अंबरनाथ: एक १६ वर्षांचा तरुण पावसात लघुशंकेसाठी जातो आणि त्याचवेळी काळ त्याला गाठतो. ही धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात समोर आली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विघ्नेश कचरे हा सोळा वर्षांचा तरुण या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडला आहे. अंबरनाथ पश्चिम येथील भेंडी पाडा परिसरात ही घटना घडली.

यंदाचा मे महिना गेल्या १३ वर्षातील सर्वाधिक पावसाचा महिना ठरला आहे. एरवी घामाच्या धारांमध्ये मे महिना जात असतो. मात्र यंदा मोसमी पावसाचे आगमन लवकर होत असल्याने अवकाळी पावसानेही दोन आठवडे आधीच हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात आणि ठाणे जिल्ह्यात पाऊस कोसळतो आहे. अंबरनाथ शहरात मंगळवारीही जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात पश्चिम येथील नवीन भेंडी पाडा परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.

अंबरनाथच्या पश्चिमेत असलेल्या नवीन भेंडी पाडा परिसरात एक सोळा वर्षांचा तरुण विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडला. विघ्नेश कचरे असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विघ्नेश लघुशंकेसाठी नाल्याजवळ गेला. लघुशंका करत असतानाच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विघ्नेश ज्या ठिकाणी लघुशंकेसाठी गेला त्या ठिकाणी विजेचा प्रवाह खुला असण्याची शक्यता व्यक्त होते आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. पुढे उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शहविच्छेदनासाठी तरुणाचा मृतदेह पाठवण्यात आला. अवकाळी पाऊस आणि त्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ शहरात हळहळ व्यक्त होते आहे.

अवकाळी पावसामुळे स्थानिक नगरपालिका, महावितरण या शासकीय संस्थांचे वेळापत्रक बिघडले आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्याने पालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. मेच्या शेवटच्या टप्प्यात पालिका प्रशासनाकडून नालेसफाई केली जाते. मात्र यंदा पहिला जोरदार पाऊस झाल्यानंतर नालेसफाई सुरू आहे. महावितरणाच्या बाबतीतही पावसामुळे वेळापत्रक बिघडल्याचे बाब समोर आली आहे. सध्या भर पावसात महावितरणाला देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असून अशा दुर्घटना घडण्याच्या शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन केले जाते आहे.गेल्या आठवड्यात अशीच घटना

गेल्या आठवड्यात अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या जांभूळ गावात विजेची तार तुटून पडल्याने लागलेल्या धक्क्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आपल्या म्हशी चारण्यासाठी हा व्यक्ती गेला होता. म्हशीला विजेचा धक्का लागला त्या म्हशीला वाचवण्यासाठी ही व्यक्ती गेली होती. त्यावेळी त्यांनाही विजेचा धक्का लागला या घटनेत तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला.