Shashank Ketkar news Thane ठाणे : गणेशोत्सवाचे वेध लागले की संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाची लाट उसळते. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातही उत्सवाच्या तयारीने जोर धरला असून ठिकठिकाणी ढोल-ताशा पथकांचे सराव सुरु झाले आहेत. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील उड्डाणपुलाखालीही अशाच प्रकारे एक ढोल-ताशा पथक आपल्या तयारीत व्यग्र होते. या ढोल-ताशा पथकाच्या सरावावेळी प्रसंग आला जो सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर हे त्यांच्या गाडीने जात असताना वर्तकनगरमधील एका उड्डाणपुलाखाली जोरदार सराव सुरू असलेल्या पथकाकडे त्यांचे लक्ष गेले. त्या जल्लोषात त्यांनी स्वतःचा मोबाईल काढून सरावाचा व्हिडिओ शूट केला आणि तो त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओसोबत त्यांनी “वातावरण तापतंय..” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेला विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या छोट्याशा पोस्टने नेटकऱ्यांच्या भावना चांगल्याच भारावल्या असून अनेकांनी या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पथकाच्या सरावाचे कौतुक केले, तर काहींनी शशांक केतकर यांच्या उत्सवभावनेचे स्वागत केले.

शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत

शशांक केतकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सरावाचा आवाज, जल्लोष आणि परिसरातील जोश दाखवणारा व्हिडिओ शेअर करत “वातावरण तापतंय… असे म्हणत गणपती बाप्पा मोरया!” असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे .

ढोल-ताशा सराव

गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांना विशेष महत्त्व आहे.गणरायाचे आगमन आणि विसर्जन यावेळी हे पथक वातावरण अधिक भक्तिमय आणि जोशपूर्ण करतात. ठाण्यातील वर्तकनगर, कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी, माजिवडा, साकेत आणि इतर परिसरांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी अनेक युवक सराव करताना दिसत आहेत. तरुणाईचा उत्साह, तालाच्या गजरात नाचणारे पाय आणि आभाळ फाडणारा जल्लोष हे दृश्य पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकतात.

सांस्कृतिक उत्सव आणि नागरी अडचणी

दरवर्षी ढोल-ताशा सरावाच्या वेळा आणि ठिकाणी काही नागरिक आणि स्थानिक प्रशासनात तक्रारीही नोंदवल्या जातात. काही वेळा ट्रॅफिक जाम किंवा आवाजाचा त्रासही चर्चेचा विषय ठरतो. मात्र, सांस्कृतिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संयम आणि सहभाग महत्त्वाचा मानला जातो.

गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात यंदा २८ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून ठाण्यातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. बाप्पाच्या मूर्तींच्या सजावटीसह मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांची आखणी जोरात सुरू आहे. ढोल-ताशा पथकांव्यतिरिक्त बॅन्ड पथके, पारंपरिक वाद्यांचा समावेश करून नवनवीन प्रयोग होत आहेत.