ठाणे – मुंब्रा येथील पारसिक – रेतीबंदर खाडीत बुधवारी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हाद्रतअली हसन शेख (३७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांना हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे.

मुंब्रा येथील पारसिक भागात रेती बंदर खाडी आहे. या खाडी किनाऱ्याजवळ बुधवारी १२ वाजताच्या सुमारास हाद्रतअली शेख यांचा मृतदेह आढळला. हाद्रतअली शेख हे मुंब्रा येथील संजय नगर परिसरात राहत होते. या घटनेची माहिती मिळताच, मुंब्रा पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर हा मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.