‘टॉप २०’मध्ये तिघांचा समावेश; १६ लाख रुपयांचे दागिने जप्त

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे तसेच डोंबिवली परिसरात तब्बल ३९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या पाच सोनसाखळी चोरटय़ांसह एका सराफाला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या पाच चोरटय़ांमध्ये ठाणे पोलिसांनी तयार केलेल्या ‘टॉप-२०’ यादीतील तिघा सराईत सोनसाखळी चोरटय़ांचा समावेश आहे. या तिघांविरोधात पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली असून या टोळीकडून सुमारे १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मोहमद अफसर जाफरी ऊर्फ आंडू, अझीज हाफीज सय्यद, मुख्तार शेरू इराणी, आसू रझा सय्यद, लंदौर अफसर जाफरी ऊर्फ सय्यद, अशी सोनसाखळी चोरटय़ांची नावे आहेत. यापैकी लंदौर हा पुण्यातील शिवाजीनगर भागात राहतो तर उर्वरित चौघे कल्याणमधील आंबिवली भागात राहतात. तर कांतिलाल आनंदजी शहा असे सराफाचे नाव असून तो मुंबईतील घाटकोपर भागात राहतो. ठाणे पोलिसांनी तयार केलेल्या ‘टॉप-२०’ यादीमध्ये मोहमद अफसर जाफरी ऊर्फ आंडू, अझीज हाफीज सय्यद आणि मुख्तार शेरू इराणी या तिघांची नावे आहेत. यापैकी मोहमद हा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ातील सर्वात सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने या तिघांच्या साथीदारांना यापूर्वी अटक केली असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्य़ात हे तिघे फरार होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे पथक त्यांचा माग काढत होते. अखेर या तिघांना पकडण्यात गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचे साथीदार आसू आणि लंदौर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ठाणे तसेच डोंबिवली परिसरात तब्बल ३९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली या टोळीने तपासादरम्यान दिली आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chain snatcher arrested in thane