अंबरनाथः अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारतींसह धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. शहरात एकूण २२९ धोकादायक इमारती असून त्यातील २० इमारती अतिधोकादायक वर्गातील आहेत. तर शहराच्या पूर्व भागात सर्वाधिक १३९ धोकादायक इमारती आहेत. यात सर्वात जुन्या सुर्योदय सोसायटीतील सर्वाधिक मालमत्तांचा समावेश या धोकादायक मालमत्तांच्या यादीत आहे. नागरिकांनी अतिधोकादायक इमारतील रिकाम्या करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने धोकादायक इमारतींची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या यादीत शहराच्या पूर्व भागात १३९ धोकादायक इमारती असून त्यात १० अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहेत. पश्चिम भागात एकूण ९० इमारती धोकादायक असून त्यात १० इमारती अतिधोकादायक यादीत आहेत. विशेष म्हणजे या यादीमध्ये अनेक शासकीय वास्तूंचा, गृहनिर्माण मंडळाच्या इमारतींचा आणि शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांच्या रहिवाशी इमारतीचाही समावेश आहे.

दरवर्षी अंबरनाथ नगरपालिका खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करत असते. त्यातील अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आवाहन अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने करण्यात येते. यंदाही पालिका प्रशासनाने ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये असलेल्या २२९ इमारतींपैकी तब्बल १३९ इमारती अंबरनाथ पूर्व भागातील आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी म्हणून ओळख असलेल्या सुर्योदय सोसायटीतील अनेक वास्तूंचा यात समावेश आहे. ५० पेक्षा अधिक इमारतींचा यात समावेश आहे. सुर्योदय सोसायटीतील अनेक भूखंडांचे वर्ग दोनचे वर्ग एक करण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्याचवेळी सध्याच्या घडीला पुनर्विकासाचे वारे याच सुर्योदय सोसायटीत वाहत असून अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास केला जातो आहे. त्यामुळे येत्या काळात येथील धोकादायक इमारतींची संख्या कमी होण्याची आशा आहे.

महत्वाच्या वास्तूंचा समावेश

अंबरनाथच्या डॉ. बी. जे. छाया शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांच्या रहिवासी वास्तूचा धोकादायक इमारतींच्या यादीत समावेश आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था अर्थात हाऊसिंग बोर्डाच्या इमारत क्रमांक १४ आणि १५चाही यात समावेश आहे. क़ॉंग्रेस आणि आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्याही नावांचा यात समावेश आहे. अंबरनाथ मशिद ट्रस्टच्या मुस्लिम जात ए उर्दू शाळेचाही अतिधोकादायक इमारतीच्या यादीत समावेश आहे. नुतन बालविकास प्राथमिक शाळा यांनाही धोकादायक इमारतीबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. तर मेटल नगर, वडवली, कानसई, बी केबीन, खेर आणि साई सेक्शनमधील अनेक इमारतींचा या यादीत समावेश आहे.

ज्या इमारती राहण्यायोग्य नाहीत. ज्या अतिधोकादायक यादीत आहेत. त्या इमारती रिकाम्या केल्या जात आहेत. मागील काही दिवसात पाच इमारती रिकाम्या केल्या असून, उर्वरित इमारती देखील रिकाम्या करण्यात येतील.

उमाकांत गायकवाड, मुख्याधिकारी