ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे नवनिर्वाचित ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ९१ जणांचा समावेश असलेली ठाणे शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. दोन वर्षांपूर्वी ठाणे परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला होता. या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाजपचा ठाणे शहराध्यक्ष पदासोबत कार्यकारिणी गठित होऊ शकलेली नव्हती.
चार वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपची युती झाली होती. असे असतानाच दोन वर्षांपूर्वी ठाणे परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार रिंगणात उभा केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करत शिवसेनेपुढे आव्हान उभे केले होते. असे असले तरी शिवसेना-भाजपच्या सदस्यांचे संख्याबळ पाहता शिवसेना उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, ऐन मतदानाच्या वेळी भाजपच्या सदस्याने राष्ट्रवादी उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्यामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे भाजपमधील स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत उफाळून आल्याने दोन गट पडल्याचे चित्र होते. तसेच या वादातून नगरसेवक मिलिंद पाटणकर यांना उपमहापौर आणि ठाणे शहराध्यक्ष पद सोडावे लागले होते. या वादानंतर गेल्या दोन वर्षांपासून भाजपची ठाणे शहर कार्यकारिणी गठित होऊ शकलेली नव्हती. दरम्यान, ठाणे शहराध्यक्षपदी संदीप लेले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे शहराची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत आठ उपाध्यक्ष आणि चिटणीस, चार सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष, ओबीसी मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासह ७२ सदस्यांचा समावेश आहे. एकूण ९१ जणांच्या कार्यकारिणीत ३० महिलांना स्थान देण्यात आले आहे. या कार्यकारिणीत अन्य पक्षातून आलेल्यांचाही समावेश आहे. याशिवाय, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नगरसेवक मिलिंद पाटणकर यांचाही समावेश आहे. दरम्यान, पाटणकर यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे लेले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांची सरसकट वर्णी
भाजपच्या ठाणे शहर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी सचिन आळशी, कैलास म्हात्रे, हरिसिंह मेजार, नरेश पवार, सेजल कदम, संजय पाटील, मनोहर सुखदरे, दीपा गावंड, सरचिटणीसपदी मुकेश मोकाशी, सचिन केदारी, सुरेश कोलते, समीरा भारती, चिटणीसपदी हर्षद काटे, इंदिरा पटेल, राजेंद्र पाटील, शिवकुमार निषाद, अशोक जग्यासी, निर्मला क्षीरसागर, शशिकुमार यादव, विकास पाटील, कोषाध्यक्षपदी ग्यानसिंह अमरसिंह राठोड, सहकोषाध्यक्ष भाईचंद पांचाळ, महिला मोर्चा अध्यक्षपदी हर्षला बुबेरा तर सरचिटणीसपदी मनीषा कुलकर्णी, स्वप्नाली साळवी, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष शरद वांगड तर सरचिटणीसपदी मुकेश शेलार, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष रिझवान झरोदरवाला, ओबीसी मोर्चा अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील तर सरचिटणीसपदी बाळा केंद्रे या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त ७२ सदस्यांचा समावेश आहे.
