनेक दृष्टीने आव्हानात्मक व क्लेशदायकच होता. दुसऱ्या लाटेने तर आमचे चांगलेच कंबरडे मोडले. करोनाकाळात विलगीकरणात राहणे, सरकारी अटी व नियमांचे काटेकोर पालन करून आमच्याकडे असलेल्या पाठकोऱ्या कागदांचा उपयोग करत एक एक टप्पा पूर्ण केला. खर्च वाचवण्यासाठी अनेक संकटांवर मात करत शेकडो किलोमीटरची पायपीट आम्हा उभयतांबरोबर सर्वांनीच केली. निवास व भोजन सोडले तर बाकी कशाचीच व्यवस्था आमच्याकडे नव्हती. पण या विरोधाभासी स्थितीतही आम्ही संशोधन थांबवले नाही. नागपूरचे डॉ. किशोरजी नरड सर, मुंबईतून डॉ. अलकाताई मांडके तसेच ‘जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट’चे विश्वस्त आदरणीय श्रीपाद हळबे सर यांनी भरीव आर्थिक सहयोग दिला. आमचे पहिले कार्यालय, लॅब, ग्रंथालय सर्व काही बंजारी माता मंदिर हरिसाल येथेच होते. पावरी भाषाकोश निर्मितीच्या खडतर संशोधनाचा श्रीगणेशा तिथेच केला.

आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात यांच्या सीमाभागात पसरलेल्या सातपुड्याच्या कुशीत दुर्गम भागात वनांमध्ये वास्तव्य करणारा समाज आहे. या समाजाला बारेला असेही म्हणतात. हा समाज महाराष्ट्रातील बुलढाणा, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आढळतो. तर मध्य प्रदेशात मुख्यत: बड़वानी, खरगोन, धार व झाबुआ जिल्ह्यांमध्ये पावरा (बारेला) समाज मोठ्या प्रमाणात आढळतो. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांत पावरा समाज विखुरलेला आहे. क्षेत्रानुसार या समाजामध्ये अनेक रीतिरिवाजांत बऱ्याच प्रमाणात विविधता आढळते. तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार या समाजाची ओळखही वेगळी पाहावयास मिळते.

नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेकडील नर्मदेच्या काठावर डोंगराळ भागात वसलेल्या अक्राणी (धडगांव) तालुक्यांत निवास करणाऱ्या पावरांना भारवट्या असे संबोधले जाते. तसेच नंदुरबारमधील शहादा (धडगांव) तळोदा तालुक्यांबरोबर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पठारी (धडगांव) सपाट पट्ट्यात राहणाऱ्या पावरांना देहवाल्या या नावाने संबोधले जाते. तर मध्य प्रदेश (धडगांव) महाराष्ट्र सीमेवर हाच समाज निंबाळ्या, राठवा, बारेला या नावानेही ओळखला जातो. याव्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) (धडगांव) संग्रामपूर तालुक्यात या समाजातील पुरुषांच्या गुढघ्यापर्यंत विशिष्ट पद्धतीने धोतर नेसण्याच्या पद्धतीमुळे त्यांना लंगोट्या म्हणून संबोधतात. खरे तर ही ओळख पावरा समाजाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारी संशोधक म्हणून माझ्यासाठी अत्यंत वेदानादायी तर आहेच, पण या समाजाची नकारात्मक स्वरूपाची ही ओळख आहे. एक आदर्श कृषक संस्कृती असलेला हा समाज ज्याने पाणी नसलेल्या भागातही शेती फुलवली. पडिक माळरान, दगडाळ (धडगांव), मुरुमाड अशा मिळेल त्या जमिनीवर नंदनवन फुलवणारा हा समाज. जिथे आधुनिक तंत्रज्ञान (धडगांव) शेतीपद्धती फोल ठरली अशा क्षेत्रालाही या समाजाने हिरवेगार केले ही या समाजाची सकारात्मक ओळख जगासमोर आजपर्यंत आली नाही हे विशेष. अशा या भौगोलिक विस्तृत क्षेत्रात वसलेल्या समाजाच्या बोलीभाषांत क्षेत्रानुसार स्थानिक ठिकाणी काही प्रमाणात विविधता दिसून येते.

