ठाणे : ठाण्यातील सर्वात जुन्या वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रात आता व्यवसाय करणे कठीण होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यातील एका व्यवसायिकाकडून माथाडीच्या नावाने खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला. खंडणी दिली नाही म्हणून त्याच्या मालवाहू गाड्या अडविण्यात आल्या. याप्रकरणी त्या व्यवसायिकाने तक्रार दाखल केल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात मोठ्याप्रमाणात लघु उद्योग आहे. या उद्योगांच्या माध्यमातून हजोरोंना रोजगार उपलब्ध होतो. मागील काही वर्षांमध्ये येथे आयटी कंपन्यांची स्थापना झाल्या. तसेच वागळे इस्टेट भागात नागरी वस्ती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे हळू हळू येथील लघु उद्योग कमी होत चालले आहेत का, असा प्रश्नही पडत आहे. उद्योजकांना सुरक्षित वातावरण देणे हे सरकारचे काम आहे. परंतु काही बोगस माथाडी कामागार संघटनांच्या नावाने टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्याकडून व्यवसायिकांना त्रास देण्याची कामे होत आहे. या विषयी ठाणे पोलीस आयुक्तालयातही पोलीस आणि उद्योजकांमध्ये अनेक बैठका पार पडल्या होत्या.

त्यातच वागळे इस्टेट भागात एक प्रकरण समोर आले आहे. ठाण्यातील एका व्यवसायिकाचा विजेरी विक्राचा व्यवसाय असून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी रोड क्रमांक १२ येथे एक दुकान खरेदी केले होते. त्याच्या सजावटीचे काम गाळ्यात सुरु असताना सहा ते सात महिन्यांपूर्वी एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयात आला. येथे येणाऱ्या वाहनांसाठी ७२ हजार रुपये माथाडी कामासाठी द्यावे लागतील. तसेच प्रत्येक वाहन आणि वस्तू मागे वेगळे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. काही दिवसांनी तो व्यक्ती त्याच्या इतर दोन साथिदारांसह गाळ्यामध्ये येऊन काम रोखण्याचा प्रयत्न करु लागला होता. परंतु व्यवसायिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.

काही दिवसांपूर्वी त्या तिघांनी व्यवसायिकाच्या गाळ्यासाठी लागणाऱ्या सजावटीच्या सामानाचे वाहन अडवून ठेवले. अखेर व्यवसायिकाने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बोगस माथाडींची डोकेदुखी

उद्योजकांना त्रास देण्यासाठी ठाण्यात मोठ्याप्रमाणात बोगस माथाडी कामगारांच्या संघटना तयार झालेया आहेत. या संघटनांची गुंडगिरी सुरू आहे. व्यवसायिकांकडून खंडणीची मागणी होते. त्यामुळे या बोगस माथाडींना त्यांना थांबवा. अशी तक्रार आणि मागणी वारंवार उद्योजकांच्या संघटनांनी केली आहे. तसेच अनेक संघटनांनी पोलिसांकडे ही तक्रारी केल्या. परंतु त्यातून पूर्णपणे मार्ग निघू शकत नसल्याचे दिसून येत आहे.