डोंबिवली – कल्याण शीळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील वाहतूक कोंडीने दररोज पलावा भागातील रहिवाशांसह इतर भागातून या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दररोज तीन ते चार तास फुकट जात आहेत. या सततच्या कोंडीकडे कोणतीही प्रशासन यंत्रणा लक्ष देत नसल्याने येत्या पंधरा दिवसात पलावा चौकातील वाहतूक कोंडी कायमस्वरुपी सोडविण्याबाबत योग्य निर्णय पोलीस, वाहतूक विभागाने घेतला नाहीतर भाजपतर्फे पलावा चौकात आंदोलन केले जाईल, असा इशारा कल्याण ग्रामीण मंडलाचे भाजपचे पलाव शहर अध्यक्ष सतीश सिंह यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील वाहतूक कोंडीची लढाई आतापर्यंत दोन राजकीय नेत्यांमध्ये सुरू होती. पलावा शहर परिसरातील रहिवासी या राजकीय वादात उतरून स्वताला भरडून घेण्यास तयार नव्हते. मनसे आणि शिंदे शिवसेनेतील दोन नेत्यांमधील या टोकाच्या राजकीय वादंगातून पलावा चौक किंवा शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सुटणार नाही याची पूर्ण खात्री प्रवाशांची झाली आहे. पलावा शहर परिसरातील नोकरदार, व्यावसायिक, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी दररोज पलावा चौकातील कोंडीत तीन ते चार अडकून पडत आहेत. काही राजकीय लोक अंगाला पाऊस, पाणी, वारा, सूर्यप्रकाशाचा स्पर्ध होणार नाही अशा पध्दतीने घरात बसून समाज माध्यमांंच्या बाणातून कल्याण शीळफाटा रस्त्यावरील कोंडी, या भागातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी दररोज अथक प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांची धार आता बोथट झाली असल्याची कल्याण ग्रामीण भागात चर्चा आहे.

पलावा शहर परिसरात आपणास, आपल्या मुलांना कायम स्वरूपी राहायचे आहे. त्यामुळे पलावा चौकातील कोंडी सोडविण्यासाठी आता आपणच पुढाकार घेतला पाहिजे, असा विचार करून पलावा शहर परिसरातील रहिवाशांच्या पुढाकाराने भाजप पलाव शहर विभागाचे प्रमुख सतीश सिंह यांनी पलावा चौकातील कोंडी सोडविण्यासाठी पोलीस उपायुक्त झेंडे यांना पत्र दिले आहे.

पलावा चौकातील दररोजच्या कोंडीने आम्ही नोकरदार, व्यावसायिक रहिवासी, शाळकरी मुले त्रस्त आहोत. या कोंडीमुळे मुले शाळेत आणि घरी वेळेत पोहचत नाहीत. त्यांच्या अभ्यासाचा दररोज खाडा होतो. घरातून कार्यालयात निघालेला आणि कार्यालयातून घरी संध्याकाळी परतणारा पलावा शहर भागातील रहिवासी तीन ते चार तास दररोज या भागात अडकून पडतो. हे रोजचे पलावा चौकातील वाहतूक कोंडीचे नष्टचर्य कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पलावा चौकातील कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा भाजपतर्फे पलावा चौकात नागरिकांच्या सहकार्याने उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अध्यक्ष सिंह यांनी दिला आहे.

शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक नियोजनात एकवाक्यता नाही. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज उलट मार्गिकेतून शेकडो वाहने धावतात. या उलटमार्गी वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. दिवसा अवजड वाहतुकीला शिळफाटा रस्त्यावरून बंदी आहे. तरीही अनेक वेळा वाहतूक पोलिसांच्या समोरून ही वाहने धावत असतात. ही वाहतूक रोखण्यासाठी उपाय योजण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.