उल्हासनगरः उल्हासनगरात खेमानी परिसरात स्मशानभूमीच्या रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोत मृतदेह आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अचानक समोर आलेल्या या मृतदेहाने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही हत्या आहे की आत्महत्या, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर शहर हे व्यापारी शहर म्हणून परिचीत आहे. शहरात अनेक लहान मोठे उद्योग असल्याने त्याकामी शहरात हजारो लहान मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते. अनेकदा कच्चा माल उचलण्यासाठी आणि उतरवण्यासाठी माल वाहनांना वाट पाहावी लागते. अनेकदा अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. असाच एक टेम्पो बराच वेळ रस्त्याच्या कडेला उभा असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधले गेले.

काहींनी टेम्पोच्या पडद्याच्या मागे डोकावून पाहिले असता, त्यांना आत एक मृतदेह असल्याचे आढळून आले. नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात मृतदेहाच्या शेजारी उत्तर प्रदेशातील गोंठा ग्रामपंचायतचे निवासी प्रमाणपत्र सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या प्रमाणपत्रावर संतोष प्रभुनाथ प्रजापती असे नाव असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी या नावाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, मृत व्यक्तीच्या ओळखीबाबत अधिकृत तपशील शोधला जातो आहे. लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या प्रमाणपत्रामुळे अनेक तर्कवितर्त लढवले जात आहेत. मृतदेहाजवळ आढळलेले प्रमाणपत्र हे मृत व्यक्तीचेच आहे की हे कुणी हेतुपुरस्सर ठेवले आहे, याचा प्रश्न चर्चिला जातो आहे. त्याच दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच ही आत्महत्या आहे, हत्या आहे याबाबतच तर्तवितर्क लढवले जात आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Body found in parked tempo in ulhasnagar zws