बदलापूरः कर्तव्यावर असताना आपल्या सहकाऱ्यांमध्ये मनमिळावूपणे आणि शिस्तप्रियतेने सेवा करणारे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय रोकडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या धक्कादायक घटनेने पोलिस दलासह संपूर्ण बदलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रोकडे यांची एक्झिट पोलीस सहकारी आणि कुटुंबियांसाठी मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे.

रोकडे हे मे २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदलीची ऑर्डर आली होती, मात्र उर्वरित सेवा बदलापूरमध्येच पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. पोलिस आयुक्तांनी ती मान्य केल्याने ते समाधानाने आणि आनंदाने काम करत होते. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर आले. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास छातीत हलके दुखू लागल्याने, “घरी जाऊन येतो” असे सांगून ते काही वेळासाठी घरी गेले. मात्र थोड्याच वेळात ते पुन्हा पोलिस ठाण्यात परतले. त्यानंतर पुन्हा छातीत वेदना वाढल्याने सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी रुग्णालयात न जाता थेट घरी जाण्याचे ठरवले. घरी पोहोचताच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि शुद्ध हरपली. कुटुंबीय व पोलिस प्रशासनाच्या मदतीने त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अश्रूंनी भरलेला निरोप

सोमवारी त्यांच्या पार्थिवावर बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सहकारी, मित्रपरिवार, स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रोकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मनमोकळेपणा, जबाबदारीची जाणीव आणि सहकाऱ्यांशी असलेला जिव्हाळा या गुणांमुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, सहकारी आणि बदलापूर शहर शोकसागरात बुडाले आहे.