कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील सुमारे ४०० कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी डोंबिवली कार्यालयावर मोर्चा काढला. गावांचा समावेश होत असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही महापालिका सेवेत सामावून घ्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केले. यावेळी शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या तीन महिन्याच्या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे सामील करण्यात आल्यानंतर या ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावांच्या समावेशानंतर ग्रामपंचायती मोडीत निघणार हे स्पष्ट असले तरी आपले काय होणार ही भीती येथील कर्मचाऱ्यांना सतावू लागली आहे. यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शुक्रवारी डोंबिवली कार्यालयात अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिकेच्या आवारात सकाळी १० वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. घरत यांच्या कार्यालयात आमदार सुभाष भोईर, आमदार रविंद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, रमेश पाटील, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे आदि उपस्थित होते. चर्चा झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायती कार्यालयात काम करणाऱ्या सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीचे पुढे काय असा प्रश्न पडला होता. नोकरी जाते की काय, अशी भीती त्यांच्या मनात असली तरी त्यांनी निश्चित रहावे. प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामील करण्याचे ठरविले आहे. कर्मचाऱ्यांना आता आपल्या कामाला लागावे. – सुभाष भोईर, आमदार
या कर्मचाऱ्यांसंदर्भात महापालिकेने राज्य शासनाला पत्र पाठविले आहे. २७ गावे महापालिकेत सामील झाल्यामुळे अधिक कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे नमूद केले असून ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना सामील करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. – रवींद्र चव्हाण, आमदार