कल्याण – कल्याण पूर्वेत नेतिवली येथे मेट्रो माॅलच्या बाजुला कार्यालय असलेल्या दीप भारती निधी लिमिटेड या पतपेढीत ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेली एक लाख २५ हजार रूपयांची रक्कम पतपेढीतील एका वसुली कर्मचाऱ्याने पळवून नेला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पतपेढी भागीदार संचालकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वशीम सलीम शेख असे रक्कम घेऊन पळून गेलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. वशीम शेख हा कल्याण भिवंडी रस्त्यावरील फालके काॅलनीतील तडीपार कोनगाव भागात राहतो. दीप भारत निधी लिमिटेडचे भागीदार संचालक रोहित चंदू राठोड यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राजन प्रदीपकुमार दुबे आणि रोहित राठोड हे भागीदारी पध्दतीने ही पतपेढी चालवितात.
तक्रारदार भागीदार संचालक रोहित राठोड यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की राजन दुबे आणि मी कल्याण पूर्वेतील नेतिवली भागात मेट्रो माॅलच्या बाजुला एका कार्यालयात दीप भारत निधी लिमिटेड नावाची पतपेढी चालवितो. या पतपेढीत सहा कर्मचारी ग्राहकांकडून रोखीने आणि ऑनलाईन माध्यमातून रक्कम जमा करतात. दिवसभरात वसुल झालेल्या रकमेचा अंतीम हिशेब पतपेढीत रात्रीच्या वेळेत आम्ही दोन्ही भागीदार करतो. रोखीची रक्कम पतपेढी कार्यालयातील मंचाच्या खणात ठेवली जाते. त्या खणाची चावी वसुली कर्मचारी वशीम शेख आणि प्रियांशु दुबे यांच्याकडे असते.
गेल्या रविवारी वसुली कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून जमा झालेली रोख रक्कम कार्यालयातील मंचाच्या खणात ठेवली होती. आपणास ही माहिती कर्मचाऱ्यांनी मोबाईलवरून दिली होती. आपण काही कामानिमित्त कल्याण पश्चिमेत गेल्या रविवारी गेलो होतो. पतपेढीत येण्यास आपणास रात्रीचे अकरा वाजले. पतपेढीत आल्यानंतर आपण दिवसभरात जमा झालेल्या रकमेचा हिशेब तपासून मंचाच्या खणात ठेवलेली एक लाख २५ हजार रूपयांची रक्कम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खणात रक्कम आढळून आली नाही. वसुली कर्मचारी प्रियांशु दुबे याला सव्वा लाखाची रक्कम कुठे आहे अशी विचारणा केली त्याने खणात ठेवली असल्याचे सांगितले.
रोहित राठोड आणि प्रियांशु यांनी खण सर्व बाजुने तपासुनही रक्कम आढळली नाही. ही रक्कम वसुली कर्मचारी वशीम शेख याने अन्य कोठे ठेवली का म्हणून रोहित राठोड यांनी वाशीम शेखला त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्यास सुरूवात केली. वशीम रोहित यांच्या संपर्काला प्रतिसाद देत नव्हता. पतपेढीतील हसन आणि समीर यांना रोहित राठोड यांनी वशीमच्या कोनगावातील घरी रात्रीच्या वेळेत पाठविले. त्याच्या पत्नीने ते घरी नसल्याचे सांगितले. वशीमचा विविध भागात शोध घेतला आणि त्याला सतत संपर्क केला पण तो संपर्काला प्रतिसाद देत नव्हता.आठवडाभर वाट पाहुनही वशीम शेख पतपेढीत वसुलीची रक्कम घेऊन आला नाही. त्यामुळे त्याने ती रक्कम चोरून नेला असल्याचा संशय व्यक्त करत पतपेढी भागीदार रोहित राठोड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.