भील या मुख्य समाजापासून पावरा (बारेला) व भिलाला समाजाची निर्मिती झाली असावी असे समजले जाते. बारेला, भिलाला व भील समाजाची भाषा, महिला व पुरुषांची वेशभूषा बऱ्यापैकी सारखीच आहे. यांच्या भाषेत मोठ्या प्रमाणात साम्य असल्याने हे समाज आपसात आपापल्या तसेच एकमेकांच्या भाषेतून अस्खलित संवाद साधतात.

प्रत्येक भाषेचे एक वैशिष्ट्य असते. तसेच पावरीचेही एक खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे पावरीत शिव्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. हे पावरा समाजाच्या नैतिकतेचेही एक प्रमाण म्हणता येईल. पावरी बोली भाषिकदृष्ट्या वैभवशाली असून शब्दसाठाही प्रचंड आहे. संशोधनादरम्यान सुमारे १८ हजारां पेक्षा अधिक शब्द आम्ही संकलित केले. पावरांची शब्दसंपत्ती यापेक्षा किती तरी अधिक असून संशोधनाच्या पुढील टप्प्यात लोकगीत, लोककथा आपण संकलित करत आहोत. पावरीवर मारवाडीचा प्रभाव आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, पावरा समाजात चार प्रकारच्या बोली बोलल्या जातात. काही राठवी तर काही पाल्या (पालवी) बोलतात. काही भागात नायरी तर कुठे बारी म्हणजेच पावरी बोलली जाते. हा समाज मध्य प्रदेशात बारेला म्हणून ओळखला जातो. त्यांची संस्कृती, भाषा, राहणीमान, रीतिरिवाज तंतोतंत पावरांप्रमाणेच आहेत. पावरांची बोली निसर्गाशीही साधर्म्य सांगणारी असून त्यांचे सणवार, उत्सवही निसर्गाची जपणूक करणारे आहेत.

पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे असतात. पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.

पावरा आदिवासी जमातीत विविध सण, उत्सव साजरे केले जातात. होळी हा त्यांचा मुख्य सण. होळी सणाला जे बावा बुद्या बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरू किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळीआधी बोंगऱ्या, मेलादा इ. उत्सव साजरे केले जातात. होळीशिवाय नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ.सणही साजरे केले जातात.

या समाजातील बालकांना किमान प्राथमिक शिक्षण तरी त्यांच्या मातृभाषेतून उपलब्ध व्हावे, सोबतच राज्यभाषा, राष्ट्रभाषा आणि ज्ञानभाषा इंग्रजीचेही बाळकडू त्यांना मिळावे, हा या धडपडीचा मुख्य उद्देश आहे. भाषेचा अडसर हेच आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होण्याचे मुख्य कारण आहे. अभ्यासाची गोडी लागत नसल्याने ही मुलं शिक्षणापासून दूर जात असली तरी वेगळी वाट चोखाळत शेती किंवा पूरक व्यवसायांत ती यशस्वी होतात. कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. अशा विद्यार्थ्यांना भाषाकोशसारखे साधन मिळाले तर ‘लोकल’ बोलीचा ‘ग्लोबल’ संवादसेतूच निर्माण करण्यास ते सज्ज होतील. भाषाकोशच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांतील भाषिक दरी सांधली जाऊन आगामी पिढी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास आहे.

पावरी बोलीभाषा संशोधनकार्य आज आपल्या हाती सुपूर्द करताना दृश्य-अदृश्य अशा हजारो हातांनी तीन वर्षे अहोरात्र घेतलेल्या कष्टांची आम्हाला जाणीव आहे. गुणवत्तापूर्ण हे पुस्तक आज आदिवासी बांधवांच्या हाती पोहोचत आहे. आमचे लोकप्रतिनिधी मा. आमदार डॉ. संजयजी कुटे सर, मा. जिल्हा अधिकारी रामामूर्ती सर, प्रकल्प अधिकारी हिवाळे सर, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूकर यांनीही हे संशोधन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय जबाबदारी घेतली हा या संशोधनाचा एक मैलाचा दगड ठरला. आजही हा प्रवास निरंतर सुरू आहे. कोरकू, पावरा, भिलाला, निहाल व पारधी बोलीभाषेच्या ७५,००० शब्दांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.

लेखक पश्चिम मेळघाटातील ‘राइज फाउंडेशन’चे संचालक आहेत.

risemelghat@gmail.co

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pavri is the word book of traditional tribal language pkd
First published on: 14-08-2022 at 14:17 IST