लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमात आणखी एक भर म्हणून जिल्हा परिषद कार्यालयाच्या भिंतींवर कलाकृतींचा अविष्कार साकारण्यात आला आहे. यामध्ये स्वच्छतेचा संदेश आणि जिल्ह्यातील धार्मिक स्थळांसह जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्रांचा समावेश आहे. या आकर्षक अशा चित्रांमुळे जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलला असून काम करताना प्रसन्न वाटतं असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना कृत्रीम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण, ई-ऑफीस प्रणाली असे विविध उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांसह आता,जिल्हा परिषद कार्यालयाच्या भिंतींवर विविध जनजागृतीपर तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचे चित्र रेखाटण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठाणे जिल्हा परिषद मुख्यालयाच्या जुन्या इमारतीचे काम सुरु असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात वागळे इस्टेट भागात मुख्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. तळ अधिक दोन मजली अशी ही इमारत आहे. या मुख्यालयात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून तसेच इतर भागातून नागरिक कामासाठी येतात. या नागरिकांना ठाणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र त्यासह विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून ही भित्तीचित्रे रेखाटण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

नागरिकांचे लक्ष वेधणारे मनमोहक चित्र

ठाणे जिल्हा परिषद कार्यालयातील भिंतींवर मुरबाड येथील प्रसिद्ध असा माळशेज घाटातील मनमोहक दृश्य, अंबरनाथ येथील शिव मंदिर, वज्रेश्वरी येथील मंदिराचे भित्तीचित्र सर्वांचे लक्ष वेधत आहेत. त्यासह, महानुभाव संत गाडगे महाराज , तुकडोजी महाराज यांचेही सुंदर असे चित्र रेखाटले आहे.

प्रवेशद्वाराच्या आवारात योजनांची माहिती देणारे चित्र

जिल्हा परिषदेत जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक येत असतात. या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रवेशद्वाराच्या आवारात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यामध्ये योजनेची उद्दिष्ट, कोणते लाभार्थी, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता यासर्व माहितीचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.