अंबरनाथः शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण आणि नव्या विस्तारलेल्या निवासी भागांमध्ये पाणी व वायू प्रदूषणामुळे अंबरनाथकरांच्या आरोग्यावर गंभीर संकट उभे ठाकले आहे. विशेषतः पावसाळ्यात रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळून प्रदूषण केले जात आहे. धोकादायक पातळीपर्यंत वाढलेले हे प्रदूषण नागरिकांच्या जीवाशी खेळत असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) वारंवार तक्रारी होऊनही केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप होत आहे.
तर शेजारच्या बदलापूर शहरातही औद्योगिक वसाहतींमधून सोडला जाणारा रासायनिक वायू पावसाळ्याच्या काळात आणधी त्रासदायक ठरतो आहे. अनेक वर्षांपासून सुरू झालेले हे प्रदुषण पर्व संपणार कधी असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
गेल्या काही वर्षांपासून विस्तारणाऱ्या आणि मध्यमवर्गीयांच्या पसंतीस उतरणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाने विळखा घातला आहे. कधी नैसर्गिक नाल्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडायचे तर कधी कंपनीतून रासायनिक वायू हवेत सोडायचे असा येथील रासायनिक कंपन्यांचा नित्यक्रम आहे. अनेक वर्षे येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद होते. काहींमध्ये योग्यरित्या प्रक्रिया केला जात नसल्याचा आरोप होत होता. मात्र इतक्या वर्षांनंतरही त्यावर ठोस तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे आजही प्रदुषणाच्या घटना कमी होण्याच्या ऐवजी वाढल्या आहेत.
चार एमआयडीसी, शेकडो रासायनिक कंपन्या
अंबरनाथमध्ये आनंद नगर, मोरीवली आणि वडोली या तीन तर बदलापुरात खरवई येथे औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आहेत. या भागात शेकडो रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. पंधरवड्यापूर्वीच चिखलोली धरणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले होते. ज्यामुळे धरणातील पाणी दूषित होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला. दुसरीकडे, मोरीवली, वडोली
आणि बदलापुरातील खरवई भागातील कंपन्या पावसाच्या आडून मोठ्या प्रमाणात रासायनिक धुर सोडत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वसनातून व विषारी पाण्यातून रसायनांचा मारा होत आहे.
दारे खिडक्या बंद करून राहावे लागते
अंबरनाथच्या बी कॅबिन, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी तसेच बदलापुरातील पूर्वेतील विविध भागातील रहिवाशांना रासायनिक वायूंच्या प्रचंड प्रदूषणामुळे दारे-खिडक्या बंद ठेवून राहावे लागत आहे. गर्भवती महिला, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका सहन करत आहेत. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्या तरी, कंपन्यांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
मोरीवली औद्योगिक वसाहतीशेजारील परिसरात तीन नामांकित शाळा असून येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा रासायनिक कंपन्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने, दररोज श्वसनातून होणाऱ्या प्रदूषणाचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर बसत आहे. पालक वर्ग तीव्र चिंता व्यक्त करीत आहे.
प्रशासनाला जाग येणार कधी?
अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाणी व वायू प्रदूषणाचा प्रश्न वर्षानुवर्षे गंभीर होत असून, आता तो आरोग्यसंकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मात्र संबंधित कंपन्या बिनधास्तपणे प्रदूषण करत राहतात आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ कागदोपत्री नोंदी करून आपली जबाबदारी संपवते, असा आरोप होतो आहे. याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी जयंत कदम यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.