ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून या कारवाईत मंगळवारी दिवसभरात १० अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. तर, या मोहिमेत गेल्या पाच दिवसांत ७३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यापुढेही प्रभाग समिती निहाय ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले असून यामुळे भुमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियतेवरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

या पथकाने तळ अधिक चार मजले, सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडावून, व्याप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम, प्लिंथ, दुकानातील वाढीव बांधकाम अशा वेगवेगळ्या तक्रारींनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात १९ आणि २० जून रोजी केलेल्या कारवाईत एकूण ३३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. तर, २१ ते २३ जून या कालावधीत ३० बांधकामांवर आणि २४ जून रोजी १० बांधकामांवर कारवाई केली आहे. दिवा येथील सर्व्हे क्रमांक १७८, १७९, १८० या ठिकाणच्या दोन इमारती पूर्णपणे निष्कसित करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

ही कारवाई परिमंडळ उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले.

पाच दिवसातील कारवाईची आकडेवारी

नौपाडा- कोपरी – ६

वागळे – ४

लोकमान्य सावरकरनगर – ६

वर्तकनगर – ५

माजिवडा मानपाडा – १३

उथळसर – ३

कळवा – ६

मुंब्रा – ७

दिवा – २३

एकूण – ७३