अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने जागतिक बेघर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त नगरपरिषदेच्या बेघर निवारा केंद्रात अंबरनाथचे मुख्याधिकारी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिर, सुरेल भजन कार्यक्रम आणि भेटवस्तूंमुळे बेघरांचा दिवस लक्षणीय ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात बेघर निवारा केंद्राला नवे नाव देऊन झाली. मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार या केंद्राला आता “आसरा” असे नाव देण्यात आले असून, यामुळे या उपक्रमाला एक आत्मीय आणि ओळख निर्माण करणारा स्पर्श मिळाला आहे.

शहरातील नागरिकांपर्यंत बेघर निवारा केंद्राविषयी माहिती पोहोचावी याकरिता शहराच्या विविध भागांमध्ये ‘आसरा बेघर निवारा केंद्र’चे फलक लावण्यात आले. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांमध्ये बेघरांविषयी सामाजिक संवेदना निर्माण व्हावी या हेतूने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजातील बेघर नागरिकांविषयी जागरूकता आणि सहानुभूती व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात उपस्थित लाभार्थ्यांची सामान्य वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर महिला बचत गट व शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे लाभार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

दिवसभर चाललेल्या या उपक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश होता. भजनी मंडळाच्या माध्यमातून भजनाचा कार्यक्रम तसेच संध्याकाळी सुरेल गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामुळे वातावरण आनंदमय झाले.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीचे भान जपत समाजातील उपेक्षित घटकांबाबत संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला. ‘आसरा’ या नावाने बेघर निवाऱ्याला नवी ओळख मिळाली असून, हा उपक्रम शहरातील नागरिकांच्या मनात एक सकारात्मक छाप सोडणारा ठरला आहे.

कौतुकास्पद उपक्रम

अंबरनाथ नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या बेघर निवारा केंद्राची यापूर्वी सरकारने दखल घेतली होती. नगर परिषद संचालित हे राज्यातील सर्वोत्तम बेघर निवारा केंद्रांपैकी एक केंद्र ठरले आहे. या केंद्राच्या उभारणीत स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी पुढाकार घेतला होता. यापूर्वीचे बेघर निवारा केंद्र पत्र्याच्या छताखाली होते. त्यात बेघरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र नव्या केंद्रामुळे बेघरांना नवा पर्याय मिळाला आहे.