उल्हासनगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार राज्यात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे आपापल्या श्रेणीत अव्वल ठरल्या आहेत. वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर यांचे मुल्यमापन करण्यात आले होते.
राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेतला होता. यात प्रशासकीय पातळीवर जिल्हा परिषदेसह, महापालिका, पोलीस या सर्वच शासकीय विभागांना १०० दिवसांचा धोरणात्मन कार्यक्रम देण्यात ाला होता. त्यानुसार महत्वाचे नविन धोरण, दुरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमंची आखणी सुरू करण्यात आली होती. त्यात सरकारच्या ४८ विभागांचाही समावेश होता. सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मन उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्ट्ये पूर्णत साध्य करण्यात आली आहेत. यात ७८ टक्के चांगली कामगिरी झालेली आहे. तर कार्यालयीन सुधारणात कार्यक्रमाचेही मुल्यमापन करण्यात आले. १०० दिवसांच्या मुल्यमापनानंतर अखेर गुरूवार १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निकालाची घोषणा केली. यात राज्यातील ५ मंत्रालयीन विभागांचे सचिव, ५ मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, ५ जिल्हाधिकारी, ५ पोलिस अधीक्षक, ५ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ४ महापालिका आयुक्त, ३ पोलिस आयुक्त, २ विभागीय आयुक्त आणि
२ पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
यात सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ९२ टक्के गुण मिळवत ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. तर सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी ८६.२९ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून मिरा भाईंदरचे आयुक्त मधुकर पांडे सर्वोत्तम ठरले आहेत. तर कोकण विभागीय आयुक्त या श्रेणीत प्रथम आले आहेत. सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरिक्षक म्हणून कोकण महानिरिक्षकांनी बाजी मारली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.