MWC 2023: नुकतीच बार्सिलोनामध्ये मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला (MWC) सुरुवात झाली. हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. GSMA (Groupe Speciale Mobile Association) यांच्यामार्फत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये सुरु होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये मोबाइल आणि त्यासंबंधित उपकरणे तयार करणाऱ्या जगभरातल्या कंपन्या उपस्थित असतात. MWC च्या पूर्वसंध्येला नोकिया कंपनीने एक मोठी घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोकिया ही मोबाइलफोन्स तयार करणारी मोठी कंपनी आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीच्या उत्पादनांना ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळते. दूरसंचार क्षेत्रामध्ये नोकियाने सुरुवातीला खूप लोकप्रियता मिळाली. पण स्वत:ला योग्यप्रकारे अपडेट न केल्याने त्यांची जागतिक स्पर्धेमध्ये पिछेहाट झाली. बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी कंपनीने काही नवे बदल स्वीकारले आहेत. MWC च्या कार्यक्रमामध्ये नोकिया कंपनीने त्यांच्या लोगो आणि ब्रॅंड इमेज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या लोगोमध्ये ‘NOKIA’ या शब्दामधील प्रत्येक अक्षराचा रचना एका नव्या शैलीमध्ये केल्याचे पाहायला मिळते. जुन्या लोगोमधील निळ्या रंगासह अन्य काही रंगांचा वापर करुन तयार केलेली नव्या रंगसंगती या लोगोमध्ये पाहायला मिळते. तब्बल ६० वर्षांनंतर नोकिया कंपनीने लोगो आणि त्यांच्या बॅंड इमेजमध्ये बदल केलेला आहे.

नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेक्का लुंडमार्क यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “आम्ही स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी नव्या योजनांचा अवलंब करायचे ठरवले आहे. नोकिया नेहमीच सर्व्हिस प्रोव्हाइडर व्यवसायामध्ये प्रगतीशीर राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. आता आम्ही स्मार्टफोन्सची निर्मिती करण्याबरोबर इतर व्यवसायिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार आहोत. मोठमोठ्या टेक कंपन्या खासगी 5G नेटवर्क आणि ऑटोमेटेड कारखाने यांसाठी नोकियाशी भागीदारी करण्यास इच्छुक आहेत.”

आणखी वाचा – MWC 2023: Xiaomi ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सल कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत…

ते पुढे म्हणाले, “ज्या क्षेत्रामध्ये आम्ही जागतिक नेतृत्त्व करु शकू अशा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. फॅक्टरी ऑटोमेशन आणि डेटासेंटर्स या विभागांमध्ये प्रगती करत असल्याने भविष्यामध्ये अ‍ॅमेझॉन-मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्याना आम्ही टक्कर देऊ हा विश्वास आम्हाला आहे.आमच्यासाठी भारत ही सर्वात वेगवान बाजारपेठ आहे.”

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia changes its logo for the first time in 60 years in mwc 2023 yps