कल्याण – ‘मी स्वत:च माझा खून करून घेईन. तुम्हाला महेश गायकवाड, महेश पाटील यांचे समर्थन आहे का,’ अशी बेताल वक्तव्य करत उल्हासनगर मधील एका मद्यधुंद ४० वर्षाच्या टेम्पो चालकाने गुरूवारी रात्री कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील कोळसेवाडी वाहतूक पोलिसांच्या चौकीत धिंगाणा घालून वाहतूक पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी, अरेरावी आणि धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला.
या मद्यपी चालकाच्या विरूध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मल्हारी साळुंखे (४०) असे मद्यधुंद टेम्पो चालकाचे नाव आहे. तो उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक मधील भीमनगरमध्ये शंकर किराणा स्टोअर्स भागात राहतो. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव हनुमंतराव थोरात (४९) यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तक्रारीत वाहतूक अधिकारी आनंदराव थोरात यांनी म्हटले आहे, की कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतूक नियोजन आणि नाकाबंदीचे काम आपण सहकाऱ्यांसह गुरुवारी रात्री करत होतो. त्यावेळी दूरवरून एक टेम्पो चालक निष्काळजीपणे, दुसऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पध्दतीने टेम्पो चालवित असल्याचे निदर्शनास आले. तो टेम्पो जवळ येताच आम्ही टेम्पोला रोखले.
टेम्पो चालक महेश साळुंखे याने वाहतूक पोलिसांना तुम्ही मला का अडविले, अशी विचारणा करून वाहतूक पोलिसांबरोबर हुज्जत घातली. वाहतूक पोलिसांनी त्याची श्वास विश्लेषक चाचणी करण्यासाठी त्याला टेम्पोतून खाली उतरविले. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो टेम्पोतून उतरण्यास तयार नव्हता. मोठ्या मुश्किलीने वाहतूक पोलीस, सेवकांनी चालक महेशला टेम्पोतून खाली उतरविले. त्याला चक्कीनाका येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणले.
तेथे वाहतूक पोलिसांनी त्याची श्वास विश्लेषक चाचणी करण्यास सुरूवात करताच, त्याने ती चाचणी करून देण्यास नकार दिला. तु्म्ही कोणत्या अधिकाराने माझी श्वास विश्लेषक चाचणी (ब्रेथ ॲनालायझर) करता असे प्रश्न करून महेश साळुंखे याने एका पोलिसाच्या सदऱ्याची गळपट्टी पकडली. त्यांना धक्काबुक्क केली.
महेश मद्याने बेभान झाल्याने तो वाहतूक चौकीतील तीन ते चार वाहतूक पोलिसांच्या अंगावर मारण्यासाठी धाऊन जात होता. वाहतूक पोलीस त्याला रोखून धरत होते. या झटपटीत त्याने कार्यालयातील संगणकाची तार तोडली. पोलिसांच्या भोजनाच्या पिशव्या मंचावरून ढकलून दिल्या. तुम्ही माझ्या बरोबर एवढी झटापट करता म्हणजे तुम्हाला महेश गायकवाड, महेश पाटील यांचे समर्थन आहे का, अशी बेताल वक्तव्ये महेश करत होता. बेभान झाल्याने पोलिसांनी पकडूनही त्यांना दाद न देता महेशने स्वताचे डोके चौकीतील खिडकीवर आपटून स्वताला जखम करून घेतली.
चार ते पाच वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक बेभान महेश साळुंखेला अटकाव करत तरीही त्याने वाहतूक पोलीस ओमासे, वाहतूक सेवक अविनाश राठोड यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा. वरिष्ठ पोलस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. एम. धोंगडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
