ठाणे: घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रोच्या कामा दरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला. या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) संबंधित सिव्हील एजन्सीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
घोडबंदर भागात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. ठाण्याहून घोडबंदच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरबावडी भागात शुक्रवारी सकाळी येथील क्रेनचा भाग अचानक कोसळला. दरम्यान, या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवर हा भाग कोसळला. त्यामुळे या मोटारीचे नुकसान झाले. या कारमध्ये कुटुंब प्रवास करत होते.
कारच्या मागील भागावर क्रेनचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचे देखील नुकसान झाले. घटनेची माहिती वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे वाहतुक पोलिसांचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वीही मेट्रोच्या कामा दरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत.या प्रकरणानंतर आता एमएमआरडीएने याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. एमएमआरडीएने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, २ मे रोजी कापुरबावडी मेट्रो स्टेशनजवळ एका क्रेनच्या एक्स्टेन्शन जिबचा अपघात झाला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जखम झाली नाही. एका कार आणि एका रिक्षाला किरकोळ नुकसान झाले. घटनास्थळी सुरक्षेसाठी तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या आणि परिसर तात्काळ बंद करण्यात आला. प्राथमिक तपासणीत या अपघाताचे कारण यंत्रसामग्रीतील बिघाड असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमएमआरडीएकडून बांधकाम स्थळांवरील निष्काळजीपणाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाते. या घटनेप्रकरणी संबंधित सिव्हिल एजन्सीवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर क्रेन तातडीने स्थळावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेली कार एजन्सीच्या खर्चाने दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असून, रिक्षाचालकाला आधीच नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे. सर्व सक्रिय बांधकाम स्थळांवर सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मेट्रो निर्माणाच्या कामा दरम्यान, एजन्सी कडून नियमांचे पालन केले जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.