लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महापालिकेतील विविध विभागात कार्यरत असलेले ३९ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यात पालिका उपायुक्त, कार्यकारी अभियंता, शिक्षकांसह सफाई कामगारांचा समावेश आहे. हे सर्वजण येत्या ३० एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. परंतु २९ एप्रिलला शनिवार तर ३० एप्रिलला रविवार येत आल्यामुळे या सर्वांचा शुक्रवार म्हणजेच २८ एप्रिलला हाच कामाचा अखेरचा दिवस असणार आहे.

राज्य शासनाने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेनुसार दरवर्षी ठाणे महापालिकेतून अधिकारी-कर्मचारी सेवा निवृत्त होतात. यापुर्वी सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी होती. परंतु गेल्या चार ते पाच वर्षांत या संख्येत मोठी वाढ झाली आहे. येत्या एप्रिल महिनाअखेर पालिकेतील ३९ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यात पालिकेच्या आस्थापनेवरील ३८ जण आहेत तर, एक जण शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले ठाणे महापालिका मुख्यालयाचे उपायुक्त मारुती खोडके हे शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्याचबरोबर ठाणे महापालिकेत कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता चेतन पटेल हे सुद्धा सेवा निवृत्त होत आहेत.

आणखी वाचा- ठाण्यात नवाकोरा रस्ता खोदला, पालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे ठाणेकरांना दर्शन

याशिवाय, कार्यालयीन उपअधिक्षक, लिपीक, मराठी लघुलेखक, कनिष्ठ लेखा परिक्षक, मुख्याध्यापिका, वरिष्ठ शिक्षिका, उपशिक्षिका, सफाई कामगार, वाहनचालक, परिचारिका आणि शिपाई हे सुद्धा निवृत्त होत आहेत. हे सर्वजण येत्या ३० एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. परंतु २९ एप्रिलला शनिवार तर ३० एप्रिलला रविवार येत आल्यामुळे या सर्वांचा शुक्रवार म्हणजेच २८ एप्रिलला हाच कामाचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभाचे कार्यक्रम गुरुवारपासूनच सुरु असल्याचे दिसून आले. पालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवा निवृत्त होत असताना दुसरीकडे मात्र त्या तुलनेत भरती होताना दिसत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडण्याची चिन्हे आहेत.