संत साहित्याचे अभ्यासक आणि मार्गदर्शक डॉ. मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. मूळचे अकोल्याचे असलेल्या डॉ. जोशी यांनी तिथेच महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर चिखली येथे अध्यापन केले. पुढे मराठी आणि संस्कृत या दोन भाषांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि नाथसंप्रदायातील आचार्य पदवी प्राप्त केल्यानंतर जोशींनी अकोल्याच्या सीताबाई कला महाविद्यालय येथून प्राध्यापकीय प्रवासाला प्रारंभ केला.

नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात तब्बल २२ वर्षे अध्यापन करणाऱ्या डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ३६ विद्यार्थी एम.फिल. झाले, तर २५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. या मार्गदर्शनाचा पैस मराठी साहित्याचे आद्यप्रवर्तक ज्ञानदेवांपासून गुलाबराव महाराज यांच्यापर्यंत आणि नाथ-महानुभाव संप्रदायांपासून सुफी पंथापर्यंत असा व्यापक आहे. सुफी पंथावर संशोधनात्मक ग्रंथही त्यांनी लिहिला. त्यात भारतीय संतमंडळ व संप्रदायाशी सुफी पंथाचा असलेला संबंध त्यांनी दाखवून दिला. आणि हे केवळ सुफी पंथापुरतेच न राहता, नाथ, गाणपत्य, वीरशैव, महानुभाव, वारकरी, रामदासी, दत्त, चैतन्य, आनंद आदी संतपरंपरेतील सर्व शाखोपशाखांतील परस्परसंबंध दाखविणारे लेखनही त्यांनी केले आहे. त्याचबरोबर मराठी साहित्यातील ३०५ वाङ्मयप्रकार त्यांनी प्रथमत: दाखवून प्राचीन मराठी वाङ्मयसमीक्षेला एक नवीन दिशा दिली. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या ज्ञानकोशाच्या संपादनाची जबाबदारी पार पाडलेल्या डॉ. जोशी यांनी तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचेही संपादन केले आहे.

डॉ. जोशी यांचे २०० हून अधिक लेख ‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम’कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘नाथ सांप्रदाय’, ‘ज्ञानेश्वरी संशोधन’, ‘गुलाबराव महाराज समकालीन साहित्य’, ‘दत्त गुरूचे दोन अवतार’, ‘मनोहर आम्बानगरी’, ‘श्री विठ्ठल आणि पंढरपूर’, ‘समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांकांचे १९७२ ते ७७ या काळात त्यांनी संपादन केले. राज्य शासनाच्या हस्तलिखित समितीचे ते सल्लागार होते. संशोधन कार्याने नव्या पिढीसमोर संस्कृतिरक्षणाचा व संवर्धनाचा आदर्श घालून देणाऱ्या डॉ. जोशी यांना मुंबई विद्यापीठाचा प्रियोळकर संशोधन पुरस्कारसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सध्या ते तंजावर येथील साडेतीन हजार मराठी हस्तलिखितांवर संशोधन करत आहेत.