ठाणे : ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही विकासकांनी रखडवला आहे. १० ते २० वर्षे रहिवासी हक्काच्या घरापासून वंचित राहिले आहेत. तर क्लस्टरसारख्या महत्वाकांक्षी योजनेतील एकही आराखडा पूर्ण झाला नसल्याने मिनी क्लस्टर योजना आणून ठाणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. जेथे क्लस्टरचा नियोजित आराखडा आहे, त्या भागात आधी अधिकाऱ्यांनी जाऊन रहिवाशांना माहिती देऊन त्यांना विश्वासात घेणे अपेक्षित आहे. परंतु आधी विकासक त्या भागात घुसत आहेत, त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमावस्था आहे असा आरोपही त्यांनी केला.
ठाणे शहरात क्लस्टर योजना राबविली जात आहे. या क्लस्टर योजनेविषयी भाजपचे ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. क्लस्टरसारखी महत्वाकांक्षी योजना कासवगतीने सुरू असून अद्याप एकही आराखडा पूर्ण झालेला नाही. जेथे नियोजित आराखडा आहे, त्या भागात आधी अधिकाऱ्यांनी जाऊन रहिवाशांना माहिती देऊन त्यांना विश्वासात घेणे अपेक्षित असताना आधी बिल्डर त्या भागात घुसत आहेत, त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमावस्था आहे असा आरोप केळकर यांनी केला. तसेच गेल्या तीन वर्षांपासून मिनी क्लस्टर योजनेची मागणी करत असून ही योजना राबवल्यास ठाणेकरांना दिलासा मिळेल, अशी मागणी केळकर यांनी केली.
ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही विकासक कासवगतीने करत असून रहिवाशांना १० ते २० वर्षे हक्काच्या घरापासून वंचित ठेवले आहे. अशा सुमारे २० इमारतींमधील रहिवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी समन्वयाची भूमिका बजावत आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, महारेरा आणि न्यायालयातही तक्रारी गेल्या आहेत, मात्र वेळखाऊ प्रक्रियेमुळे रहिवाशांच्या पदरी निराशा पडत आहे. या रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी विशेष कायदा करणार का? असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
ठाण्यातील स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेचा प्रकल्प देखील रखडला असून येथील रहिवासी १४ वर्षे घरापासून वंचित आहेत. संबंधित विकासकाने विक्रीची इमारत उभी केली, पण रहिवाशांची इमारत तो अद्याप बांधू शकला नाही. विशेष म्हणजे या बिल्डरने १४ कोटींचे कर्जही घेतले आहे असेही त्यांनी सांगितले.