अंबरनाथः सध्या देशात आणि राज्यात हवश्या, गवश्या नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी, त्यांची स्मारके, पुतळे, स्वागत कमानी, रस्त्यांना त्यांची नावे देण्याचा मोठा ट्रेंड आहे. आजही विविध शहरातल्या अनेक रस्त्यांना देण्यात आलेली नावे हे त्यांच्या कर्तुत्वामुळे नाही तर त्यांच्या पाल्यांच्या लोकप्रतिनिधी असण्यामुळे दिली जातात. परंतु ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात एका शूर शहिद सैनिकाच्या आई वडिलांना मुलाचे स्मारक आणि त्याला अधिकृतता मिळवण्यासाठी तब्बल १९ वर्षांचा लढा द्यावा लागला.
अंबरनाथ पूर्वेतील मोतीराम पार्क परिसरात स्वातंत्र्यदिनी मेजर वीर शौर्य चक्रवर्ती यांचे लहानसे स्मारक उभारून त्या रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा सोहळा शुक्रवारी पार पडला. आपल्या मुलाची आठवण रहावी यासाठी त्या शहिदाच्या पालकांना यासाठी १९ वर्षे वाट पाहावी लागली. तब्बल १५ वर्षे यासाठी त्यांना पाठपुरावा करावा लागला. अखेर शुक्रवारी मुलाचे नाव रस्त्याला देत असताना स्मारक पाहून त्यांचे डोळे पाणावले.
कारगिल, ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षा आणि पराक्रम या मोहिमांमध्ये शौर्य दाखवणारे मेजर वीर शौर्य चक्रवर्ती हे १९ ग्रेनेडियर्सचे लढाऊ सैनिक होते. त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना २००० मध्ये चीफ ऑफ आर्मी स्टाफद्वाे कमेंडेशन कार्डने गौरवण्यात आले होते. त्यांच्या अलौकीक कामगिरीमुळे त्यांना २००५ मध्ये मेजर पदावर पदोन्नत्ती देण्यात आली होती. कर्तव्यावर असताना २९ सप्टेंबर २००६ साली सरावादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यात अवघ्या २८ व्या वर्षी ते शहीद झाले. त्यांचे आई वडील अंबरनाथच्या मोतीराम पार्क परिसरात वास्तव्यास आहेत.
आपल्या मुलाचे परिसरात किमान एक स्मारक असावे, तसेच त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची माहिती पुढच्या पिढीला व्हावी यासाठी किमान ते राहत असलेल्या परिसरातील लहानशा रस्त्याला त्यांचे नाव द्यावे अशी त्यांचे वडिल शांतनू आणि आई नमिता चक्रवर्ती यांची इच्छा होती. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यात पुढाकार घेईल तर नवलच. अखेर त्यांच्या निवासस्थानाजवळील मार्गाजवळ त्यांचे स्मारक त्यांच्या आई वडिलांनी स्व खर्चाने उभारले. मात्र त्या रस्त्याला नाव देण्यासाठी स्थानिक पालिकेची परवानगी आवश्यक होती. त्यासाठी त्यांनी स्थानिक अंबरनाथ नगर पालिकेत पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याला काही अंशी यश आले २०१० या वर्षात.
मात्र त्यापुढे हे स्मारक आणि रस्त्याला नाव देण्याची प्रक्रिया काही पुढे सरकली नाही. दवर्षी अनेक वेळा चक्रवर्ती कुटुंबियांनी पालिकेचे उंबरठे झिजवले. या स्मारकाच्या उभारणीसाठी त्यांना १५ वर्षे लागली. या काळात शहरात अनेक रस्त्यांचे, चौकांचे नामकरण झाले, अनेक चौक सुशोभीत झाले, अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभ्या राहिल्या. मात्र शहिद वीर शौर्य चक्रवर्ती यांच्या कर्तुत्वाचा सर्वांना विसर पडला. काही महिन्यांपूर्वीपासून स्थानिक ज्येष्ठ पत्रकारांनी यात पुढाकार घेतला. अंबरनाथ नगरपालिकेचे नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी या प्रकरणाची दखल घेतली. तातडीने विविध विभागांना आदेश देत गायकवाड यांनी देखभाल दुरूस्ती करून शेजारी उद्यान उभारण्याच्या हालचाली केल्या.
अखेर या सर्व प्रयत्नांने शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत माजी लोकप्रतिनिधींच्या हजेरीत या स्मारक आणि पदपथाच्या नामकरणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी शहिद सैनिकाच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. यावेळी ८५ वर्षीय या शांतून चक्रवर्ती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तर आजारपणामुळे घरी असलेल्या नमिता यांनीही समाधान व्यक्त केले.
चमकेश नेत्यांची संवेदनाहिनता
स्मारकाच्या स्वच्छतेदरम्यान एका स्थानिक चमकेश नेत्याचा बॅनर हटवण्याचा पालिकेने प्रयत्न केला. मात्र त्याने पालिका कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करत आपला शुभेच्छांचा बॅनर कायम ठेवण्याचा हट्ट धरला. या हौशी चमकेश नेत्याची संवेदनहिन वृत्ती यामुळे उपस्थितांना दिसून आली.