कल्याण – कल्याण पूर्व चक्कीनाका भागात शिवसेना शिंदे गटातर्फे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांसोबत महिला, रिक्षा चालक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह विद्यार्थी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
शिंदे शिवसेना कल्याण पूर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिंदे शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख व माजी नगरसेवक नीलेश शिंदे या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. चक्कीनाका भागातून काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात पाकिस्तान निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. शिवसैनिक, महिला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्या या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. नागरिकही उत्स्फूर्तपणे या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
पहलगाम येथील पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचून काढण्याची मागणी संतप्त मोर्चेकरी करत होते. पाकिस्तान निषेधाच्या घोषणांनी मोर्चेकरांनी परिसर दणाणून सोडला होता. घोषणा देण्यात महिला शिवसेना कार्यकर्त्या आघाडीवर होत्या. चक्कीनाका, तिसगाव नाका परिसरातील रिक्षा चालक निषेध मोर्चात रिक्षा बंद करून सहभागी झाले होते. शाळांना सु्ट्टी लागल्याने आपल्या कुटुंबीयांसमवेत शाळकरी मुलेही मोर्चात सहभागी झाली होती. मुलेही मोठ्या आवाजात पाकिस्तान निषेधाच्या घोषणा देत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणुन कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी मोर्चाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले, दहशतवाद्यांनी देशातील निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन पर्यटकांचे जीव घेतलेच, पण त्यांनी भारत देशावर हल्ला केला आहे. लढवय्या, शूर माणुस समोरून लढतो. हे हल्ले लपुनछपुन भ्याडपणे केले जात आहेत. भारताची ताकद शत्रुला माहिती आहे. त्यामुळे असे क्रूर, भ्याड उद्योग काही विघातक शक्ती करत आहेत. भारताने वेळोवेळी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या हल्ल्याचा बदला भारताकडून नक्कीच घेतला जाईल, असा विश्वास आहे. ज्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारण्याचे क्रूर कृत्य केले आहे. त्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना जाहीरपणे कठोरातील कठोर शिक्षा होईल यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. पुन्हा दहशतवादी डोके वर काढणार नाहीत अशा पध्दतीने त्यांना ठेचुन काढण्याची मागणी मोर्चेकरांनी केली