महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रथमच महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत येणाऱ्या ठाणे कसारा महामार्गावरील २२ ठिकाणं या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार असून गृह विभागानेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून २ कोटी ५५ लाख रुपयांच्या तरतुदींला मंजुरी दिली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे ग्रामीण पोलीस पट्ट्यात बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. ठाणे ग्रामीण हा भाग मुंबईपासून जवळच असल्याने तडीपार झालेले अनेक गुंड या भागात आसरा घेतात. याशिवाय या भागात महामार्गाचे जाळे देखील विस्तृत असल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या देखील मोठी आहे. अशात ठाणे-कसारा दरम्यान महामार्गावर तसेच घाटात होणाऱ्या दरोड्याचा घटना, चोऱ्या, अपप्रकार, चोरीच्या वाहनांची होणारी वाहतूक, घाटात आणि निर्जन ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह फेकून देणे अथवा त्यांची विल्हेवाट लावणे यासारखे अनेक प्रकार घडतात. या गैरप्रकाराना आळा घालण्यासाठी हा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याची मागणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केली होती.

एकनाथ शिंदे यांनी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातुन २ कोटी ५५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार राज्याच्या गृह विभागाने हे सीसीटीव्ही बसवण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर त्याचा मोठा फायदा इथले अनुचित प्रकार रोखण्यासाठी, तसेच या भागाची निगराणी राखण्यासाठी देखील होणार आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे कॅमेरे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे ठाणे शहराप्रमाणेच ठाणे ग्रामीणचा भागात घडणाऱ्या घटनांवर पोलिसांना बारीक नजर ठेवता येणे शक्य होईल.

या निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी आणि हे कॅमेरे आणि सीसीटीव्ही कंट्रोल रुम लवकरात लवकर तयार करावी, असे निर्देश ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv will be set up on thane kasara highway say eknath shinde hrc