अंबरनाथ : तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली असून दोन गंभीर प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर सर्व विकासक, कंत्राटदार आणि वाहनमालकांना अधिकृत परवाना व परवानगीशिवाय उत्खनन अथवा वाहतूक न करण्याचा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. नियम पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या आठवड्यात ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी वाहन क्रमांक एम एच ०५ डिके ८३३३ हे वाहन थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनावरील गौण खनिज वाहतूक परवान्याचा वैधता कालावधी संपल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी हा परवाना त्या वेळी अमान्य ठरला होता. ग्राम महसूल अधिकारी संबंधित वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात आणत असताना वाहनमालक पाटील आणि त्यांचे सहकारी प्रसाद पाटील आणि नितिन फुलोरे यांनी अधिकाऱ्यांना अडवून धक्का-बुक्की केली, अशी माहिती महसूल कर्मचाऱ्यांनी दिली.
त्यांनी एका अधिकाऱ्याला पकडून ठेवत वाहनचालकास वाहन घेऊन पळून जाण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर पाटील यांनी महसूल अधिकाऱ्याला “तुझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो, आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बघून घेतो” अशी धमकी दिली, अशी माहिती तहसील प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या घटनेनंतर महसूल प्रशासनाने संबंधित आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेतली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये ग्राम महसूल अधिकारी यांना लेखी फिर्याद दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार याप्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत १६ ऑगस्ट रोजी अंबरनाथ तालुक्यातील मौजे पाले येथील एका भूखंडात ग्राम महसूल अधिकारी यांनी तपासणी केली असता, तेथे १ हजार ४१७ ब्रास मातीचा साठा आढळून आला. तसेच आता त्या ठिकाणी असलेले पोकलेन यंत्र अनधिकृत उत्खननासाठी वापरले जात असल्याचेही समोर आले. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी ही वाहने सिलबंद केली. मात्र, १२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पुढील पाहणीत, तेच पोकलेन जागेवरून गायब असल्याचे आढळले. तपासात समोर आले की पोकलेन मालक यशवंत पाटील यांनी महसूल कार्यालयाची परवानगी न घेता हे यंत्र परस्पर काढून नेले होते. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी रसाळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांनंतर महसूल प्रशासनाने सर्व संबंधितांना स्पष्ट इशारा दिला आहे. अंबरनाथ तालुक्यातील विकास कामांसाठी उत्खनन किंवा वाहतूक करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून वैध परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे विनापरवानगी उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदीनुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.