काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेटीनंतर ग्वाही
राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांमधील मतफुटीची चर्चा रंगली असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्काना ऊत आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपणार असून त्यात विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे नाव आहे. या पाश्र्वभूमीवर डावखरे यांची भेट घेतल्यानंतर चव्हाण यांनी त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचा शंभर टक्के पाठिंबा आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच डावखरे यांच्यासोबतचा आमचा करार पक्का असून त्यांनी निवडणूक लढवावी, काँग्रेस त्यांना साथ देईल, असेही त्यांनी वक्तव्य केले. विशेष म्हणजे, या वेळी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीमुळे अडचणीत आलेले आमदार भाई जगताप हे उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीमु़ळे काँग्रेस व राष्ट्रवादी संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत या दोन पक्षांची भूमिका कशी राहील, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी दोन वेळा पुरेसे संख्याबळ हाती नसतानाही ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून डावखरे यांनी विजय संपादित केला होता. मागील निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री उशिरा डावखरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी डावखरे यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. याशिवाय, निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी करार प्रासंगिक असतात, असे वक्तव्यही त्यांनी केले. भविष्यात परिस्थितीनुसार त्यावर निर्णय होईल, मात्र डावखरेंनी निवडणूक लढविल्यास त्यांचा आणि आमचा करार पक्का आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
या वेळी डावखरे यांनी मात्र पक्षादेश आल्याशिवाय त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे पत्रकारांना सांगितले. चव्हाण आणि माझी मैत्री घट्ट असली तरी आगामी निवडणूक कोणी लढवायची, हे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी ठरविलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.