डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव चेरानगर भागात एका खासगी शिकवणी चालिकेने एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अभ्यासात ढ असल्याच्या रागातून गुरुवारी मारहाण केली. मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असुनही तिला समजून सांगण्याऐवजी खासगी शिकवणी चालिकेने आपल्या मुलीला मारहाण केली म्हणून अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात खासगी शिकवणी वर्गातील शिक्षके विरुध्द तक्रार केली आहे.

सागाव मधील चेरानगर मधील रविकिरण सोसायटीमधील सुखशांती सोसायटीत हा प्रकार गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता घडला आहे. सारिका अमोल घाग असे खासगी शिकवणी चालिकेचे नाव आहे. ती या सोसायटीत लहान मुलांचे खासगी शिकवणीचे वर्ग घेते. रविकारण सोसायटी मधील साईनाथ सोसायटीत राहणाऱ्या नितीन रघुनाथ नरूटे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. ते बँकेत नोकरीला आहेत.

हे ही वाचा… ‘रिलायन्स’कडील पाचही विमानतळ ताब्यात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार नितीन नरूटे यांची सहा वर्षाची अल्पवयीन मुलगी सारिका घाग यांच्या खासगी शिकवणीत अभ्यासासाठी जाते. ती दररोज साडे नऊ ते साडे अकरा वेळेत या वर्गात असते. तिचे आई, वडील तिला या वर्गात सोडतात. गुरुवारी खासगी शिकवणी वर्गात नितीन नरूटे यांची मुलगी अभ्यास करत होती. त्यावेळी शिक्षिका सारिका घाग यांनी तिला दिलेला अभ्यास पूर्ण केला नाही. यावरून रागावलेल्या सारिका यांनी नरुटे यांच्या मुलीला तुला अभ्यास का जमत नाही, तुला लिहिता का येत नाही. तू शिकवणी वर्गात अभ्यास का करत नाहीस, असे रागाने बोलून तिच्या हातावर छडीने मारले.

हे ही वाचा… ठाणे : गायमुख चौपाटीच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी लोकार्पण

तसेच, तिच्या कानाखाली चापट मारली. या घडल्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी रडायला लागली. सर्व मुलांसमोर शिक्षिकेने मारल्याने ती अस्वस्थ झाली.खासगी शिकवणी वर्गात घडलेला प्रकार मुलीने घरी आई, वडिलांना सांगितला. पालकांनी घाग यांना जाब विचारला. मुलगी अल्पवयीन आहे. तिला समजून सांगण्याऐवजी मारहाण का केली, असे प्रश्न करून पालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सारिका घाग यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.