अंबरनाथः अफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव अंबरनाथच्या उद्यानात आढळून आला असला तरी तीचा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये झाल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. कल्याण तालुका, मुरबाड, वसई अशा ठिकाणी या गोगलगायी आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर वेळीच नियंत्रणाची आवश्यकता आहे. शहरातील नर्सरी आणि उद्यानांमधला हा प्रादुर्भाव जंगलात पसरल्यास तो जंगलासाठी त्रासदायक ठरू शकतो, असे वन्यजीव संरक्षक सांगतात.

अफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव पाच ते सहा वर्षांपासून आमच्या शेतात झालेला आहे. पाच वर्षांपूर्वी कृषी विभागाकडे याची तक्रार केल्यानंतर कृषी विभागाने त्याचा पंचनामाही केला होता. मात्र त्यानंतर त्या गोगलगायीला कुणी गांभीर्याने घेतले नाही, अशी माहिती प्रयोगशील शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ राजेंद्र भट यांनी दिली आहे. या गोगलगायीला नैसर्गिक शत्रू नाही त्यामुळे तीचे फावते आहे. त्या एकाच वेळी ५० ते २०० पर्यंत अंडी घालतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढते आहे. त्या ३०० पेक्षा अधिक प्रकारची झाडे खाऊ शकतात. झेंडू, पपई, चवळी, टॉमेटोही त्या खातात. वेलवर्गीय भाज्यांवर त्या मुळावर प्रहार करतात. त्यामुळे पुढे वेल जळतो, असेही भट यांनी सांगितले.

सेंद्रीय शेती करत असल्याने या गोगलगायींचा अधिक त्रास होतो. त्यांना गोण्यात भरून ठेवतो, असेही भट यांनी सांगितले आहे. तर येत्या काळात या गोगलगायींमुळे जंगलांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. सध्या कल्याण, मुरबाड तालुक्यात, वसई परिसरात या गोगलगायी सापडल्याचे दिसून आले आहे. शहाडच्या बिर्ला मंदिर परिसरातही या गोगलगायींचा वावर आढळून आला आहे. त्यांची झपाट्याने वाढणारी संख्या चिंताजनक आहे, असेही हरड यांनी सांगितले आहे. सध्या जंगलतोड याला निसर्गाचा ऱ्हास म्हणतो. मात्र आता रानमोडीमुळेही जुन्या वृक्षांना धोका होता. त्याचे निर्मूलन सुरू आहे. या गोगलगायींचा प्रादुर्भावही वेळीच रोखण्याची आवश्यकता आहे. हे जैविक अतिक्रमण ठरू शकते, अशी माहिती हरड यांनी दिली आहे.

नियंत्रणाची व्यवस्था नाही

सध्या तरी या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी ठोस व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक जण प्रचलित आणि ऐकीव माहितीवरून या गोगलगायींचे व्यवस्थापन करत आहेत. उघड्या हातांनी याला हात न लावता हातपंजे वापरून त्यांना बाजूला सारणे आवश्यक आहे. उकळून थंड केलेल्या पाण्यात त्यांना बंद केल्यास त्या मरतात , अशी माहिती अभ्यासक अनिकेत मराठे यांनी दिली आहे. जंतुनाशकांचा वापरही परिणामकारक ठरू शकतो.

ठाणे जिल्ह्यात अद्याप शेतकऱ्यांकडून अशा तक्रारी आलेल्या नाहीत. तशी नोंदही आढळून आलेली नाही. मात्र त्याबाबत अधिक माहिती घेऊ. – रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी अधिक्षक, ठाणे.