काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
शिवसेना बोलते केंद्रात आम्ही एकत्र मात्र सरकार आमचे नाही. भाजप सरकार हे पाकीटमार सरकार असल्याचे शिवसेना बोलत आहे. मग अशा सरकारमधून उद्धव यांनी बाहेर पडणेच योग्य होईल, असा जोरदार टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी युती सरकारवरला लगावला.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली म्हणून राष्ट्रवादीने लगेच सरकारमध्ये जाऊ नये, सरकारने एलबीटी व टोल माफ केल्याने महाराष्ट्राच्या उत्पन्नात जी तूट पडली आहे, ती भरून काढण्यासाठी त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीचे नाव पुढे करून पेट्रोल, डिझेल व तेलाचे भाव वाढविले. दुष्काळग्रस्तांना मात्र यात काहीही मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण होत आहे, वर्षपूर्ती सोहळ्यासाठी त्यांनी १५ कोटींची तरतूद केली आहे, या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा याचा विनियोग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करावा. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे उपस्थित होते.