कल्याण – मागील आठवड्यात मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दहा प्रभाग हद्दीत १८ मालमत्ता कर आणि पाणी देयक विशेष भरणा केंद्रे सुरू केली आहेत. आपल्या घर परिसरात सुरू झालेल्या या केंद्रांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने दहा प्रभाग हद्दीत वाढीव विविध भागात एकूण ३० नवीन विशेष कर भरणा केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे भरणा केंद्रांची एकूण संख्या ४८ झाली आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर आणि पाणी देयक शुल्क लवकरात लवकर भरणा करावे आणि मार्च अखेरपूर्वीच पालिकेचा मालमत्ता कर आणि पाणी देयक वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण व्हावा या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी मालमत्ता विभागात अतिशय संथगतीने आणि नकारात्मक पध्दतीने काम सुरू होते. नागरिक, कर विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये याविषयी नाराजी होती.

मालमत्ता विभागाचा पदभार कांचन गायकवाड यांनी स्वीकारल्यापासून या विभागातील बहुतांशी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाणे, नव्याने सुरू झालेल्या विशेष भरणा केंद्रांना भेटी देऊन नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून त्याप्रमाणे निर्णय घेणे. त्यामुळे कर विभागासह प्रभाग स्तरावरील कर विभागातील कर्मचारी आता कामाला लागले आहेत.

गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या विशेष भरणा केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून उपायुक्त गायकवाड यांनी दहा प्रभाग हद्दीत अधिक वस्तीची गृहसंकुले, नागरिकांच्या सोयीचा विचार करून त्या भागात ३० विशेष भरणा केंद्रे सुरू केली आहेत. व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक यांची सर्वाधिक सोय झाली आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वेळेत ही केंद्रे सुरू राहणार आहेत.

नव्याने सुरू झालेली कर भरणा केंद्रे अ प्रभाग – नेपच्युन स्वराज सेक्टर १, आंबिवली पश्चिम, थारवाणी इमारत वेदांत मिलेनया , टिटवाळा पूर्व, शंकेश्वर क्रिस्टर रस्ता, म्हस्कळ रस्ता, टिटवाळा पूर्व. ब प्रभाग – रोझाली संकुल, झुलेलाल चौक, बारावे, कल्याण, मिलिंदनगर, गौरीपाडा, चिकणघर, गुरू आत्मन सोसायटी, गौरीपाडा, क प्रभाग- व्हर्टेक्स सोसायटी, खडकपाडा, जे प्रभाग – कशीश गॅलेक्सी, ९० फुटी रस्ता, कचोरे, मोहन सृष्टी, नेतिवली, ड प्रभाग – कृष्णा पॅरेडाईज, तिसगाव, जरीमरी मंदिर रस्ता, तिसगाव, बिपिन मिश्रा, सह्याद्री पार्कजवळ, काटेमानिवली, फ प्रभाग – शितला मंदिर गोग्रासवाडी, सर्वोदय लिला, खंबाळपाडा, शेलार ऑफिस, शेलार नाका, ह प्रभाग – सुकऱ्या शिवा चौक, कोपरगाव, निता वैती ऑफिस, गणेशनगर, शिवसेना पदाधिकारी संदेश पाटील यांच्या कार्यालयाच्या जवळ, सत्यवान चौक, देवीचापाडा, अग्निशमन केंद्र, चिंचोड्याचा पाडा, ग प्रभाग – युगंधर सुदामा सोसायटी, मानपाडा रस्ता, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, बालाजी गार्डन, आयरे, कोपर पूर्व, धोत्रे मैदान, दत्तनगर, आय प्रभाग- गिता भवन सोसायटी, आडिवली, द्वारका हास्कूल, नमस्कार ढाब्याजवळ, मधुकर गॅलेक्सी, दावडी, ई प्रभाग – कासाबेला गोल्ड क्लब हाऊस, मानपाडा जुनी ग्रामपंचायत, नांदिवली जुनी ग्रामपंचायत.