बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर कोंडी होत असल्याचे चित्र होते. त्यावर उपाय म्हणून कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने शहरातील महत्वाचे चौक रूंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील १४ ठिकाणच्या चौकातील अडथळे हटवण्यात आले असून या ठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवली जाते आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे अरूंद असलेले चौक विस्तीर्ण होत आहेत. बदलापूर पूवर्वेतील ९ तर पश्चिमेतील ५ चौकांचा समावेश आहे.

बदलापूर शहराचा विस्तार आता एकीकडे एरंजाड गाव, बदलापूर गावापर्यंत तर पूर्वेकडे थेट कासगावपर्यंत झाला आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नव्याने दाखल झालेल्या वाहनांची भर पडते आहे. अनेक रस्ते आणि चौक जे पाच ते सात वर्षांपर्यंत मोकळे होते. त्या सर्व चौकांमध्ये नव्या इमारती, दुकाने सुरू झाल्याने तिथे वाहनांची वर्दळ वाढली. अनेक चौकांमध्ये झाडांचा, काही वास्तूंचा आधार घेत हातगाड्या लागत होत्या. काही ठिकाणी इमारत उभारणाऱ्यांनी सार्वजनिक चौकाची जागाही गिळली होती.

अशा सर्व गोष्टींमुळे बदलापूर पूर्वेतील कर्जत राज्यमार्गावर खरवई नाका, होप इंडिया चौक, डीजी वनजवळील चौक, घोरपडे चौक, कात्रप चौक, भुयारी मार्गाजवळचा मॅकडॉनल्ड चौक कायम कोंडीत अडकायचे. तसेच अंतर्गत रस्त्यांवरही वीर भाई कोतवाल चौक, महात्मा गांधी चौक आणि रेल्वे स्थानक परिसरातील चौकात कोंडी होत होती. बदलापूर पश्चिमेतील समर्थ चौक, बेलवलीतील महादू कान्हू चौक, लोटस तलाव परिसर आणि श्री कॉम्पलेक्स, मांजर्लीतील गणेश चौक या ठिकाणी वाहने वळवताना मोठी कोंडी होत होती. त्यामुळे हे चौक मोकळे करण्याची मागणी होत होती.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेत शहरातील १४ चौक मोकळे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अनेक वर्षांपासून व्यापलेल्या जागा मोकळ्या झाल्या. अजूनही अनेक ठिकाणी काम सुरू असून ज्या ज्या ठिकाणी चौक मोकळे झाले आहेत त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली जात असल्याचेही पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

काही झाडे हटवावी लागली

या चौकांच्या रूंदीकरणासाठी काही झाडे हटवावी लागली. श्री कॉम्पलेक्स, गणेश चौक, समर्थ चौक, दत्त चौक अशा काही ठिकाणच्या झाडांचा त्यात समावेश होता. मात्र दत्त चौकातील जुने झाड हटवण्याला विरोध झाल्याने झाड ठेवून आसपासचा भाग मोकळा करण्याचा निर्णय मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी घेतला. सध्या चौक मोकळे होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच महत्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे.

सुशोभीत चौकही रूंदीकरणात

बदलापूर शहरात प्रवेशद्वार, स्वागत कमानी, चौक सुशोभीकरणाच्या नावाखाली तयार करण्यात आलेल्या वास्तू यांवर मोठा खर्च केला गेला. त्यातील काही सुशोभीत चौकही या रूंदीकरणात हटवण्यात आले आहेत. त्या त्या वेळी लोकप्रतिनिधींनी भविष्याचा विचार केला असता तर नागरिकांचा कररूपी पैसा वाया गेला नसता अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होते आहे. मात्र या चौक रूंदीकरणात रस्ता अरूंद करणाऱ्या किती कमानी हटवल्या जाणार आहेत याबाबत स्पष्टता नाही.